पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसला आव्हान

हिस्सार (हरियाणा) – काँग्रेसला मुसलमानांचा एवढाच कळवळा असेल, तर त्यांनी मुसलमान व्यक्तीला काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवावे. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या निवडणुकीत मुसलमानांना ५० टक्के तिकीट द्यावे. ते जिंकून आले, तर त्यांचे म्हणणे मांडतील; पण काँग्रेसला तसे करायचेच नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे एका सभेत काँग्रेसवर केला.
काँग्रेसच्या लांगूलचालनाच्या राजकारणाचा मुसलमानांना काडीचाही लाभ नाही !
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, कुणाचेही भले करावे, असे काँग्रेसला कधीच वाटले नव्हते. त्यामुळे मुसलमानांचे भले करावे, असेही काँग्रेसला कधी वाटले नाही. हेच काँग्रेसचे खरे वास्तव आहे. काँग्रेसच्या लांगूलचालनाच्या राजकारणाने मुसलमानांना काडीचाही लाभ झाला नाही, तर उलट त्यांची हानीच झाली. काँग्रेसने केवळ काही कट्टरतावाद्यांना खुश करण्याचा पर्याय निवडला. इतर समाज हालअपेष्टेत, अशिक्षित आणि गरीब राहिला.
वक्फ सुधारणा कायद्याचा गरीब मुसलमानांना लाभ होणार
वक्फच्या नावावर लाखो हेक्टर भूमी आहे. वक्फच्या मालमत्तेचा लाभ गरजवंत मुसलमानांना दिला असता, तर त्यांना लाभ झाला असता; पण या मालमत्तेचा लाभ भू-माफियांना मिळाला. आता वक्फ सुधारणा कायद्यामुळे गरीबांची लूट बंद होणार आहे. नव्या तरतुदींमुळे मुसलमान समाजातील गरीब, महिला आणि विधवा यांना लाभ मिळेल, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.