दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष लेखमाला !
‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची पत्रकारिता समाजाभिमुख आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक क्षेत्रांतील अपप्रवृत्तींच्या विरोधात ‘सनातन प्रभात’ने सातत्याने आवाज उठवला. शोध पत्रकारितेद्वारे ‘सनातन प्रभात’ने भ्रष्टाचार उघड केला. ‘सनातन प्रभात’मधील सत्य आणि वस्तूनिष्ठ वृत्तांकनामुळे अपप्रवृत्तींना प्रतिबंध बसला. या वृत्तांकनाचे उमटलेले पडसाद दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या या विशेष लेखमालेद्वारे दिले आहेत.

शिवकालीन गड-दुर्ग म्हणजे जिहादी धर्मांधांना पराभूत करून छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक आहे. या प्रतिकांतून हिंदूंना क्षात्र आणि धर्म तेज प्राप्त होते. त्यामुळे हिंदूंना तेजोहीन करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे होते’, ‘त्यांच्या सैन्यांमध्ये मुसलमान अधिक होते’, ‘छत्रपती शिवरायांचा लढा मुसलमानांच्या विरोधात नव्हता आदी इतिहासाच्या हिरवेकरणाचा ‘फेक नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) जाणीवपूर्वक चालू आहे. गड-दुर्ग यांचे हिरवेकरण हे यातील एक नियोजनबद्ध षड्यंत्र आहे, हे ‘सनातन प्रभात’ने सप्रमाण उघड केले.

१. लोहगडावर मुसलमान फकीराला प्रस्थापित करून दर्गा बांधण्याचे षड्यंत्र !
पुणे जिल्ह्यातील लोहगडावर काही वर्षांपूर्वी अवैधरित्या मजार बांधून हाजी हुसेन बाबा शेख नावाचा एका मुसलमानाने लोहगडावर उरूस (जत्रा) चालू केला. ‘हाजी हजरत उमरशहावली बाबा दर्गा’ असे नाव देऊन या मजारीवर दर्गा उभारण्याचे काम चालू केले. अवैध उरूस आणि दर्गा यांविरोधात दैनिक ‘सनातन प्रभात’ने सातत्याने वृत्तांकन केले. त्यामुळे काही प्रमाणात या अवैध गोष्टींना आळा बसला आहे. दर्ग्याचे काम थांबवण्यात आले आहे.
२. माहीम गडावरील अतिक्रमणाचा प्रश्न लावून धरला !
मुंबईतील राज्य संरक्षित असलेल्या माहीम गडाच्या प्रवेशद्वारावर राज्य पुरातत्व विभागाचा ‘राज्य संरक्षित वास्तू’ हा फलक केवळ नावालाच होता. गडाचे प्रवेशद्वार लोखंडी जाळीने बंद करून संपूर्ण गडावर अतिक्रमण करण्यात आले होते. ‘सनातन प्रभात’ने हा प्रश्न लावून धरला. वर्ष २०२३ मध्ये या गडावरील अतिक्रमण सरकारने हटवले.
३. कुलाबा गडावरील अवैध मजारचा प्रश्न मांडला !
मुंबईतील कुलाबा गडावर वर्ष २०१९-२० च्या कालावधीत मुसलमानांनी एक थडगे बांधले. स्थानिक शिवप्रेमींना लक्षात आल्यावर त्यांनी हे थडगे हटवले; मात्र मुसलमानांनी त्या ठिकाणी थडगे बांधून त्यावर पक्के बांधकाम केले आहे, हे दैनिक ‘सनातन प्रभात’ने उघड केले.
४. दुर्गाडी किल्ल्यावर ईदगाहचा प्रश्न !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली, त्या कल्याण येथील दुर्गाडी गडावरील श्री दुर्गाडी मंदिराच्या मागील भिंत ‘ईदगाह’ (ईदच्या दिवशी नमाजपठण करण्याची जागा) असल्याचा दावा मुसलमानांनी केला आहे. गडावरील अर्ध्या भागावर हिंदूंना कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
५. शिवडी गडाच्या प्रवेशद्वारावर दर्गाचे प्रस्थ !
मुंबईतील शिवडी गडाच्या प्रवेशद्वारावर ‘दरगाह शरीफ हजरत सैय्यद जलाल शाह’ या नावाने दर्गा बांधला असून गडाच्या एक एकर भूमीत या दर्ग्याचा विस्तार करण्यात आला आहे. दर्ग्याच्या देखभालीसाठी येथे मुसलमान कुटुंबही वसवण्यात आले आहे. दर्ग्याभोवती हिरवे ध्वज लावण्यात आले आहेत. ‘मुसलमानांचे धार्मिक स्थान’ म्हणून हे प्रस्थ निर्माण केले जात आहे.
६. मलंगगडावरील अतिक्रमणाची भयावहता उघड केली !
ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर नवनाथांपैकी ७ नाथांच्या समाध्या आहेत, तसेच हे नाथपंथीय साधू मलंगबाबा यांचे समाधीस्थान आहे. वर्ष २००४ मध्ये आघाडी सरकारच्या काळात सरकारने या भूमीला वक्फ मंडळाची भूमी असल्याचे घोषित केले आहे. काही वर्षांपासून मुसलमान स्वत:ची वस्ती वाढवून मलंगगड बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत.
– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई. (१७.३.२०२५)
अतिक्रमण हटवले आणि गड-दुर्ग संवर्धनाच्या कामाला प्रारंभ !
विशालगड, धारावी गड, राजगड, वंदनगड, गणेश-पार्वती पर्वत आदी गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणाचे भयावह स्वरूप मांडणारी लेखमाला दैनिक ‘सनातन प्रभात’ने प्रसिद्ध केली. परिणामी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी गड-दुर्ग यांवरील अवैध बांधकाम हटवण्यासाठी आंदोलन उभारले. यामुळे गड-दुर्ग यांवरील अवैध बांधकामाची पहाणी करण्यासाठी केंद्रशासनाच्या सांस्कृतिक विभागाला महाराष्ट्रात पथक पाठवावे लागले. वर्ष २०२४ पासून महायुती सरकारने गड-दुर्ग यांवरील अवैध बांधकाम हटवण्याला प्रारंभ आहे, तसेच गड-दुर्ग यांचे संवर्धन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वस्तूनिष्ठ वृत्तांकनाचे हे मोठे यश म्हणावे लागेल.
– श्री. प्रीतम नाचणकर