
कीव – युक्रेनच्या सैन्याने दावा केला आहे की, त्याला प्रथमच रशियन शस्त्रांमध्ये भारतीय बनावटीची उपकरणे सापडली आहेत. ‘कीव इंडिपेंडेंट’च्या वृत्तानुसार युक्रेन सैन्यदलाच्या गुप्तचर संस्थेने त्याच्या अहवालात हा दावा केला आहे. असा दावा करून रशिया-युक्रेन युद्धात भारत रशियाला अप्रत्यक्षपणे साहाय्य करत आहे, असे युक्रेन भासवण्याचा प्रयत्न करत असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे.
१. युक्रेन युद्ध चालू झाल्यापासून पाश्चिमात्य देश आरोप करत आहेत की, भारत रशियाला साहाय्य करत आहे. युक्रेनवर युद्ध लादल्यानंतर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले होते. ते झुगारून भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे, अशी अमेरिकेची इच्छा आहे; पण मोदी सरकार यासाठी सिद्ध नाही. यामुळे युक्रेनसह अनेक पाश्चात्त्य देश भारतावर अप्रसन्न आहेत.
२. गेल्या अनेक वर्षांपासून रशिया हा भारताचा शस्त्रास्त्रांचा सर्वांत मोठा पुरवठादार आहे. अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांनी रशियावर विविध निर्बंध लादल्यानंतर भारत फ्रान्सकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे खरेदी करत आहे.
३. युक्रेन युद्ध चालू झाल्यापासून भारत आणि रशिया यांच्यामधील व्यापार विक्रमी पातळीवर पोचला आहे.
४. भारताने अमेरिकेला स्पष्टपणे सांगितले आहे की, ते रशियासोबतची मैत्री तोडणार नाही. भारताने रशियासोबत अनेक नवीन संरक्षण करारही केले आहेत.
संपादकीय भूमिकायुक्रेनने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवली आहेत. आतंकवादाचा पुरस्कार करणार्या देशाला शस्त्रास्त्रे पुरवणे युक्रेनला चालते का ? त्यामुळे रशियाच्या शस्त्रास्त्रांमध्ये भारतीय उपकरणे सापडल्यास युक्रेनला का झोंबते ? |