साधना आणि सेवा यांची तळमळ असणारे कै. दिलीप सारंगधर अन् साधकांच्या मृत्यूनंतरही साधकांकडून सेवा आणि साधना करून घेणारे मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘१६.३.२०२५ या दिवशी कै. दिलीप सारंगधर (वय ६१ वर्षे) यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्त त्यांचे कुटुंबीय आणि सनातनचे हितचिंतक यांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. दिलीप सारंगधर

१. दिलीप सारंगधर यांचे नातेवाईक आणि सनातनचे हितचिंतक यांना स्वप्नात दिलीप सारंगधर काहीतरी सांगत असल्याचे जाणवणे

‘२७.३.२०२४ या दिवशी माझ्या बाबांचे (दिलीप सारंगधर (वय ६१ वर्षे) यांचे) निधन झाले. त्यानंतर अनेक नातेवाइकांनी मला विचारले, ‘‘तुझे वडील तुमच्या (तू, तुझी आई (श्रीमती निर्मला सारंगधर) आणि भाऊ (श्री. प्रसाद सारंगधर यांच्या) स्वप्नात येऊन काही सांगत नाहीत का ? त्यांची काही इच्छा राहिली आहे का ?’’ आम्हाला स्वप्नात माझे बाबा दिसले नाहीत. बाबांचे मित्र, सनातनचे हितचिंतक किंवा आमचे जवळचे नातेवाईक यांना स्वप्नात बाबा (दिलीप सारंगधर) दिसत आणि ‘बाबा त्यांना काहीतरी सांगत आहेत’, असे त्यांना जाणवत असे. ‘बाबा काय सांगत आहेत ?’, हे कुणाच्या लक्षात येत नव्हते. बाबांचे निधन झाल्यापासून असे ३ मास चालू होते.

२. सूक्ष्मज्ञान प्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी साधिकेला केलेले मार्गदर्शन

बाबांचे निधन झाल्यानंतर ३ मासांनी मी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात सूक्ष्मज्ञान प्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे) यांना भेटून बाबांविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी मला पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केले.

अ. सारंगधरकाका (माझे बाबा) यांचा समष्टी साधनेचा पिंड असल्याने त्यांना ‘सेवा करणे आणि लोकांना कार्यात जोडणे’ यांची आवड होती. त्यांना ‘लोकांनी साधना करावी’, असे वाटत होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची समष्टी सेवा चालू आहे. कालांतराने तुम्हाला त्याची प्रचीती येईल किंवा वेगळ्या पद्धतीने कुठून तरी उत्तरे मिळतील.

आ. काकांच्या लिंगदेहाभोवती पांढरी प्रभावळ आहे.

इ. काकांच्या मृत्यूनंतरही त्यांची साधना आणि समष्टी सेवा चालू आहे. काही दिवसांनंतर काका नातेवाईक, हितचिंतक इत्यादींशी बोलतील. तेव्हा काकांचे बोलणे ऐकणार्‍यांची आकलनशक्ती वाढेल आणि त्यांना काकांचे बोलणे समजेल.

३. कै. दिलीप सारंगधर यांनी त्यांचे नातेवाईक आणि सनातनचे हितचिंतक यांना साधना सांगणे

सौ. काव्या किरण दुसे

त्यानंतर काही दिवसांनी बाबा काही लोकांच्या स्वप्नात येऊन त्यांना साधना सांगू लागले आणि त्या लोकांनी मला बाबांविषयी पुढीलप्रमाणे सांगितले.

अ. माझे मामा श्री. संजय देव्हारे यांनी मला सांगितले, ‘‘दिलीपकाका माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला श्रीकृष्णाचा नामजप करायला अन् प्रार्थना वाढवण्यास सांगितले.’’

आ. माझ्या चुलतकाकांची मुलगी चि. सान्वी जयेश सारंगधर (वय ५ वर्षे) हिच्या स्वप्नात बाबा आले आणि त्यांनी तिला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला सांगितला.

इ. बाबांचे मित्र श्री. अरुण कोपटे हे सनातनचे हितचिंतक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. बाबा त्यांच्या स्वप्नात आले आणि बाबांनी त्यांनाही साधना चालू ठेवण्यास सांगितले.

ई. गणेशोत्सवाच्या कालावधीत बाबा माझी चुलत बहीण सौ. तृप्ती गणबोटे हिच्या स्वप्नात आले. त्यांनी तिला ‘गणेशमूर्ती दान न करता किंवा कुंडामध्ये विसर्जित न करता वाहत्या पाण्यातच विसर्जित कर’, असे सांगितले.

तेव्हा ‘मधुराताईंना मिळत असलेले सूक्ष्मज्ञान किती अचूक असते !’, याबद्दल मला कृतज्ञता वाटली.

४. साधकांच्या मृत्यूनंतरही साधकांच्या लिंगदेहाकडून सेवा आणि साधना करून घेणारे महान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

बाबांचे निधन झाल्यावर ४ मासांनी मी ही सूत्रे  सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना सांगितली. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘गुरुदेव किती महान आहेत ! त्यांनी लक्षात आणून दिलेले सूक्ष्मज्ञान किती अफाट आहे ! साधकांच्या मृत्यूनंतरही गुरुदेव त्यांच्याकडून (साधकाच्या लिंगदेहाकडून) सेवा आणि साधना करून घेतात. त्यांच्या कृपेने साधकांचा मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर होतो. त्याबद्दल मला गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता वाटते.’’

५. सनातनच्या हितचिंतकांनी ध्यानातून दिलीप सारंगधर यांच्या मृत्यूनंतरच्या प्रवासाविषयी सांगणे आणि त्यांनी गुरुदेवांविषयी काढलेले गौरवोद्गार !

सनातनचे हितचिंतक श्री. शंतनू अविनाश सातपुते (वय २९ वर्षे) हे अमेरिकेत वास्तव्याला आहेत. ते ‘ईशा फाऊंडेशन’ या संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. त्यांची ध्यानमार्गाची साधना आहे. माझ्या बाबांचे निधन झाल्यानंतर श्री. सातपुते यांनी ध्यानामध्ये माझ्या बाबांची प्रभावळ (ऑरा) पाहिली. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुझ्या बाबांचा लिंगदेह हलका होऊन पृथ्वीवरून वर जात आहे, तसेच तुमच्या गुरुदेवांनी बाबांच्या लिंगदेहाभोवती कवच सिद्ध करून अन् विशिष्ट पद्धतीचे सकारात्मक ऊर्जेचे पांढरे वलय ठेवून तो पुढच्या प्रवासाला पाठवत आहेत.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘तुमचे गुरुदेव फार महान आहेत. ते तुम्हा कुटुंबियांच्या साधनेचा पुढचा प्रवास पुष्कळ सुकर करत आहेत आणि दिलीपकाकांनाही पुढच्या टप्प्याला घेऊन जात आहेत’, असे मला जाणवत आहे. गुरुदेव तुमची साथ शेवटपर्यंत सोडणार नाहीत. असे तुमचे गुरुदेव आहेत !’’ खरेतर श्री. सातपुते यांनी गुरुदेवांना पाहिले नाही, तरीही त्यांनी हे सर्व सूक्ष्मातून अनुभवून सांगितले.’

– सौ. काव्या किरण दुसे (कै. दिलीप सारंगधर यांची मुलगी), कोल्हापूर. (९.३.२०२५)


कै. दिलीप सारंगधर यांच्या पत्नी आणि सनातनचे हितचिंतक यांनी कै. दिलीप सारंगधर यांच्या संदर्भात सांगितलेली सूत्रे

श्रीमती निर्मला दिलीप सारंगधर

१. श्रीमती निर्मला दिलीप सारंगधर (कै. दिलीप सारंगधर यांची पत्नी), कोपरगाव

१ अ. सनातनच्या हितचिंतकांनी कै. दिलीपकाकांनी सांगितल्यानुसार कार्यालयातील त्यांच्या कक्षात देवतांच्या नामपट्ट्यांचे मंडल लावल्यावर तेथे सकारात्मक उर्जा जाणवणे : ‘एकदा मी वैयक्तिक संपर्कासाठी सनातनच्या एका हितचिंतकांकडे गेले होते. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘दिलीपकाकांनी मला सनातनच्या नामपट्ट्यांचे महत्त्व सांगून कार्यालयातील माझ्या कक्षात (केबिनमध्ये) देवतांच्या नामपट्ट्यांचे मंडल लावायला सांगितले होते. त्यावर माझा तितकासा विश्वास नव्हता; पण काकांनी सांगितले; म्हणून मी कार्यालयातील माझ्या कक्षात नामपट्ट्यांचे मंडल लावले. मी नामपट्ट्यांकडे पाहून नामजप केल्यावर माझी एकाग्रता वाढली. पूर्वी माझ्या कक्षात पुष्कळ नकारात्मक स्पंदने जाणवत होती. माझ्या मनात अनावश्यक विचार येत असत. आता मला कक्षात सकारात्मक ऊर्जा जाणवू लागली आहे. आता मला कक्षात चांगले वाटते. हे सगळे मी दिलीपकाकांमुळे अनुभवत आहे.’’

२. सौ. रूपाली सातपुते (‘सनातन प्रभात’ची वाचिका), कोपरगाव

२ अ. स्वप्नात ‘कै. दिलीपकाका सेवा करत आहेत’, असे दिसणे : ‘मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची वाचिका आणि सनातनची हितचिंतक आहे. कै. दिलीपकाका माझ्या यजमानांचे मित्र होते. काही दिवसांपूर्वी माझ्या स्वप्नात दिलीपकाका आले. ते काही साधकांच्या समवेत बसले होते आणि त्यांच्या हातात साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे अंक होते. ते मला म्हणाले, ‘वेळ पुष्कळ अल्प आहे आणि सेवा पुष्कळ आहेत. बोलण्यासाठी वेळ देण्यापेक्षा आता मला सेवेला वेळ द्यायचा आहे.’ काका मला स्वप्नात अनेक वेळा दिसतात आणि ते सेवा करतांना दिसतात.

२ आ. काकांनी सांगितल्यामुळे माझ्या नामजपात वाढ झाली. मी मांसाहार कायमस्वरूपी बंद केला. माझी गुरुदेवांप्रती श्रद्धा वाढली.’

३. श्री. अरुण कोपटे (सनातनचे हितचिंतक), कोपरगाव

३ अ. प्रेमभावाने अनेक जणांना साधना करण्यास प्रवृत्त करणे : ‘दिलीपकाका अतिशय प्रामाणिक, प्रेमळ आणि मनमिळाऊ होते. ‘त्यांचे शुद्ध विचार आणि त्यांची बोलण्याची चांगली पद्धत’ यांच्यामुळे त्यांनी अनेक जणांना जोडून ठेवून माझ्यासारख्यांना साधना करण्यासाठी प्रवृत्त केले.

३ आ. सेवेच्या माध्यमातून पुष्कळ पुण्यबळ मिळवले असणे : काकांचे निधन झाल्यावर एकदा ते माझ्या स्वप्नात आले. मी त्यांना विचारले, ‘तुमचे निधन झाले आहे, तर तुम्ही येथे कसे दिसत आहात ?’ त्यावर ते म्हणाले, ‘मी इथेच आहे. माझी सेवा शेष आहे.’ ‘काकांना सेवा करण्याची तळमळ पुष्कळ होती आणि त्यांनी सेवेच्या माध्यमातून पुष्कळ पुण्यबळ मिळवले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबालाही साधनेचे बळ मिळेल’, असे मला वाटते.

३ इ. कै. दिलीप सारंगधर यांच्या मासिक श्राद्धानिमित्तचे जेवण जेवल्यावर हलकेपणा जाणवणे : कै. दिलीप सारंगधर यांच्या प्रत्येक मासिक श्राद्धाच्या दिवशी मी उपास करत होतो आणि त्यांच्या घरी जेवणासाठी जात होतो. मी अन्यत्र कुठेही श्राद्धातील जेवण जेवल्यास मला जडत्व जाणवते किंवा माझे डोके जड होते; पण दिलीपकाकांच्या मासिक श्राद्धानिमित्तचे (११ मास) जेवण जेवल्यावर मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मला पुष्कळ हलके वाटत असे. ‘दिलीपकाकांसारख्या सनातनच्या साधकांच्या मासिक श्राद्धाच्या दिवशी उपास करण्याची संधी मिळणे’, हे मी माझे भाग्य समजतो.’

(लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक : ९.३.२०२५)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.