ओरोस – दोडामार्ग तालुक्यातील ३ पत्रकारांना धक्काबुक्की करून नंतर कोंडून ठेवल्याची घटना नुकतीच घडली. पत्रकारांना अशाप्रकारची वागणूक देण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. या प्रकरणात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला; मात्र त्यांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. येत्या ८ दिवसांत ही कारवाई झाली नाही, तर जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी जिल्हा पत्रकारसंघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी जिल्हा पत्रकार संघाचे सचिव बाळ खडपकर, गणेश जेठे, राजन नाईक, सुहास देसाई आदी उपस्थित होते. या वेळी तोरसकर यांनी घडलेल्या घटनेविषयी माहिती दिली. ‘या घटनेनंतर पत्रकारांनी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. बीड जिल्ह्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुंडप्रवृत्ती फोफावू पहात आहे. पत्रकार संरक्षण कायदा असतांना पत्रकारांवर आक्रमण केले जाते. हा प्रकार जिल्हा पत्रकारसंघ कधीही सहन करणार नाही. संशयितांना शिक्षा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. या प्रकरणात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी चांगली भूमिका घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची भेट घेतली असता त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे’, असे तोरसकर यांनी या वेळी सांगितले.