श्रीगुरु रामचंद्र महाराज यादवमठात श्री एकनाथ षष्ठी साजरी !

कोल्हापूर, २० मार्च (वार्ता.) – साकोली कॉर्नर येथील श्रीगुरु रामचंद्र महाराज मठात शांतीब्रह्म संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांची पुण्यतिथी म्हणजेच श्री एकनाथ षष्ठी साजरी करण्यात आली. यात सकाळी १० ते १२ कीर्तन, दुपारी १२.३० वाजता पुष्पवृष्टी आणि दुपारी १२.३० वाजता अधिवक्ता आप्पासाहेब भोसले यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले. या वेळी जगन्नाथ महाराज पाटील यांनी संत एकनाथ महाराजांचा अभंग ‘प्रत्यक्ष परब्रह्म। भानुदासाची कुळी स्वये वनमाळी अवतरले ।।’ यावर निरूपण केले.

या वेळी ह.भ.प. महादेव महाराज यादव, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज यादव, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज यादव, राजेश सुतार, राजेंद्र वेल्हाळ, नरकेकाका, दत्ता महाराज पाटील, अनिल ईराची यांसह अन्य उपस्थित होते. या संदर्भात ह.भ.प. महादेव महाराज यादव म्हणाले, ‘‘आमच्या मठाची गेल्या १०० वर्षांहून अधिक वारकरी परंपरा असून येथे कीर्तन, ज्ञानेश्वरी वाचन, तुकाराम गाथा पारायण चालते. आता आमची ७ वी पिढी सेवारत आहे. एकनाथ षष्ठीच्या निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम घेण्यात आले.’’