‘व्यष्टी साधना करण्यात येणारे अडथळे आणि त्यांवर मात कशी करावी ?’, यासंदर्भात पू. संदीप आळशी आणि ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. रामानंद परब यांनी केलेले मार्गदर्शन 

साधना करत असतांना साधकांना विविध समस्या येत असतात. त्यामुळे त्यांची साधना खंडित होते किंवा तिची गती मंदावते. सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांनी घेतलेल्या एका सत्संगात ग्रंथ आणि कला यांच्याशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी त्यांना साधनेतील काही अडचणी विचारल्या. त्यावर पू. संदीपदादा आणि साधक श्री. रामानंद परब यांनी साधकांना मार्गदर्शन केले. ‘मार्गदर्शनातील ही सूत्रे वाचून साधकांना साधनेची दिशा मिळावी, त्यांचा साधनेतील उत्साह आणि त्यांच्या साधनेची गती वाढावी’, या उद्देशांनी ही सूत्रे पुढे दिली आहेत. सर्वांना याचा लाभ होवो, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !               (भाग १)

पू. संदीप आळशी

१. साधकांच्या मनात नकारात्मक आणि टोकाचे विचार येण्यामागे पू. संदीप आळशी यांनी सांगितलेली कारणे

पू. संदीप आळशी : वर्ष २०२४ च्या गुरुपौर्णिमेच्या काही दिवस आधी साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या एका साधिकेने मला सांगितले, ‘‘साधकांच्या मनात नकारात्मक विचार येत असून व्यष्टी साधनेविषयी उदासीनता वाढत आहे. त्यांना निराशा येऊन ‘साधना करायला नको, व्यवहारातील गोष्टीच कराव्यात’, असे टोकाचे विचारही येत आहेत.’’ या विचारांवर उपाययोजना शोधण्याआधी आपण ‘अशा प्रकारचे विचार मनात का येतात ?’, ते समजून घेऊया.

१ अ. काळ अत्यंत प्रतिकूल असून वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांचे प्रमाणही वाढलेले असणे : काही दिवसांपूर्वी माझी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. तेव्हाही साधकांनी त्यांना वरीलप्रमाणे येत असलेल्या समस्या सांगितल्या. तेव्हा गुरुदेवांनी हेच सांगितले, ‘‘सध्याचा काळ अत्यंत प्रतिकूल आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा काळ समीप आला आहे. त्यामुळे वातावरणातील वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांचे प्रमाणही वाढले आहे. अनेक साधक गेली २० – २५ वर्षे साधना करत आहेत. त्यांना आजवर कधीही असे विचार आले नव्हते; मात्र आता त्यांना असे विचार येत आहेत, म्हणजे ‘हे काहीतरी विपरित आहे किंवा आध्यात्मिक त्रासामुळे होत आहे’, हे लक्षात येते.’’

१ आ. साधनेच्या प्रयत्नांची गती वाढली की, वाईट शक्तींचा विरोधही वाढणे : काही साधकांच्या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हेही सांगितले, ‘‘जसजसे साधनेचे प्रयत्न चांगले करू, तसतसा अनिष्ट शक्तींचा विरोधही वाढत जातो.’’ वर्ष २००७ मध्ये माझी अशी स्थिती होती की, मी साधनेचे पुष्कळ प्रयत्न करायचो. माझी दिवसाला १२ – १३ घंटे सेवा व्हायची; पण तेवढ्या गतीने आध्यात्मिक उन्नती होत नव्हती. त्यामुळे मला साधनेत आनंद मिळत नव्हता. मी एकदा गुरुदेवांना याविषयी विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘काळ प्रतिकूल आहे. जेव्हा आपण चालत असतो, तेव्हा आपल्याला वार्‍याचा विरोध होत नाही; मात्र जेव्हा आपण धावू लागतो, तेव्हा वार्‍याचा विरोध वाढतो. साधनेच्या संदर्भातही असेच आहे. साधनेच्या प्रयत्नांची गती वाढली की, साधकांना वाईट शक्तींचा होणारा विरोधही वाढत असतो.’’

मी काही साधकांच्या संपर्कात आल्यानंतर ‘त्यांचे साधनेचे प्रयत्न चांगले होत आहेत’, असे माझ्या लक्षात आले. २ वर्षांपूर्वीच्या तुलनेत एका साधिकेची स्थिती थोडी सुधारली आहे. आता ती दायित्व घेऊन सेवा करते. तिचा उत्साह पूर्वीपेक्षा वाढला आहे. अन्य एक साधिकेची  स्थितीही दोन वर्षांपूर्वीपेक्षा आता चांगली आहे. पूर्वी तिला पुष्कळ निरुत्साह असायचा, ‘साधकांशी कसे जुळवून घ्यायचे ?’, हे तिला कळायचे नाही. त्यामुळे तिला ताण यायचा; पण आता ती बरी वाटते. त्यामुळे आपण साधनेचे प्रयत्न करण्यात अगदीच न्यून पडतो किंवा ‘आपल्याला काहीच जमत नाही’, असे वाटून घ्यायची आवश्यकता नाही.

१ इ. हिंदु राष्ट्राची स्थापना होतांना साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास, हे गर्भवती स्त्रीला होणार्‍या प्रसुती वेदनांसारखे असून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतर सर्वांनाच आनंद मिळणार आहे !

एक साधिका : माझ्या साधनेची स्थिती पूर्वीपेक्षा ठीक असली, तरी त्यात चढ-उतार असतात.

पू. संदीप आळशी : ‘वाईट शक्तींच्या त्रासामुळे साधनेच्या प्रयत्नांत चढ-उतार होतात’, हे आता आपण मन आणि बुद्धी यांनी समजून घेतले आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर सगळ्यांचे त्रास न्यून होणार आहेत आणि त्यामुळे सगळे आनंदी होतील. त्या वेळी ‘सगळ्यांची आध्यात्मिक प्रगती लवकर होईल’, असे सांगून गुरुदेवांनी सर्वांनाच आश्वस्त केले आहे. ‘साधकांचे आध्यात्मिक त्रास वाढणे’, हे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच्या जणू प्रसुतीवेदनांसारखेच आहे. बाळाच्या जन्मानंतर आईला जसा आनंद होतो, तसाच आनंद हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतर आपल्या सर्वांना मिळणार आहे. त्यामुळे कोणी काळजी करू नये.

२. प्रसंग घडल्यावर साधकांशी मनमोकळेपणाने बोलता येण्यासाठी स्वयंसूचना घेणे आवश्यक !

श्री. रामानंद परब

एक साधिका : सेवा करतांना एखादा साधक मला काही अयोग्य बोलल्यास ते माझ्या मनाला लागते. त्या प्रसंगावर मला मात करता येत नाही. त्या साधकाशी बोलण्यासाठी उत्तरदायी साधकाचे साहाय्य घेतांनाही ‘प्रतिमा जपणे’, या स्वभावदोषामुळे माझे प्रयत्न होत नाहीत. ‘मी मनातले बोलले, तर समोरच्यापासून दुरावले जाईन’, हा विचार अधिक असतो. मी करते ती सेवा आणि साधक यांच्याविषयी मला आपलेपणा वाटत नाही. पूर्वी अशा प्रसंगात माझ्याकडून कोणतेच प्रयत्न व्हायचे नाहीत; पण आता ‘मी कसे करायला हवे ?’ याविषयी आढावासेविकेशी बोलून घेते.

श्री. रामानंद परब : अशा वेळी उत्तरदायी साधकांकडून मार्गदर्शन घेतांना आपल्यासोबत घडलेला एखादा प्रसंग मोकळेपणाने सांगितला पाहिजे, तरच योग्य उपाययोजना मिळू शकते. काही प्रसंग सांगतांना संकोच वाटतो. तेव्हा ‘मी गुरुदेवांनाच आत्मनिवेदन करत आहे’, असा भाव ठेवावा. उत्तरदायी साधक ज्या उपाययोजना सांगतील, त्याप्रमाणे कृती करून प्रसंगावर मात करायला हवी. मनाच्या अशा समस्या येऊ नयेत, यासाठी साधकांनी ‘मनमोकळेपणा’ हा गुण वाढवायला हवा.

पू. संदीप आळशी : एखाद्या साधकामध्ये ‘मनमोकळेपणाचा अभाव’ हा स्वभावदोष असेल, तर त्याला ‘मी मनमोकळेपणाने बोलले, तरच मला आनंद मिळेल’, अशी लघुस्वयंसूचना घेता येईल. आपण मनाला सतत बजावत राहिले, तर मन अन्य साधकांशी बोलण्यासाठी उद्युक्त होते.

प.पू. गुरुदेवांनी सांगितले आहे की, ‘सध्या साधकांना होणारे बहुतांश त्रास हे वाईट शक्तींच्या त्रासांमुळे आहेत.’ मात्र असे असले, तरी साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया नीट न राबवणे, हेसुद्धा या त्रासांचे एक कारण आहेच. साधना करण्यामागील मुख्य हेतू ‘आनंदी रहाणे’ हा आहे. तोच जर साध्य होत नसेल, तर साधना करण्याचे लाभ काय ? त्यामुळे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया प्रामाणिकपणे राबवणे आवश्यक आहे.

३. व्यष्टी साधना करतांना येणार्‍या समस्या आणि त्यांवरील उपाययोजना !

एक साधिका : व्यष्टी साधनेत सातत्य ठेवणे, प्रयत्नांत वाढ करणे, प्रार्थना वाढवणे इत्यादी गोष्टी मला जमत नाहीत. याविषयी एका संतांनी मला ‘प्रायश्चित्त आणि शिक्षापद्धत घेणे हे उपाय कठोरतेने केले पाहिजेत’, असे सांगितले आहे; पण प्रत्येक वेळी मला ते शक्य होत नाही. एखाद्या साधकाने समस्या सांगितल्यास किंवा त्याला सेवेत साहाय्य हवे असल्यास ‘स्वतःच्या व्यष्टी साधनेला दुय्यम स्थान देऊन साधकाची समस्या सोडवण्यास प्राधान्य देऊया’, असे मला वाटते आणि मी व्यष्टी साधनेचे माझे नियोजित प्रयत्न करण्यात न्यून पडते.

३ अ. बुद्धीची सेवा करत नसतांना स्वयंसूचनांची सत्रे करावीत !

श्री. रामानंद परब : व्यष्टी साधनेत सातत्य राखले, तर कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मन सक्षम होते. व्यष्टी साधना उत्तम केल्यास आपल्याला समष्टी साधना चांगली करण्यासाठी आवश्यक अशी ऊर्जाही मिळते. गुरुदेवांनी असेही सांगितले आहे की, ‘पुष्कळ सेवा असेल, तर व्यष्टी साधनेचे प्रयत्न पूर्णतः बंद न करता ते जमतील तितक्या प्रमाणात करावेत, उदा. कधी कधी महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या वेळी पूर्ण रात्र जागून सेवा करावी लागते. समजा मी प्रतिदिन १२ सत्रे करतो, तर अशा तातडीच्या सेवेच्या वेळी मी निदान ५ सत्रे तरी करायला हवीत. मी प्रत्यक्षात हे कृतीत आणण्याचा प्रयत्न केला. मे २०२३ मध्ये झालेल्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी मी सेवेला आरंभ करण्यापूर्वीच गुरुदेवांना ‘या सेवेअंतर्गत माझी समष्टीसह व्यष्टी साधनाही होऊ दे’, अशी प्रार्थना करत असे. रात्रभर सेवा करता करता पहाटेचे ६ वाजायचे, तरीही मी स्वभावदोष निर्मूलन सारणीत स्वतःकडून झालेल्या चुकांचे लिखाण करून मगच झोपायचो. ब्रह्मोत्सवासाठी सिद्ध केलेल्या सुवर्णरथाला फवार्‍याद्वारे रंग देतांना बुद्धीचे काम फारसे नसायचे. तेव्हा मी मनातल्या मनात प्रार्थना करून स्वभावदोषांविषयी स्वयंसूचना देत असे. त्यामुळे नियोजित सत्रांची संख्या आपोआप पूर्ण व्हायची, तसेच सेवेतून मला आनंद आणि चैतन्यही मिळायचे.

३ आ. ‘व्यष्टी साधना करायचीच आहे’, असा बुद्धीचा निश्चय करावा !

श्री. रामानंद परब :

१. जोपर्यंत ‘मला व्यष्टी साधना करायचीच आहे, व्यष्टी साधना करूनच मला मोक्षप्राप्ती होणार आहे’, असा बुद्धीने निश्चय होत नाही, तोपर्यंत व्यष्टी साधना होणे अशक्य आहे.

२. व्यष्टी साधनेत टाळाटाळ करण्यामध्ये आपल्या मनाचा अडथळा असतो. ‘व्यष्टी साधना पूर्ण करणे’, हे गुरुदेवांचे आज्ञापालन असून ‘आज्ञापालन करणे’, हा शिष्याच्या सर्व गुणांचा राजा आहे.

३. ‘आज दिवसभरात माझ्याकडून झालेल्या चुका मी स्वभावदोष निर्मूलन सारणीत लिहून गुरुदेवांना अर्पण केल्या नाहीत, तर त्या चुका लिहिण्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल’, असा मी भाव ठेवतो.

४. ‘गुरुदेवांनी सांगितलेली ‘अष्टांग साधना’ (टीप) त्या त्या दिवशीच त्यांच्या चरणी अर्पण करायची’, असा भाव ठेवून प्रयत्न केल्यामुळे मला मिळणारा आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही.

(टीप – १. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण- संवर्धन, २. अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, ५. सत्संग, ६. सत्सेवा, ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)’)

(क्रमशः)

(२०.७.२०२४ या दिवशी झालेल्या सत्संगात पू. संदीप आळशी यांनी केलेले मार्गदर्शन)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/901105.html