भारतात वर्ष ७०० पूर्वी, म्हणजे मोगल, अरब, हुण, कुशाण या परकीय आक्रमकांच्या पूर्वी हिंदु धर्मातील अनेक प्रथा-परंपरा चांगल्या प्रकारे पाळल्या जात होत्या. या प्रथा-परंपरांमुळे हिंदु धर्मातील व्यवस्था आणि एकूणच समाजजीवन सुरळीतपणे चालू होते. सर्वसाधारण हिंदु धर्मातील चालीरिती आणि त्यातही स्त्रियांविषयी सूत्रांचा विचार अगदी इंग्रज काळात आणि आताच्या काळात केला जातो. परकीय, यवनी आक्रमकांच्या पूर्वी काय स्थिती होती, परकीय आक्रमणांच्या नंतर ज्याप्रमाणे येथील समाजव्यवस्थेत, व्यवहार, राज्यपद्धत यांमध्ये पालट होत गेला, तसा तो प्रथा-परंपरांमध्येही झाला आहे. तो कशा प्रकारे आहे, हे या लेखातून अवगत करण्याचा प्रयत्न !
१. लग्न सायंकाळी आणि रात्री होणे !
उत्तर भारतात लग्न ही सायंकाळी आणि अधिक संख्येत रात्री होतांना दिसतात. लग्नाचे मुहूर्त रात्रीचे असतात. येथे रात्री लग्न कसे काय होते ? याचा मागोवा घेतल्यास मोगलांच्या अत्याचारांपर्यंत पोचता येते. मोगलांच्या राज्यात हिंदु स्त्रिया, मुली यांच्यावर अत्याचार दिवसाढवळ्या होतच असत. या अत्याचारांतून राजघराण्यातील स्त्रियाही सुटल्या नव्हत्या. ज्या राजे-सरदारांना मोगलांनी गुलाम केले अथवा त्यांना गुलाम व्हावे लागले, त्यांच्या मुली, राजघराण्यातील स्त्रिया यांना रानटी आणि वासनांध मोगलाकडे दासी म्हणून अन् त्यांच्या जनानखान्यामध्ये भरती व्हावे लागे. अशा परिस्थितीत सामान्य हिंदु स्त्रियांची किती कठीण परिस्थिती असेल, याची कल्पना येऊ शकते.

मोगलांच्या अत्याचारी राजवटीत एखाद्या मुलीचा विवाह ठरला आहे, हे नवाब किंवा मोगल सरदाराला कळले की, तो वधूच्या घरी संदेश पाठवत असे. त्यानुसार वधूला किमान ३-४ दिवस सरदार अथवा नवाबाच्या समवेत रहावे लागे. त्यानंतर सरदार अथवा नवाबाच्या इच्छेनेच त्यांना विवाहासाठी पाठवून द्यायचे. ही अत्यंत मान आणि शील हानीकारक वाईट प्रथा मोगलांनी चालू केली होती. एखाद्या कुटुंबाने नवाबाकडे मुलीला न पाठवल्यास ऐन विवाह मंडपातून वधूला नवाबाचे सैनिक उचलून घेऊन जात. त्यामुळे हिंदु कुटुंबांना तोंड दाबून हे अत्याचार सहन करावे लागत. स्वत:च्या मुली-बाळींची मानहानी वाचवण्यासाठी ‘मुलीचा विवाह ठरला’, हे गुप्त ठेवले जाई आणि विवाहसोहळा गुप्तपणे होण्यासाठी तो रात्री केला जाई. परिणामी हिंदूंना त्यांच्या मुलींची लग्ने रात्री करावी लागली. ही पद्धत आजतागायतही उत्तर भारतात चालूच आहे.
२. मुली-महिलांनी पायांना आलता किंवा महावर (तळवे आणि बोटांकडील भाग लाल रंगाने रंगवणे) लावणे !
सर्वसाधारणपणे उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, झारखंड इत्यादी उत्तरेकडील राज्यांमधील मुली-महिला पायांचे तळवे आणि बोटांकडील भाग लाल रंगाने रंगवतात. धार्मिक कृत्यांच्या वेळी अथवा अन्य मंगल प्रसंगी पाय रंगवण्यात येतात. ही प्रथा याच भागात आहे.

काही ठिकाणी तिला हिंदु धर्माच्या १६ संस्कारांशी जोडले गेले आहे. तरी याविषयी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे उत्तर भारतात विवाह ठरलेली मुलगी नवाबाकडे पाठवणे बंधनकारक होते. हिंदु मुलीच्या पालकांची यात प्रचंड अडचण व्हायची, त्यातही ते रात्री विवाह ठरवून लपवण्याचा प्रयत्न करायचे. एकदा असेच एका हिंदु कुटुंबातील मुलीचा विवाह ठरला होता, त्यांनी ते पुष्कळ लपवले. तरीही नवाबाला त्याचा सुगावा लागला. त्याने मुलीच्या घरच्यांना बोलावणे पाठवून मुलीला त्याच्या राजवाड्यात बोलावले. या वेळी या मुलीच्या वडिलांना एक कल्पना सुचली. त्यांनी एक डुक्कर कापले आणि त्याचे रक्त मुलीच्या हाताला लावले. तशाच हातांनी मुलगी नवाबाकडे गेल्यावर नवाबाने हाताला लाल रंग पाहून ‘हे काय झाले’, असे विचारले ? तेव्हा मुलीने ‘डुकराचे रक्त लागले आहे’, असे सांगितले. तेव्हा नवाबाने तिला ‘तू आता हराम आहेस, मी तुझा स्वीकार करू शकत नाही’, असे सांगितले आणि तिला परत पाठवून दिले. तेव्हा ही सुंदर युक्ती हिंदु पालकांना लक्षात आली. डुकराचे रक्त हाताला लावल्यानंतर ते मुसलमान शासकांना त्याज्य असते. त्यानंतर मग विवाह ठरलेल्या प्रत्येक मुलीचे हात लाल रंगाने रंगवण्याची प्रथाच पडली आणि आताही पायांना लाल रंग लावण्यात येत आहे. याच युक्तीचा उपयोग करून, म्हणजे डुक्कर घरात पाळून किंवा घरावर आक्रमण करण्यास आलेल्या सैनिकांवर डुक्कर सोडून हिंदूंनी त्यांची घरे, गावे, प्रदेश मोगलांच्या आक्रमणांपासून वाचवला आहे.
३. सती प्रथा
सती प्रथेवरून हिंदु धर्माला ‘बुरसट’, ‘स्त्रियांचे महत्त्व नाकारणारा’ म्हटले जाते. आता तत्कालीन परिस्थितींचा विचार केल्यास जी स्त्री पतीच्या निधनानंतर विधवा झाली, म्हणजेच ती पतीविना स्वरक्षणासाठी असमर्थ असे. तिचे मोगलांच्या राक्षसी राजवटीत रक्षण होणार कसे ? हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असे; कारण विधवा विवाह तेवढा समाजात रूढ नव्हता. समाज परंपरावादी मानसिकतेत असल्यामुळे विधवा महिलेला आत्मरक्षणासाठी पतीसमवेत अग्नीसमर्पण करणे, हा मार्ग सोयीचा वाटत होता. त्यातही हे ऐच्छिक होते, म्हणजे एखाद्या स्त्रीला वाटले की, ती आता एकटी राहू शकत नाही, तीच स्त्री सती जाई. सरसकट सर्वच स्त्रिया गेल्या, असा उल्लेख ऐकिवात नाही. त्यामुळे कुणी समाजसुधारक आले आणि त्यांनी ही अन्याय प्रथा बंद केली, हे सांगणे हास्यास्पद आहे. मुळात या प्रथेचा प्रारंभ कोणत्या संदर्भाने झाला होता, हे पहाणे महत्त्वाचे आहे. राजस्थानामध्ये जोहार काय होता ? जोहार हे सामूहिक सती जाणेच आहे. एवढेच की, यवनी आक्रमणाच्या वेळी शीलरक्षणासाठी स्त्रिया सहस्रोंच्या संख्येने जोहार करायच्या आणि तेव्हा पुरुष मंडळी आता त्यांच्या मागे पत्नी उरलेली नाही, या भावनेने रणांगणात प्राण अर्पण करण्यासाठीच मोगलांशी त्वेशाने लढाई करायचे.
४. विवाहाच्या परंपरेत वधू घरी आल्यावर तिला तिच्या भावांनी संरक्षणात सासरी पाठवणे
‘पगफेरा रस्म’मध्ये विवाहाच्या परंपरेत वधू लग्न होऊन सासरी गेली की, नंतर वधूचे आई-वडील मुलीला पुन्हा घरी बोलावतात आणि नंतर पुन्हा तिची पाठवणी सासरी करतात. अशा वेळीही मोगलांकडून वधूला धोका असे. अशा वेळी तिचे भाऊ, तिचे पुरुष नातेवाईक मुलीच्या डोक्यावर शस्त्र म्हणजेच तलवारी धरत. यामध्ये तिच्या भावांकडून तिला आश्वासन देण्याचा हा प्रकार आहे, ‘तू सासरी जाईपर्यंत आणि माहेरी येऊन पुन्हा सासरी जाईपर्यंत तुझे रक्षण करू.’ अशा वेळी जैन धर्मीयही ज्यांना आपण अहिंसावादी मानतो, तेही शस्त्र धारण करून बहिणीच्या रक्षणासाठी सज्ज असायचे, म्हणजे जैन समाजानेही तलवारी धारण केल्या आहेत; कारण तेव्हा मोगलांचे भय होते. आता या प्रथेमध्ये तलवारी धरण्याऐवजी वधूच्या डोक्यावर टोपली धरण्यात येते.
५. पदर घेण्याची आणि पडदा प्रथा का आली ?
उत्तर भारतातील पडदा प्रथेविषयी सांगितले जाते की, हिंदु धर्मात स्त्रियांना सन्मान दिला जात नव्हता, त्यांना उंबर्याबाहेर पडणे निषिद्ध होते आणि सारखा डोक्यावर पदर घ्यावा लागे. त्यांना स्वातंत्र्य नव्हते वगैरे वगैरे ! आता वरच्या संदर्भाने विचार केल्यास मोकळ्या चेहर्याने मोगलांच्या राज्यात फिरण्याची कुणा स्त्री अथवा मुलीची हिंमत होईल का ? कारण वासनांध सरदारच नव्हे, तर त्यांच्या सैनिकांचीही दृष्टी स्वत:वर पडल्यावर कधी विनयभंग अथवा अत्याचार होतील, याचा नेम नसे. अशा वेळी किमान स्वत:ची ओळख या जिहादी घटकांपासून लपवण्यासाठी हिंदु स्त्रियांनी पदर घेणे, पडदा प्रथा चालू केली, म्हणजे ती त्यांनी काही बंधन म्हणून स्वीकारली नव्हती, तर स्वरक्षणासाठी, शील रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचा तो भाग होता. कालांतराने अगदी घरातही पदर घेणे चालू झाले; कारण मोगल सैनिक घरातही घुसून पडताळणी करत, अत्याचार करत. पदर घेणे, हा परंपरेचा भाग झाला. आताही अनेक स्त्रिया पदर घेतात; मात्र ते आदराचे लक्षण म्हणून घेतात.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना समितीच्या साधकांच्याच एका नातेवाइकांकडे गेल्यावर संत आले म्हणून घरातील स्त्रियांनी पदर घेतले नाहीत. त्यांच्या दृष्टीने ‘संत म्हणजे आमच्या घरातीलच व्यक्ती आहेत.’ त्यांच्यापुढे वावरतांना कोणतीही अडचण त्यांना वाटली नाही. असाही भाग अनुवण्यास येतो. मुख्य म्हणजे या प्रथांच्या संदर्भातील या लेखात उद्धृत केलेले उल्लेख सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या उत्तर भारतातील वास्तव्यात स्वत: निरीक्षण केलेले आहेत.
६. मुलींचा उपनयन संस्कार रहित होणे !
मोगल आक्रमकांच्या पूर्वी मुलांसह मुलींचाही उपनयन संस्कार केला जात होता; मात्र या आक्रमकांच्या काळात मुली-महिला सुरक्षित नव्हत्या, तर उपनयन करणे तर दूरची गोष्ट होती. तेही याच काळात बंद झाले आहे, असे लक्षात येते.
७. भंगी समाजाची निर्मिती
नवाब अथवा मोगल सरदार यांनी राजपुतांचे राज्य जिंकले किंवा त्यांचा प्रदेश जिंकला, तर त्यांना गुलाम अथवा नोकर म्हणून नवाबाकडे रहावे लागे. अशा वेळी अगदी खालच्या स्तरावरची कामेही नवाब त्यांच्याकडून करवून घेत. यामध्ये नवाब शौचाला बसलेल्या पात्राची घाण उचलून नेणे, ती वेगळ्या ठिकाणी टाकणे, अशी कामेही करावी लागत. तेव्हा हिंदु धर्मियांमध्ये शौच-अशौच पाळणे, शुद्धता यांना पुष्कळ महत्त्व दिले जात होते. या परंपरावादी हिंदूंनी नवाबाकडे अशी खालची कामे करणार्या स्वत:च्या धर्मबांधवांना, जातीबांधवांना त्यांच्यापासून दूर रहाण्यास सांगितले, म्हणजे मूळ समाजापासून थोडे अंतर ठेवूनच रहाण्यास सांगितले. तेव्हापासून ते वेगळे झाले आणि त्यांच्यापासून लोकही दूर झाले. परिणामी अनेकांच्या पिढ्या त्यामध्ये गेल्या. त्यांना भंगी म्हणून नामाभिधान झाले. येथे महत्त्वाचे म्हणजे भले लोकांनी त्यांना मूळ समाजापासून वेगळे दूर ठेवले, तरी ते धर्मांतरित झाले नाहीत; मात्र आता त्यांनाच वेगळे मानले जाते आणि हिंदु समाजापासून आताही वेगळे ठेवले जाते.
८. ब्राह्मणांनी खालच्या जातींवर अन्याय केल्याचे खोटे कथानक !
‘ब्राह्मणांनी आमच्यावर १ सहस्र वर्षे अन्याय केला’, असा एक दावा काही जातींकडून केला जातो. याविषयी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना असेच एका व्यक्तीने त्यांनी धोतर घातल्याने ते ब्राह्मणवर्गातील असल्यामुळे सांगितले, ‘तुमच्या पूर्वजांनी आमच्यावर अन्याय केला.’ तेव्हा सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी त्यांना सांगितले, ‘गत १ सहस्र वर्षांत आक्रमकांचेच राज्य भारतावर होते. आक्रमकांच्या अत्याचारापासून कुणीही सुटले नव्हते. त्यामुळे अशा काळात ब्राह्मण वर्ग स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धडपडतील कि मी श्रेष्ठ कसा ? आणि तू क्षुद्र कसा ? हे सांगत बसतील अन् खालच्या जातीच्या लोकांवर अन्याय करतील ?’ म्हणजे यातून कल्पना केली तरी लक्षात येते की, असे काही झाले नाही, तर इंग्रजांनी हे षड्यंत्र रचून ब्राह्मणांनी १ सहस्र वर्षे अन्याय केल्याचे हिंदु धर्मातील अन्य जातींच्या मनावर जाणीवपूर्वक बिंबवलेला खोटा प्रचार आहे. तो इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा, या व्यापक कटाचाच भाग आहे.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (२६.३.२०२५)