सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७५ वर्षे) यांच्या ऐंद्री शांती विधीच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांनी अनुभवलेले चैतन्य आणि आनंद यांची प्रचीती !

उद्या फाल्गुन कृष्ण द्वितीया (१६.३.२०२५) या दिवशी पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे संत, वय ७५ वर्षे) यांचा वाढदिवस आहे. २.२.२०२५ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात माझे बाबा पू. अशोक पात्रीकर यांचा ऐंद्री शांती विधी (व्यक्तीने ७५ व्या वर्षात पदार्पण केल्यावर तिचा ‘ऐंद्री शांती विधी’ करतात.) करण्यात आला. त्या वेळी आम्हा कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पू. अशोक पात्रीकर यांच्या चरणी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. अशोक पात्रीकर

१. ‘घरासमोर मोर दिसल्यावर पू. बाबांचे स्वागत करण्यासाठी मोर आले आहेत’, असे वाटणे

‘पू. बाबा (पू. अशोक पात्रीकर) ऐंद्री शांती विधी करण्यासाठी गोवा येथे आले होते. त्या वेळी आम्हाला ढवळी येथील आमच्या घरासमोरील वनक्षेत्रात ४ मोर दिसले. यापूर्वी आम्ही तेथे मोर कधीच पाहिले नव्हते. ‘पू. बाबांच्या स्वागतासाठीच मोर आले होते’, असे आम्हाला वाटले.

श्री. निखिल अशोक पात्रीकर

२. विधीची पूर्वसिद्धता करतांना कुटुंबियांना पुष्कळ उत्साह जाणवणे

आम्हा कुटुंबियांना बाबांच्या ऐंद्री शांती विधीची पूर्वसिद्धता करतांना पुष्कळ उत्साह जाणवत होता. या विधीचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्यासाठी आमच्याकडून आपोआप प्रार्थना होत होत्या.

३. विधीच्या आदल्या दिवशी पू. बाबांना सर्दीचा पुष्कळ त्रास होणे; मात्र विधीच्या दिवशी पू. बाबांना सर्दीचा त्रास न होणे

पू. बाबांना विधीच्या आदल्या दिवशी पुष्कळ सर्दी झाली होती आणि त्यांना कणकण वाटत होती. दुसर्‍या दिवशी पू. बाबांना सर्दीचा त्रास जराही झाला नाही. ‘गुरुदेवांनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) त्यांना विधीसाठी लवकर बरे केले’, असे आम्हाला वाटले.

४. साधकाने संत वडिलांच्या ठिकाणी गुरुरूप अनुभवून कृतज्ञताभावात रहाणे

पू. बाबा आणि आई (सौ. शुभांगी पात्रीकर) यांनी विधीचा संकल्प केला. त्यानंतर मी आणि माझी पत्नी सौ. नमिता पुढच्या विधीसाठी पूजेला बसलो होतो. ‘पू. बाबा नात्याने माझे वडील आहेत आणि ते प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) समष्टी रूपही आहेत. आम्हा उभयतांना त्यांच्यासाठी विधी करण्याची संधी मिळाली’, असा कृतज्ञताभाव सतत आमच्या मनात होता.

५. एरव्ही साधकाला पित्ताचा त्रास होणे आणि विधीतील चैतन्यामुळे त्याला पित्ताचा त्रास न होणे

विधी सकाळी ८ वाजता चालू झाला आणि पूर्ण होण्यास दुपारचे ३ वाजले. एरव्ही मला महाप्रसाद ग्रहण करण्यास उशीर झाल्यास माझे डोके दुखते; मात्र त्या दिवशी महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी दुपारचे ३.३० वाजले, तरीही मला काहीच त्रास झाला नाही. तेथील चैतन्यामुळे वेळ कसा गेला ? हे मला समजलेच नाही.

– श्री. निखील पात्रीकर (पू. पात्रीकरकाका यांचा मुलगा)

६. ‘विधीला सर्व देवतांचे अस्तित्व जाणवून विधी वेगळ्याच विश्वात होत आहे’, असे जाणवणे

सौ. नमिता निखील पात्रीकर

प्रत्यक्ष विधीच्या दिवशी आम्हाला वातावरणात आनंद जाणवत होता. ‘आम्हाला देवतांचे अस्तित्व जाणवत होते. हा विधी पृथ्वीवर होत नसून एका वेगळ्याच विश्वात होत आहे’, असे आम्हाला जाणवत होते.

७. विधीच्या ठिकाणी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत) यांचे आगमन झाले. तेव्हा वातावरण अधिकच चैतन्यमय झाले. आम्हाला शांत आणि निर्विचार अवस्था अनुभवता येत होती.

८. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना विधीच्या आदल्या दिवसापासून चैतन्य जाणवत असणे

विधी झाल्यावर माझी पत्नी सौ. नमिता आणि माझी लहान बहीण सौ. अनघा जोशी (पू. पात्रीकर यांची मुलगी, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडे प्रसाद देण्यासाठी गेल्या. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘कालपासूनच वातावरणात मला पुष्कळ चैतन्य जाणवत आहे.’’

‘हे विष्णुस्वरूप गुरुमाऊली, आपल्या कृपेमुळेच आम्हाला या शांती विधीच्या दिवशी हे अनुभवता आले’,  त्याबद्दल आम्ही आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. निखील पात्रीकर आणि सौ. नमिता पात्रीकर (पू. अशोक पात्रीकर यांचा मुलगा आणि सून), ढवळी, फोंडा, गोवा. (७.३.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक