‘व्यष्टी साधना करण्यात येणारे अडथळे आणि त्यांवर मात कशी करावी ?’, यासंदर्भात पू. संदीप आळशी आणि ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. रामानंद परब यांनी केलेले मार्गदर्शन 

साधना करत असतांना साधकांना विविध समस्या येत असतात. त्यामुळे त्यांची साधना खंडित होते किंवा तिची गती मंदावते. सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांनी घेतलेल्या एका सत्संगात ग्रंथ आणि कला यांच्याशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी त्यांना साधनेतील काही अडचणी विचारल्या. त्यावर पू. संदीपदादा आणि साधक श्री. रामानंद परब यांनी साधकांना मार्गदर्शन केले. ‘मार्गदर्शनातील ही सूत्रे वाचून साधकांना साधनेची दिशा मिळावी, त्यांचा साधनेतील उत्साह आणि त्यांच्या साधनेची गती वाढावी’, या उद्देशांनी ही सूत्रे पुढे दिली आहेत. सर्वांना याचा लाभ होवो, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !

९.४.२०२५ या दिवशी या मार्गदर्शनातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.   

(भाग २)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/900721.html

पू. संदीप आळशी

३. व्यष्टी साधना करतांना येणार्‍या समस्या आणि त्यांवरील उपाययोजना !

३ इ. व्यष्टी साधना करतांना येणार्‍या अडथळ्यांवर मात करण्यासाठी पू. संदीप आळशी यांनी केलेले प्रयत्न

पू. संदीप आळशी : सध्या ‘ग्रंथ विभागातील सेवांचे नियोजन करणे, सेवा करणे आणि त्या अन्यांकडून करून घेणे’, हे सर्व पहाण्याचे दायित्व माझ्याकडे आहे. त्यातही ‘माझे आजारपण, त्यावरील वैद्यकीय उपचार आणि वाईट शक्तींच्या त्रासांवरील आध्यात्मिक स्तरावरील उपाय’ यांमुळे मला सेवेसाठी अत्यंत अल्प वेळ मिळतो. कितीही समस्या आल्या, तरी गुरूंचे कार्यही करायचेच आहे. अशा स्थितीत आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागतो, जसे जाता-येता नामजप, प्रार्थना, कृतज्ञता आदी करणे.

३ इ १. आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या वेळेत स्वयंसूचनांची सत्रे करणे : मी दिवसातून २ वेळा आध्यात्मिक उपाय करतो. त्या वेळी मी स्वयंसूचनांची सत्रे करतो. त्यामुळे एकाग्रता साधते आणि स्वयंसूचना चांगल्या पद्धतीने दिल्या जातात.

३ इ २. उद्वाहनातून एकटे जातांना भावजागृतीसाठी प्रयत्न करणे : दिवसभरात आश्रमात वावरतांना उद्वाहनाचा (‘लिफ्ट’चा) अनेकदा वापर करावा लागतो. उद्वाहनातून जातांना मी एकटा असल्यास त्या वेळी काहीतरी भाव ठेवण्याचा किंवा किमान क्षमायाचना करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे वेळेचा सदुपयोग होते.

३ इ ३. वैद्यकीय उपचारांच्या वेळी स्वयंसूचना देणे : मला होत असलेल्या शारीरिक त्रासांमुळे मला मर्दन करून घेण्यासारखे काही वैद्यकीय उपचार करावे लागतात. या उपचारांच्या वेळीही मी स्वयंसूचना देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा ‘उपलब्ध वेळेत पूर्ण स्वयंसूचना होऊ शकणार नाही’, असे लक्षात येते, तेव्हा मी त्यातील केवळ दृष्टीकोनाची सूचना घेतो. याला ‘लघुसूचना’ म्हणतात. वेळेअभावी ‘प्रतिमा जपणे’ या स्वभावदोषावरील मोठी सूचना घेता येणे शक्य नसल्यास ‘प्रतिमा नष्ट करणे’, हे माझे साधनेचे ध्येय आहे’, ही दृष्टीकोनाची स्वयंसूचना मी ५ वेळा घेतो.

३ इ ४. महाप्रसाद घेतांना (जेवतांना) मी एकटाच असेन, तेव्हा लघुसूचना देण्याचा प्रयत्न करतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ज्या ज्या वेळी जे प्रयत्न करायला सांगतात, त्या त्या वेळी ते प्रयत्न करायला हवेत. ती वेळ चुकली, तर पुढे ते प्रयत्न करता येतील कि नाही, हे सांगता येत नाही. गुरुदेवांनी वर्ष २००० मध्येच आपल्याला स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवण्यास सांगितली होती. तेव्हा ती नीट राबवली असती, तर आता साधनेची अशी बिकट स्थिती झाली नसती.

३ ई. व्यष्टी साधनेसाठी लागणार्‍या वेळेचे नियोजन करावे आणि त्यात येणार्‍या अडचणी आढावासेवकांना विचाराव्यात !

पू. संदीप आळशी : आपल्याकडील सेवांचे प्रमाण वाढले, तरी त्यांना अनुसरून ‘आपण व्यष्टी साधनेचे नियोजन करतो का ?’, हे महत्त्वाचे आहे. श्री. रामानंददादांच्या सेवा वाढल्या, तरी त्यांनी व्यष्टी साधनेचे नीट नियोजन केले. त्यामुळे त्यांची व्यष्टी साधना होत राहिली. आपल्या साधनेमध्ये व्यष्टी साधनेचे एक स्थान आहे; पण त्याविषयी आपण जागरूक नसल्यामुळे समस्या निर्माण होते. ‘समष्टी सेवा वाढल्याने व्यष्टी साधना करायला नको’, असे गुरूंनी सांगितले आहे का ? त्यामुळे ‘आता माझी समष्टी सेवा वाढली आहे, तर मी व्यष्टी साधनेचे नियोजन कसे करू ?’, असे आढावासेवकांना विचारले पाहिजे.

श्री. रामानंद परब : व्यष्टी साधना न करता केवळ समष्टी साधना केल्यास ते केवळ कार्य होईल ! आपण ज्या सेवा करतो, त्या सेवा गुरुदेव तज्ञ व्यावसायिक (‘प्रोफेशनल’) लोकांना सांगून त्यांच्याकडून करून घेऊ शकतात; पण ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांना मोक्षप्राप्ती व्हावी’, यासाठी ते आपल्याला ही सेवा करायला सांगतात.

३ उ. स्वयंसूचनांची सत्रे एकाग्रतेने होण्यासाठी भावजागृतीचे प्रयत्न करणे आवश्यक !

एक साधिका : माझ्याकडून स्वयंसूचनांची सत्रे एकाग्रतेने होत नाहीत. ‘स्वयंसूचनेसाठी कोणता स्वभावदोष निवडावा ?’, याविषयी विचार करण्यात माझा वेळ जातो. त्यामुळे माझी अस्वस्थता वाढते. परिणामी माझे स्वभावदोष-निर्मूलनासाठीचे प्रयत्न अनियमित होतात. प्रतिदिन व्यष्टी साधना झाली, तर मात्र मनाला समाधान आणि आनंद मिळतो.

काही दिवसांपूर्वी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी धर्मप्रसार करणार्‍या एका उत्तरदायी साधकाला सांगितले, ‘‘तुम्ही कार्य अतिशय चांगले करता. हे कार्य तुम्हाला साधनेत एका विशिष्ट टप्प्यापर्यंत घेऊन जाईल; पण त्यापुढील आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी तुम्हाला व्यष्टी साधनाच करावी लागेल. तुम्ही प्रसारामध्ये अनेक लोकांशी बोलता. तेव्हा देवाचे तत्त्व कार्यरत असते; पण ती सेवा संपल्यानंतर देवाचे तत्त्व मिळणे थांबते. व्यष्टी साधना नसल्यामुळे देवाचे तत्त्व सतत मिळत नाही. व्यष्टी साधना आपोआप होत नाही. त्यासाठी वेळ द्यावाच लागतो.’’

पू. संदीप आळशी : ‘आपण कोणता स्वभावदोष निवडावा ?’, हे आपल्या उत्तरदायी साधकांना विचारून घ्यायला हवे. या साधिकेने सांगितले की, त्यांना व्यष्टी साधनेमुळे समाधान आणि आनंद मिळतो, तसेच माझेही आहे. माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न योग्य आणि भावाच्या स्तरावर झाले की, मला दिवसभर मधे मधे माझ्या अंगावर दैवी कण दिसतात. एखाद्या दिवशी व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प झाल्यास दैवी कण दिसत नाहीत. त्या वेळी माझ्या लक्षात येते की, आज माझी सेवा भावपूर्ण झालेली नाही. अनेकदा असेही होते की, दिवसभर तळमळीने समष्टी सेवा केली, तरी दैवी कण दिसत नाहीत; मात्र जेव्हा भाववृद्धीचे प्रयत्न करून थोडीशी सेवा केलेली असली, तरी तेव्हा दैवी कण दिसतात.

श्री. रामानंद परब

श्री. रामानंद परब : स्वयंसूचनांची सत्रे एकाग्रतेने होण्यासाठी त्या सत्रांना भावजागृतीच्या प्रयत्नांची जोड द्यायला हवी. भावजागृतीचे प्रयत्न केले की, एकाग्रता साध्य होते. काही वेळा ‘भावजागृतीसाठी काय प्रयत्न करावेत ?’, हे सुचत नाही. अशा वेळी प्रार्थना करावी. प्रार्थना करायला सुचत नसेल, तर लिहिलेली प्रार्थना वाचायची. असे प्रयत्न केल्यास मन दैवी चैतन्याशी समरस होऊन एकाग्रता वाढायला साहाय्य होते. ‘विचार आणि विकल्प’ हेच मनाचे कार्य आहे. त्यांची शृंखला सतत चालू रहाते. मनाला चैतन्याकडे वळवावे लागते. त्यासाठी मग ‘भावजागृतीसाठी प्रयत्न करणे’ हा एकच प्रयत्न असून तो केल्याने सेवेतील आनंद मिळतो. ‘गुरुदेवांना आवडेल, असे मला करायचे आहे’, असा विचार येण्यास आरंभ होतो आणि आपोआप एकाग्रता साधू लागते.

एक साधिका : आश्रमातील ध्यानमंदिरात बसून स्वयंसूचनांची सत्रे केल्यास ‘एकाग्रता आणि देवाशी अनुसंधान’, असे दोन्ही साधता येऊ शकते.

३ ऊ. ‘सेवा आणि व्यष्टी साधना’, असे वेगवेगळे भाग न करता सेवेलाच व्यष्टी साधनेची नियोजनपूर्वक जोड द्यावी !

एक साधिका : मी घरून प्रतिदिन सेवेसाठी आश्रमात येते. मला घरची कामे करून आश्रमात यायचे आणि परत जायचे असते. त्यामुळे व्यष्टी साधना आणि या सगळ्याची घडी नीट बसवता येत नाही अन् मला ताण येतो.

श्री. रामानंद परब : आपण ‘आश्रमात आल्यावर व्यष्टी साधनेचे कोणते प्रयत्न करू शकतो आणि घरी गेल्यावर कोणते प्रयत्न करू शकतो ?’, याचे नियोजन करू शकता. ‘घरी साधनेसाठी वेळ मिळत नाही’, असे आपल्याला वाटते; मात्र नियोजनपूर्वक कृती केल्यास वेळ मिळेल. प्रसारातील साधक घरी राहून सेवा करतात. त्यांनाही अशाच प्रकारे घर सांभाळून सेवा करावी लागते. प्रसारातील अनेक साधकांकडे मोठ्या सेवांचे दायित्व असते. त्या साधकांचे सेवेचे आढावे तर अगदी रात्री १२ ते १ वाजेपर्यंतही चालू असतात. एकूणच ‘मला व्यष्टी साधना करायचीच आहे’, अशी तळमळ वाढली की, आपल्याकडून प्रयत्न होतील. बर्‍याच वेळा आपण सेवा आणि व्यष्टी साधना यांना निरनिराळे समजतो. त्यामुळे मनःस्थिती द्विधा होते. तसे न करता सेवा करतांनाच आपल्याला सेवेला व्यष्टी साधनेची जोड द्यायची आहे, म्हणजे सेवेच्या नियोजनातच आपल्याला स्वयंसूचना सत्रांच्या वेळाही ठरवायच्या आहेत. असे केल्याने व्यष्टी साधनेचा ताण येणार नाही.

एक साधिका : मलाही असे नियोजन न केल्याने पूर्वी ताण यायचा. ‘आढावासेवकांच्या माध्यमातून देवच आपल्याला प्रयत्न करायला सांगत आहे’, असा भाव ठेवण्याचा मी प्रयत्न केला. त्यामुळे मला सकारात्मक रहायला साहाय्य झाले. त्यासोबतच ‘देव आपल्याला व्यष्टी साधनेसाठी ऊर्जा पुरवतो’, असा भाव ठेवल्याने मला ताण येईनासा झाला.

३ ए. परिस्थितीवर मात करता येण्यासाठी प्रत्येक कृतीला भावजागृतीसाठीचे प्रसंग जोडावेत !

एक साधिका : पूर्वी मला गुरुदेवांची पुष्कळ आठवण येऊन माझा भाव जागृत व्हायचा. प्रार्थना आणि सेवा केल्यानंतर आनंद जाणवायचा. नंतर मधल्या काळात ‘आध्यात्मिक त्रास आणि प्रतिकूल परिस्थिती’, यांमुळे ते बंद झाले. आता मला पूर्वीसारखी स्वतःत तळमळही जाणवत नाही. स्वयंसूचनांची सत्रे करतांना मला भाव जाणवत नाही. यावर उपाययोजना म्हणून मी सकारात्मक विचार केला. स्वयंसूचना सत्रांचे नियोजन केले; मात्र एखादी तातडीची सेवा आल्यास ‘ती सेवा आधी करायची कि व्यष्टी साधना करायची’, अशी मनाची स्थिती होते. त्यामुळे भावजागृतीसाठी करायच्या प्रयत्नांचा विचार टिकून रहात नाही. असाच प्रकार आध्यात्मिक उपायांच्या संदर्भातही घडतो. तेथे मन एकाग्र व्हायला पुष्कळ वेळ लागतो. त्यामुळे ‘उपायांपेक्षा सेवा करून सत्मध्ये राहूया’, असे वाटते.

एक साधिका : माझीही स्थिती अशीच असते. मला सेवा करावीशी वाटत नाही. अशा वेळी ‘मला हे करायचेच आहे’, असा विचार करून मी प्रयत्न करते. असे केल्याने मनाला समाधान आणि आनंद मिळतो. स्वयंसूचनांची सत्रे एकाग्रतेने झाली नाहीत, तरी ‘तो करण्याचा प्रयत्न केला आहे ना’, असे आपण सकारात्मकतेने पहावे.’ ‘आपण देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो’, या विचाराने आनंदी रहाण्याचा प्रयत्न करू शकतो. ‘देवाने आपल्याकडून एवढे तरी प्रयत्न करून घेतले’, असा विचारही करता येईल.

(क्रमशः)

(२०.७.२०२४ या दिवशी झालेल्या सत्संगात पू. संदीप आळशी यांनी केलेले मार्गदर्शन)

लेखाचा भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/901469.html

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.