पाकिस्तानला आतंकवादी घोषित करण्यात आतंकवादी तहव्वूर राणाची चौकशी महत्त्वाची !

भारताच्या परराष्ट्र धोरणांचे विश्लेषण

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवर झालेल्या आक्रमणाचा ‘मास्टरमाईंड’ (मुख्य सूत्रधार) तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणणे, हा भारताचा मोठा राजनैतिक विजय आहे. पहिल्यांदाच अशा गुन्हेगाराचे अमेरिकेकडून भारतात प्रत्यार्पण झाले आहे. राणाच्या चौकशीतून पाकिस्तानचा खरा चेहरा जगापुढे आणणे भारताला शक्य होणार आहे. संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय न्यायालय येथे पाकिस्तानला दोषी ठरवण्यात या चौकशीचा लाभ होणार आहे. आता ‘फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स’ या आतंकवादविरोधी संघटनेला भारताला पाकिस्तान विरोधात पुरावे सादर करता येतील. ‘आतंकवादाला समर्थन देणारा देश’ म्हणून पाकिस्तानला घोषित करण्यात राणाची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.

भारत-रशिया मैत्रीची घनता

तुम्हाला माहिती आहे का ? रशियाला अत्यंत संवेदनशील तंत्रज्ञान पुरवणारा भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा मोठा देश आहे. चीननंतर भारत रशियाला ‘सर्किट्स’, ‘मायक्रोचिप्स’ आणि ‘मशीन टूल्स’ यांचा सर्वाधिक पुरवठा करतो. भारताने ९५ दशलक्ष डॉलरचे तंत्रज्ञान रशियाला दिले. विशेष म्हणजे रशिया-युक्रेन युद्ध चालू असतांना रशियावर अमेरिका आणि युरोप यांनी आर्थिक निर्बंध घातलेले असतांना भारताने हे पाऊल उचलले. यातून एकीकडे भारत-रशिया मैत्रीची घनता, तर दुसरीकडे अमेरिकेच्या निर्बंधांना आपण दाखवलेली केराची टोपली दिसून येते.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे. (१४.४.२०२५)