सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांनी घेतलेल्या एका सत्संगात ग्रंथ आणि कला यांच्याशी संबंधित सेवा करणार्या साधकांनी त्यांना साधनेतील काही अडचणी विचारल्या. त्यावर पू. संदीपदादा आणि साधक श्री. रामानंद परब यांनी साधकांना मार्गदर्शन केले. ९ आणि १०.४.२०२५ या दिवशी या मार्गदर्शनातील काही भाग आपण पाहिला. आज या मार्गदर्शनातील अंतिम भाग येथे दिला आहे. (भाग ३)
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/901105.html

३ ए. परिस्थितीवर मात करता येण्यासाठी प्रत्येक कृतीला भावजागृतीसाठीचे प्रसंग जोडावेत !
एक साधिका : मी सारणीत चुका लिहितांना त्याला जोडून भावजागृतीचा प्रयत्न म्हणून घडलेला प्रसंग देवाला आत्मनिवेदन करत लिहिते. सारणीत स्वयंसूचना लिहितांना ‘देवच मला दृष्टीकोन सुचवत आहे’, असा भाव ठेवते. ‘चुकीमागील स्वभावदोष कोणता ?’, हेसुद्धा देवाला विचारून लिहिते. यामुळे केवळ ४ – ५ चुका लिहिल्या, तरी मला आनंद मिळतो.
‘चुका लिहितांना वहीच्या चारही बाजूंना देवतांच्या नामजपाचे मंडल काढून त्यात चुका लिहिल्या, तर त्याचा स्वभावदोष निर्मूलनावर चांगला परिणाम होतो’, असे लक्षात आले.
एक साधिका : भावजागृतीसाठी मला येता-जाता भजने म्हणायला किंवा ऐकायला आवडते. तेही एक अनुसंधान असते. त्यामुळे देवाची आठवण येते. त्या बळावर साधनेचे पुढचे प्रयत्न करता येतात. ‘माझ्याकडून कोणते प्रयत्न झाले नाहीत’, हे आठवण्यापेक्षा देवाच्या अनुसंधानात रहायला हवे. ‘त्यातून निर्माण झालेली सकारात्मकता पुढच्या प्रयत्नांसाठी आपल्याला साहाय्य करते’, असे मला जाणवले.
३ ऐ. साधनेचे प्रयत्न होण्यासाठी मनाचा निश्चय होणे आवश्यक !
एक साधिका : सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत साधनेचे जे प्रयत्न करतो, ते माझ्यासाठी युद्ध असल्यासारखेच असतात. प्रत्येक प्रसंगागणिक मनात सकारात्मक आणि नकारात्मक विचार चालू असतात. ‘मला जमलंच पाहिजे. जमत कसं नाही ?’, असा निश्चय कठोरतेने केला की, ते साध्य होते.
३ ओ. प्रतिकूल काळात साधकांकडून साधनेचे प्रयत्न होणे, ही गुरुकृपाच असून काळ अनुकूल झाल्यावर साधकांना स्वतःवर होणारे चांगले परिणाम दिसू लागतील !
श्री. रामानंद परब : गुरुदेवांनी सांगितले आहे की, ‘काळ प्रतिकूल असल्याने आपल्याकडून जे जे प्रयत्न होत आहेत, तीच गुरुकृपा आहे !’ त्यामुळे ‘गुरु करवून घेतात’, हा कृतज्ञताभाव साधकांनी वाढवायला हवा. आपण नामजपादी उपायांना बसल्यावर शेवटी एकाग्रता होते; कारण उपायांना बसल्यावर वातावरणातील वाईट शक्तींनी आपल्यावर आणलेले त्रासदायक आवरण निघून जाते. उपायांमध्ये आपले मन एकाग्र होत नसले, तरी आपल्या शरिरातील नकारात्मक शक्ती निघून जाण्यासाठी तो वेळ वापरला जातो आणि नंतर आपली एकाग्रता साधते.
उपायांच्या वेळेत उपाय केलेच पाहिजेत. ‘तो वेळ सेवेला देऊया’, हा विचार चुकीचा आहे. ‘आपल्याकडून गुरूंचे आज्ञापालन होत आहे ना ?’, हे पहाणे सर्वांत महत्त्वाचे आहे. जरी स्वयंसूचनांची सत्रे वाचून करावी लागली, तरी ‘दिवसभरात १० सत्रे होत आहेत ना ?’, हे पहाणे महत्त्वाचे आहे. काळ प्रतिकूल असतांना ‘काहीच प्रयत्न न करण्यापेक्षा थोडेफार प्रयत्न होत आहेत’, हे महत्त्वाचे आहे. काळ जसजसा अनुकूल होत जाईल, तसतसे आपल्यावर होणारे चांगले परिणाम दिसायला लागतील. तेव्हा आपल्याकडून प्रयत्न सहजपणे होतील; पण आज प्रयत्न केले नाहीत, तर अनुकूल काळातही ते होणार नाहीत.
३ ओ १. साधनेच्या प्रयत्नांना भावजागृतीची जोड दिल्यास साधकांना आनंदी रहाता येईल ! – पू. संदीप आळशी
पू. संदीप आळशी : आध्यात्मिक त्रासामुळे आपले मन आणि बुद्धी यांवर काळे (त्रासदायक) आवरण येते. त्यामुळे पूर्वीसारखा ‘आनंद मिळणे, भाव जागृत होणे’ यांचे प्रमाण न्यून असले, तरी आपण प्रयत्न करणे सोडायचे नाही. प्रयत्नांना भावजागृतीची जोड दिल्यास आनंदी रहाता येईल. मलाही आध्यात्मिक त्रास आणि आजारपण यांमुळे कंटाळा अन् थकवा येतो. त्यामुळे प्रयत्न करण्याची शक्तीही न्यून होत जाते; पण ते स्वीकारायला हवे.
आपण भावाच्या स्तरावर राहू, तेवढे त्या प्रसंगात आनंदी राहू शकतो. परिस्थितीवर मात करण्यासाठीच ‘साधना’ आहे. परिस्थितीसमोर हतबल झालो, तर ‘साधना’ होणार नाही. पूर्वी आम्ही मुंबई येथील सेवाकेंद्रात गुरुदेवांकडे रहायला असतांना त्यांनी स्वतः आमच्यावर औषधोपचार केले होते. ते आमची चौकशी करायचे. त्यांनी आमची पुष्कळ काळजी घेतली आहे. आता ‘त्यांना प्रत्यक्षात येऊन माझी काळजी घेणे शक्य नाही; पण ‘साधकांच्या माध्यमातून ते आजही माझी काळजी घेतच आहेत’, हा भाव ठेवला, तर मनाला चांगले वाटते. कंटाळवाण्या स्थितीतही आनंद मिळवायचा असेल, तर सोपा आणि सहज करता येण्यासारखा भावजागृतीचा प्रयत्न करायचा. एकदा भाव ठेवण्याची सवय आणि वृत्ती झाली की, आपण कोणत्याही प्रसंगात आनंदी राहू शकतो, तसेच एखादा प्रसंग घडला की, मन अस्थिर न होता भावाचे विचार प्रथम येऊ लागतील.
३ ओ २. भाववृद्धीच्या संदर्भात करावयाचे प्रयत्न
पू. संदीप आळशी : साधकांनी सेवेच्या ठिकाणी ‘सामूहिक स्तरावर काही प्रयत्न वाढवू शकतो का ?’, याचा विचार करावा. त्यामुळे सगळ्यांकडून प्रयत्न होतील. मी सुश्री (कु.) हर्षदा दातेकर यांना भाववृद्धीच्या संदर्भात प्रयत्न करायला सांगितले होते. त्यानुसार प्रयत्न केल्यावर त्यांना आलेले अनुभव त्या सांगतील.
३ ओ २ अ. दैनंदिन कृती करतांना सुश्री (कु.) हर्षदा दातेकर यांनी भावजागृतीसाठी प्रयत्न केल्याने त्यांच्यात भावस्थिती निर्माण होणे
सुश्री (कु.) हर्षदा दातेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे) : मला भावजागृतीचे जे प्रयत्न आवडतात किंवा सहज जमतात, ते मी लिहून काढले. ‘चालणे, जेवणे, रुग्णाईत बाबांना जेवण भरवणे आदी कोणत्या कृतींना भावजागृतीचे प्रयत्न जोडू शकते’, ते मी लिहून काढले आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न केला. मी निवासस्थानाहून चालत रामनाथी आश्रमात येतांना रस्त्याला प्रार्थना करायचे आणि ‘मी देवाकडे चालले आहे’, असा भाव ठेवायचे. त्यामुळे तेवढा वेळ देवाची आठवण रहायची.

३ ओ २ आ. प्रत्येकी १ घंट्याने केवळ अर्ध्या मिनिटाचा छोटासा भावप्रयोग केल्यास त्या अर्ध्या मिनिटातही पुष्कळ ऊर्जा मिळते ! – पू. संदीप आळशी
पू. संदीप आळशी : मी हर्षदा यांना हेही सांगितले होते की, प्रत्येकी १ घंट्याने केवळ अर्ध्या मिनिटाचा छोटासा भावप्रयोग करायचा, उदा. ‘गुरुदेवांचे चरण माझ्या डोक्यावर आहेत.’ ‘मी त्यांच्या चरणांवर माझे मस्तक ठेवले आहे’, इत्यादी. त्या अर्ध्या मिनिटातही आपल्याला पुष्कळ ऊर्जा मिळते. त्यामुळे माझ्याही मनाची स्थिती चांगली होते आणि मनाला थोडीतरी उभारी येऊन उत्साह निर्माण होतो. ती अवस्था आली की, मग प्रार्थना करून स्वयंसूचना सत्र करायचे. सेवेच्या ठिकाणीही असा प्रयोग करता येईल. प्रत्येकी १ घंट्याने छोटे छोटे भावप्रयोग करायचे. भावासाठी अनुकूल असलेल्या वातावरणाचा आपल्या मनावर परिणाम चांगला होतो. मी खोलीत एकटा असलो की, मला आवडणारी भजने आणि नामजप लावून ठेवतो. त्यामुळे मला त्या वातावरणात रहाता येते.
आपल्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण सारखे येत रहाते. त्यामुळे साधनेचे प्रयत्न करावेसे वाटत नाहीत. प.पू. डॉक्टरांनी आपल्याला उपायांसाठी अनेक साधने दिली आहेत. प्रत्येक १ घंट्याने अत्तराचा सुगंध घ्यायचा. कापूर लावायचा. मी माझ्या खोलीत एक उदबत्तीही लावून ठेवतो. सेवा करतांना मी ‘माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊ देत’, अशी प्रार्थना करतो. त्यामुळे माझ्यावर उपाय होत रहातात आणि मी सेवा करत रहातो. या उपायांचा १०० टक्के नाही; पण काहीतरी प्रमाणात लाभ होणारच आहे.
३ ओ ३. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्यावर साधकांनी आध्यात्मिक उपायांमध्ये नियमितता आणणे आणि त्यामुळे साधकांचे त्रास न्यून होऊन त्यांच्या कौटुंबिक समस्या सुटायला आरंभ होणे
श्री. रामानंद परब : साधारण १० – १२ वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले होते, ‘‘सगळीकडे त्रासाची तीव्रता पुष्कळ वाढली असून साधकांच्या कौटुंबिक अडचणींतही वाढ झाली आहे. अशा स्थितीतही साधक सेवा आणि साधना करत आहेत; पण काही वेळा त्यांना ते करणेही जमत नाही.’’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे साधकांनी आध्यात्मिक स्तरावरील उपायांमध्ये नियमितता आणली. त्यानंतर साधकांच्या कौटुंबिक समस्या सुटायला आरंभ झाला. त्यांच्या त्रासाची तीव्रता न्यून झाली आणि संस्थेचे कार्यही वाढू लागले. यातून हे लक्षात येते की, आपण आध्यात्मिक उपाय केले, तर देव आपल्याला साहाय्य करतो.
३ ओ ४. प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांमुळे होणारे उपाय : प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांमध्येही पुष्कळ सामर्थ्य आहे. वर्ष २०१२ मध्ये एक साधिका तिच्या बाळाला घेऊन रामनाथी आश्रमात आली होती. गुरुदेवांनी तिला सांगितले, ‘‘बाळाच्या कानाजवळ हळू आवाजात प.पू. बाबांची भजने लावून ठेवा. ती भजने ऐकूनच बाळाची आध्यात्मिक पातळी वाढेल.’’ मलाही पूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना गुरुदेवांनी २४ घंटे प.पू. बाबांची भजने ऐकण्यास सांगितले होते. त्यामुळे माझा आध्यात्मिक त्रास लवकर न्यून होत गेला आणि माझ्या साधनेच्या प्रयत्नांना गती मिळाली.
३ ओ ५. सध्या आपत्काळ असला, तरी तो संधीकाळही असल्याने साधनेचे थोडे जरी प्रयत्न झाले, तरी त्याचे फळ अधिक प्रमाणात मिळत असल्याचे पू. संदीप आळशी यांनी सांगणे
पू. संदीप आळशी : एक मोठे व्यावसायिक आहेत. पूर्वी जेव्हा त्यांचा व्यवसाय नुकताच चालू झाला होता, तेव्हाचा हा प्रसंग आहे. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पुष्कळ श्रम आणि धडपड करावी लागते. ते कार्यालयामध्ये रिकाम्या वेळेत, घरातून कार्यालयात जातांना, तसेच कार्यालयातून घरी आल्यावर एका चित्रपटातील ‘मुझे जीतना है मुझे जीतना है । हर हाल में लक्ष्य को पाना है ।’ हे गाणे ऐकायचे. ते म्हणाले, ‘‘या गाण्याचा माझ्या मन आणि बुद्धी यांच्यावर इतका परिणाम झाला की, मी सगळे प्रयत्न चिकाटीने करायला लागलो. त्यामुळे मी माझे व्यावसायिक लक्ष्य साध्य करू शकलो.’’
आताचा आपत्काळ आपल्याला अतिशय कठीण वाटतो; पण हा काळ संधीकाळही आहे. ‘या काळात साधनेचे थोडे जरी प्रयत्न केले, तरी त्याचे फळ अधिक प्रमाणात मिळते’, हे या संधीकाळाचे महत्त्व आहे. एखाद्या आईच्या दोन मुलांपैकी एका मुलाची प्रकृती सारखी ठीक नसते. अशा वेळी तिचे त्याच्याकडेच जास्त लक्ष जाईल. देवाचेही असेच आहे. संपत्काळात जे साधक प्रयत्न करतात, त्यांच्याकडेही देवाचे लक्ष असतेच; पण आपत्काळात साधना करणार्या साधकांकडे त्याचे लक्ष अधिक प्रमाणात असते. गुरुदेवांनी आपल्याला एका मोठ्या संरक्षक कवचामध्ये ठेवले आहे आणि ते आपल्याला अध्यात्मात पुढे घेऊन जातच आहेत. केवळ १ – २ वर्षे आपल्याला साधनेचे प्रयत्न वाढवायचे आहेत.
३ ओ ६. स्वयंसूचनांचे सत्र करतांना सकारात्मक आणि योग्य दृष्टीकोन घेतल्याने साधिकेने तिची तळमळ वाढल्याचे अनुभवणे
एक साधिका : काही दिवसांपूर्वी मला एका स्वभावदोषावर मात करता येत नव्हती. त्यासाठी आवश्यक असणारी माझी तळमळ न्यून पडत होती. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘कृष्णजन्म झाल्यावर सगळ्या गोप-गोपींनीही जन्म घेतला होता, तसेच गुरुदेवांच्या कार्यासाठी त्यांनीच आपल्याला निवडले आहे.’ त्यामुळे ‘देवाने मला साधनेसाठीच जन्म दिला आहे’, अशी स्वयंसूचना मी घेऊ लागले. त्यामुळे माझी तळमळ वाढली. हा पालट झाल्याचे मला केवळ ४ – ५ दिवसांतच लक्षात आले.
पू. संदीपदादा : भाव असेल, तरच देवाची कृपा ग्रहण करू शकतो !’
(२०.७.२०२४ या दिवशी झालेल्या सत्संगात पू. संदीप आळशी यांनी केलेले मार्गदर्शन) (समाप्त)
|