आयात शुल्काच्या प्रकरणावर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिली माहिती
नवी देहली – अमेरिकेच्या आयात शुल्काच्या वाढीच्या परिणामांचे मूल्यांकन करणे फार घाईचे ठरेल; परंतु भारताने वर्षाच्या अखेरीस अमेरिकेसमवेत द्विपक्षीय व्यापार करार करण्याची धोरणात्मक योजना आखली आहे, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना दिली.
डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की,
१. भारताने या प्रकरणावर अतिशय संतुलित आणि विचारशील प्रतिसाद दिला आहे. त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय होईल ?, हे आम्हालाही अद्याप ठाऊक नाही. त्यामुळेच आम्ही घाईघाईने त्यावर प्रतिक्रिया देणार नाही. आम्ही करार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.
२. डॉनल्ड ट्रम्प दुसर्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेसमवेत व्यापार करारासाठी तत्त्वतः करार करणारा भारत हा कदाचित् एकमेव देश आहे. आम्ही निर्णय घेतला आहे की, या सूत्रावर ट्रम्प प्रशासनाशी लवकरच चर्चा केली जाईल आणि या वर्षाच्या अखेरीस द्विपक्षीय व्यापार करारावरील चर्चा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.