सातारा, २१ डिसेंबर (वार्ता.) – सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे २२ डिसेंबर या दिवशी सातारा येथे आगमन होत आहे. यानिमित्ताने त्यांचे जिल्ह्यामध्ये भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
सातारा-पुणे महामार्गावर नीरा नदी पुलाजवळ २२ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता मंत्री भोसले यांचे आगमन होणार आहे. या वेळी सातारा शहराच्या दिशेने भव्य वाहनफेरी काढण्यात येणार आहे. वाहनफेरी शिरवळ, खंडाळा, भुईंज, पाचवडमार्गे कुडाळ, करहर, मेढा नंतर मोळाचा ओढा, करंजे ते शिवतीर्थ पोवईनाका येथे दुपारी ४ वाजता पोचणार आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात येईल. यानंतर सुरुची बंगला येथे वाहनफेरीची समाप्ती होणार आहे.