बांगलादेशात १ लाखांहून अधिक लोकांनी केले इस्रायलच्या विरोधात आंदोलन

  • ट्रम्प आणि नेतान्याहू यांचे पुतळे जाळले

  • पंतप्रधान मोदी यांचाही पुतळा जाळल्याचा दावा

ढाका (बांगलादेश) – शहरातील ढाका विद्यापीठ परिसरातील सोहरावर्दी पार्क येथे एक फेरी काढण्यात आली. या वेळी आंदोलनकर्त्यांनी इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या आक्रमणांचा निषेध केला आणि पॅलेस्टिनींना पाठिंबा दर्शवला. या फेरीमध्ये १ लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले. पॅलेस्टिनी झेंडे घेऊन आलेल्या आंदोलनकर्त्यांनी ‘पॅलेस्टाईन मुक्त करा’ आणि ‘इस्रायल मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. या वेळी आंदोलनकर्त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे पुतळे जाळले. काही लोकांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळल्याचा दावाही केला जात आहे.

१. या आंदोलनाला माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि इस्लामी संघटना यांनी पाठिंबा दिला.

२. बांगलादेशामध्ये अलीकडे इस्रायलविरुद्ध सतत निदर्शने होत आहेत. गेल्या आठवड्यातही बांगलादेशात सहस्रो लोक रस्त्यावर उतरले आणि गाझामधील इस्रायली आक्रमणांचा निषेध करत घोषणाबाजी केली.

३. या वेळी आंदोलनकर्त्यांनी इस्रायल, अमेरिका आणि त्यांचे सहयोगी देश यांच्याशी संबंधित आस्थापनांच्या इमारतींना लक्ष्य केले आणि त्यांची तोडफोड केली.

४. बोगरा, सिल्हेट आणि कॉक्सबाजारसह अनेक जिल्ह्यांमध्ये बाटा, के.एफ्.सी. आणि पिझ्झा हट यांसारख्या आस्थापनांवर आक्रमणे करण्यात आली.

५. मुसलमानबहुल देश असलेल्या बांगलादेशाचे इस्रायलशी राजनैतिक संबंध नाहीत. बांगलादेश अधिकृतपणे स्वतंत्र पॅलेस्टाईनला पाठिंबा देतो.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात कोणत्याही सूत्रावरून आंदोलन झाले, तरी आंदोलनकर्ते त्यांचा राग तेथील हिंदूंवर काढून त्यांचा वंशविच्छेद करतात, हे आतापर्यंत तेथे झालेल्या हिंसक आंदोलनांवरून दिसून आले आहे. आताही तसेच झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !