‘गाभार्‍यात जाऊन श्री काशी विश्वनाथाचे दर्शन-पूजा करता येणे’, ही भगवान शिवाची लीला आणि कृपा अनुभवणार्‍या फोंडा, गोवा येथील सौ. श्वेता क्लार्क !

‘माझी आई वाराणसी (उत्तरप्रदेश) सेवाकेंद्रात राहून पूर्णवेळ साधना करते. ती मला भेटण्यासाठी माझ्याकडे गोव्याला आली होती. काही दिवसांनी मी आईला वाराणसी सेवाकेंद्रात सोडण्यासाठी गेले होते. वर्ष २००८ नंतर अनेक वर्षांनी मी वाराणसी येथे गेले होते. तेव्हा श्री काशी विश्वनाथाचे दर्शन घेतांना मी अनुभवलेली भगवान शिवाची कृपा आणि लीला येथे दिली आहे.

सौ. श्वेता क्लार्क

१. वाराणसी येथील विमानतळावर उतरल्यावर सूक्ष्मातून सर्वत्र भगवान शिवाची विविध रूपे दिसून ‘संपूर्ण वातावरण शिवतत्त्वाने भारित आहे’, असे अनुभवणे : आम्ही वाराणसी विमानतळावर उतरल्यापासून मला सूक्ष्मातून सर्वत्र भगवान शिवाची विविध रूपे दिसू लागली. ‘येथील संपूर्ण वातावरण शिवतत्त्वाने भारित आहे’, असे मला जाणवले. मला आतून पुष्कळ आनंद जाणवत होता आणि मनात केवळ शिवाचे विचार होते. मी बाह्यरित्या व्यावहारिक कृती करत असले, तरी माझे मन शिवभक्तीत आकंठ बुडाले होते. ‘मी वाराणसीला येणे’, हा निव्वळ योगायोग नसून भगवान शिवाने माझ्यासाठी केलेले दैवी नियोजन होते. त्यानेच मला वाराणसीला बोलावले आहे’, असे मला जाणवले.

२. साधिकेच्या मनात श्री काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्याची तीव्र ओढ निर्माण होणे आणि शिवाने सूक्ष्मातून ‘मलाही तुला भेटायचे आहे’, असे  सांगणे : मी या पूर्वी काही वेळा वाराणसीला आले होते; मात्र भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे स्थान असलेल्या श्री काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्याची संधी मला मिळाली नव्हती. त्यामुळे या वेळी मला भगवान शिवाचे दर्शन घेण्याची तीव्र ओढ निर्माण झाली होती. ‘येथील शिवलिंग अत्यंत जागृत असून तिथे प्रचंड ऊर्जा आहे’, असे मला जाणवत होते. मी भगवान शिवाला प्रार्थना केली, ‘बाबा, (‘भगवान शिव माझी काळजी घेणारे पिता आहेत’, असा माझा भाव आहे. – सौ. श्वेता) मला तुमचे दर्शन घ्यायचे आहे.’ भगवान शिव सूक्ष्मातून म्हणाला, ‘ये बाळा, मी कधीपासून तुझी वाट पहात आहे. मलाही तुला भेटायचे आहे.’

३. ‘देवदर्शन घेण्यासाठी न्यूनतम ४ – ५ घंटे रांगेत उभे रहावे लागेल’, असे साधकांनी सांगणे : माननीय पंतप्रधान श्री. मोदी यांनी अलीकडे श्री काशी विश्वनाथ देवस्थानाचे नूतनीकरण केले आहे. त्यामुळे जगभरातून पुष्कळ लोक श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी येतात. वाराणसी येथील साधकांनी मला सांगितले, ‘‘तुम्हाला देवदर्शनासाठी न्यूनतम ४ – ५ घंटे रांगेत उभे रहावे लागेल. गाभार्‍यात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेण्याची आता कुणालाच अनुमती नाही. देवाच्या नुसत्या दर्शनासाठीही पुष्कळ मोठी रांग असते. ‘देवाचे दुरून दर्शन झाले’, तरी ती भाग्याची गोष्ट आहे. रांग मोठी असेल, तर तुम्ही विशेष महनीय व्यक्तींसाठी असलेले अनुमतीपत्र (व्हि.आय.पी. पास) घेऊ शकता; पण ते अनुमतीपत्र मिळाले, तरीही दर्शनाची निश्चिती नसते’’; मात्र भगवान शिव सूक्ष्मातून मला म्हणत होता, ‘तू केवळ ये, मी तुझी वाट पहात आहे.’

४. भगवान शिवाची अनुभवलेली कृपा आणि लीला !

४ अ. मंदिरात दर्शनार्थींची रांग पुष्कळ लहान असणे आणि केवळ २० मिनिटांतच गाभार्‍याजवळ पोचणे : एक साधक मला श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी घेऊन गेले. भगवान शिवाच्या कृपेने मला येथे पुष्कळ अनुभूती आल्या. वाराणसी सेवाकेंद्रातून श्री काशी विश्वनाथ मंदिरापर्यंत पोचायला साधारण ४० मिनिटे लागतात. तो संपूर्ण वेळ माझा ‘हर हर महादेव !’ असा नामजप भावपूर्णपणे आणि उत्साहाने होत होता. माझी भावजागृती होऊन डोळे भावाश्रूंनी भरले होते. आम्ही मंदिरात पोचलो, तेव्हा तेथे दर्शनासाठीची रांग पुष्कळ लहान होती. केवळ २० मिनिटांत आम्ही गाभार्‍यासमोर पोचलो.

४ आ. ‘भगवान शिव डमरू वाजवत असून स्वतः शिवगणांसह नृत्य करत आहे’, असे जाणवणे : त्या २० मिनिटांत मला सूक्ष्मातून दिसले, ‘जगभरातील पुष्कळ शिवभक्त मंदिरात आले आहेत. मंदिरातील आम्ही सर्व जण शिवाचे गण असून शिवाच्या भक्तीत लीन झालो आहोत. भगवान शिव डमरू वाजवत असून मी सर्व शिवगणांसह आनंदाने नृत्य करीत आहे. आम्ही प्रत्यक्ष शिवलोकात आहोत.’ मला वेळेचे भान नव्हते. मी भगवान शिवाला प्रार्थना केली, ‘बाबा, माझ्यावर कृपा करा ! शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण क्षमतेने प.पू. गुरुदेवांची सेवा करण्यासाठी मला सतत मार्गदर्शन करा. मला तुमच्या पावन चरणांशी ठेवा. तुम्ही माझ्या जीवनात आहात’, यासाठी मी तुमच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

४ इ. साधिका गाभार्‍याजवळ येताक्षणी अकस्मात् मंदिर प्रशासनाने गाभार्‍यासमोर लावलेले अडथळे दूर करणे आणि साधिकेला शिवलिंगावर अभिषेकादी उपचार करता येणे : नेहमीप्रमाणे भक्तांना लवकर दर्शन घेऊन बाहेर जाण्यास सांगितले जात होते. ‘लोकांनी गाभार्‍यात जाऊ नये’, यासाठी गर्भगृहासमोर अडथळे (बॅरिकेड्स) लावले होते; परंतु मी जेव्हा गाभार्‍याजवळ आले, तेव्हा अकस्मात् मंदिर प्रशासनाने तेथील अडथळे दूर केले आणि सर्व दर्शनार्थींना गाभार्‍यात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घ्यायला सांगितले. भगवान शिव सूक्ष्मातून मला म्हणाला, ‘माझी मुलगी आली आहे. त्यामुळे अडथळे लावण्याची आवश्यकता नाही. आत ये ! मला तुला मन भरून पाहू दे !’ आम्ही आत गेलो. तेथे मला शिवलिंगावर अभिषेक करता आला. बेलपत्र आणि फुलांचा हार अर्पण करता येऊन मनोभावे नमस्कार करता आला.

४ ई. शिवलिंगाला भस्म लावतांना शिवलिंगाच्या स्पर्शातून पुष्कळ शक्ती मिळून घाम येणे : मी शिवलिंगाला भस्म लावले, तेव्हा मला तो स्पर्श पुष्कळ गार आणि प्रेमळ वाटला. ‘मी माझ्या बाबांच्या प्रेमळ मांडीवर बसले आहे’, असे मला जाणवले. त्या स्पर्शातून पुष्कळ शक्ती मिळाल्यामुळे वाराणसीत पुष्कळ थंडी असूनही मला घाम येऊ लागला.

४ उ. देवाच्या कृपेने शांतपणे एकटीकडूनच देवाची पूजा केली जाणे : मी शिवलिंगाची पूजा करत असतांना अनेक लोक शिवलिंगाचे दर्शन आणि पूजा करण्याचा प्रयत्न करत होते, तरीही ‘मी एकटीच महादेवाची पूजा करत आहे’, असे मला जाणवत होते. तेथील पुजारी इतर लोकांना पूजा लवकर आटोपून गाभार्‍याच्या बाहेर जायला सांगत होते; मात्र ते मला काहीच बोलत नव्हते.

४ ऊ. पुजार्‍याने कपाळाला भस्म लावल्यावर ‘सकारात्मक शक्तीचा प्रचंड प्रवाह शरिरात प्रवेश करत आहे’, असे जाणवणे : एका पुजार्‍याने मला बोलावून शिवलिंगावरील भस्म माझ्या कपाळाला लावले. तेव्हा मला ‘सकारात्मक शक्तीचा प्रचंड प्रवाह माझ्या शरिरात प्रवेश करत आहे’, असे जाणवले. नंतर त्यांनी मला प्रसादाच्या स्वरूपात शेंदूर, प्रसाद आणि बेलपत्र दिले.

मंदिरातून बाहेर पडतांना मला हे सर्व स्वप्नवत् भासत होते. महादेवाच्या या अखंड कृपेवर माझा विश्वासच बसत नव्हता.

४ ए. भगवान शिवाला केलेली प्रार्थना ! : महादेव (बाबा) सूक्ष्मातून मला म्हणाला, ‘वडिलांच्या घरातून मुलीची पाठवणी करतांना वडील तिला भरभरून देऊन तृप्त करून पाठवतात. तू अधिकाधिक साधना कर. मी सदैव खंबीरपणे तुझ्या पाठीशी आहे.’ मी बाबांना प्रार्थना केली, ‘बाबा, तुम्ही दैवी गुणांचे भांडार आहात. निर्मळ, भोळे, प्रीतीचा महासागर, त्यागाची परिसीमा, वैराग्यपूर्ण, अपेक्षाविरहित आणि सर्वांचे परम कल्याण करणारे आहात. गुरुसेवा करतांना मला तुमचे हे दैवी गुण आत्मसात करता येऊ देत’, अशी तुम्ही माझ्यावर कृपा करा.’

४ ऐ. ‘कर्मभूमीत परत जातांना वडिलांचा आशीर्वाद घेत आहे’, असे वाटणे : मला वाटले, ‘भगवान शिवाकडे जाणे, म्हणजे माहेरी जाण्यासारखे आहे. माझ्या विवाहानंतर मी माझी कर्मभूमी असलेल्या सासरी, म्हणजे कृष्णलोकात (प.पू. गुरुदेवांच्या आश्रमात) आले आहे. माझा विवाह गुरुतत्त्वाशी झाला आहे. त्यामुळे ‘माझ्या गुरुदेवांची सेवा करता यावी’, यासाठी मी माझ्या बाबांचे आशीर्वाद घेत आहे.’

५. ‘साधिकेला गाभार्‍यात जाता येऊन पूजा आणि दर्शन करता आले’, हे ऐकून साधकांना पुष्कळ आश्चर्य वाटणे : माझ्या समवेत आलेला साधक मला म्हणाला, ‘‘मी इतकी वर्षे वाराणसीत रहात आहे; परंतु मला मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन दर्शन घेण्याची अनुमती कधीच मिळाली नाही.’’ वाराणसी सेवाकेंद्रातील सर्व साधकांनाही ‘मला गाभार्‍यात जाऊन पूजा आणि दर्शन करता आले’, हे ऐकून पुष्कळ आश्चर्य वाटले. ‘हे कसे घडले ?’, ही सर्व माझ्या आकलनाच्या पलीकडील भगवान शिवाची दिव्य लीला होती.

६. भगवान शिव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता ! : भगवान शिवाने मला साधनेसाठी सूक्ष्मातून पुष्कळ दिले आहे आणि तोच मला ते नंतर प्रकट स्वरूपात दाखवणारही आहे. ‘भगवंत माझ्यासाठी सर्वकाही करत आहे’, यासाठी मला त्याच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. त्याने मला कधीच निराश केले नाही; उलट भरभरून दिले. त्याने मला आयुष्यभरासाठी या अनुभूती दिल्या आहेत. ‘अर्थात् हे सर्व प.पू. गुरुदेवांच्या परम कृपेमुळेच शक्य झाले’, यासाठी त्यांच्या पवित्र चरणी कृतज्ञता ! ज्या साधकांमुळे मला भगवान शिवाचे दर्शन झाले, त्या सर्वांप्रती कृतज्ञता !

हर हर महादेव !’

– सौ. श्वेता शॉन क्लार्क, फोंडा, गोवा. (३०.१२.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक