दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष लेखमाला !
‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची पत्रकारिता समाजाभिमुख आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक क्षेत्रांतील अपप्रवृत्तींच्या विरोधात ‘सनातन प्रभात’ने सातत्याने आवाज उठवला. शोध पत्रकारितेद्वारे ‘सनातन प्रभात’ने भ्रष्टाचार उघड केला. ‘सनातन प्रभात’मधील सत्य आणि वस्तूनिष्ठ वृत्तांकनामुळे अपप्रवृत्तींना प्रतिबंध बसला. या वृत्तांकनाचे उमटलेले पडसाद दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने या विशेष लेखमाले द्वारा देत आहोत.

१. देवतांच्या दागिन्यांचे मूल्यांकन होत नसल्याचा गंभीर प्रकार केला उघड !
समस्त महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूरचा श्री विठोबा आणि देवी श्री रुक्मिणी यांच्या मंदिराचे वर्ष १९८५ मध्ये सरकारीकरण झाले. तेव्हापासून देवतांच्या दागिन्यांचे मूल्यांकन होत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदींनी भगवंताला अर्पण केलेल्या दागिन्यांचा यात समावेश होता. ‘दागिन्यांचे लवकरच लेखापरीक्षण करू’, हे नमूद करत देवस्थान समिती गेल्या ३८ वर्षांपासून भाविकांची फसवणूक करत होते. दैनिक ‘सनातन प्रभात’ने वर्ष २०२३ मध्ये हा प्रकार पुराव्यासह उघड केला आणि हे सूत्र लावून धरले. ‘सनातन प्रभात’मधील वृत्तावरून हिंदु जनजागृती समितीने समस्त वारकर्यांसह आंदोलनाचा पवित्रा घेतला. देवस्थानमधील तत्कालीन पदाधिकार्यांनी कायदेशीर कारवायांची भीतीही दाखवली; परंतु दैनिक ‘सनातन प्रभात’ने वस्तूनिष्ठ वृत्तांकन चालूच ठेवले. अन्य वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे यांनीही हे सूत्र उचलून धरले. परिणामी देवतांच्या दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी देवस्थानला लेखापरीक्षकांची नियुक्ती करावी लागली.

२. लाखो रुपये भाडे देऊनही सुलभ शौचालये बांधली नाहीत !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती आणि रेल्वे खाते यांच्यात ३५ वर्षांसाठी सुलभ शौचालय बांधण्याचा करार झाला. त्यासाठी मंदिर समितीने २१ मार्च २०१७ या दिवशी रेल्वे खात्याला १ कोटी ५४ लाख ४६ सहस्र ४१ रुपये भाडे दिले; मात्र पुढील ५ वर्षे शौचालय बांधकामाला प्रारंभही केला नाही. त्यामुळे भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या लाखो रुपयांचा अपव्यय झाला.
३. भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणार्या लाडवांमध्ये घोटाळा !
भक्तांना प्रसादासाठी लाडू बनवण्याचा ठेका श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने महिला बचत गटांना दिला. ‘लाडवांमध्ये सुका मेवा (ड्रायफूट), तसेच अन्य पौष्टिक पदार्थ वापरावेत’, तसेच ‘शेंगदाण्याच्या तेलाचा वापरावे’, असे निश्चित करूनही सुका मेवा वापरला जात नव्हता. शेंगदाण्याच्या तेलाऐवजी ‘कॉटन सीड्स’ (कापूस बियाणे) तेलाचा वापर केला जात होता. हा घोटाळा दैनिक ‘सनातन प्रभात’ने लेखापरीक्षण अहवालातील पुराव्यासह उघड केला.
दैनिक ‘सनातन प्रभात’ने या सर्व अपप्रकारांना वाचा फोडली आणि या गंभीर प्रकाराच्या विरोधात संपूर्ण राज्यातील भाविकांचा जनक्षोभ उसळला. परिणामी देवस्थान समितीला पत्रकार परिषद घेऊन मंदिरात झालेले अपप्रकार मान्य करावे लागले आणि यावर कोणती कार्यवाही करणार, याविषयीची माहिती द्यावी लागली.
– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई. (१६.३.२०२५)