धर्मांधाला साहाय्य करणार्‍या मुसलमान अधिवक्त्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला !

नाशिक : हिंदू महिलांवर अत्याचार करून धर्मांतर केल्याचे प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचा आदेश !

मुंबई – स्वतःला ‘सूफी संत’ म्हणवून घेणार्‍या अब्दुल अझीझ बाबा तथा अझीझ रझ्जाक शेख याने नाशिक जिल्ह्यातील येवला येथे वर्ष २०१९ मध्ये एका हिंदु कुटुंबातील ४ महिलांना भय दाखवून गुंगीच्या अवस्थेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांचे बळजोरीने धर्मांतर घडवले. या प्रकरणात अब्दुल याला त्याचा भाऊ अधिवक्ता जब्बार शेख याने साथ दिली. या गंभीर प्रकरणात मुख्य आरोपी अब्दुल अझीझ याला गुन्ह्यात साहाय्य करणार्‍या अधिवक्ता जब्बार शेख याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. ५ मार्चला झालेल्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती एन्.आर्. बोरकर यांच्या खंडपिठाने अधिवक्ता जब्बार शेख याचा जामीन नाकारला आहे. पीडितांच्या वतीने अधिवक्ता प्रथमेश गायकवाड यांनी युक्तीवाद केला.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल शेख आणि त्याचा भाऊ अधिवक्ता जब्बार शेख दोघेही कारागृहात आहेत. आरोपी अधिवक्ता जब्बार शेख याने जामिनासाठी अर्ज केला होता. यापूर्वी ८ फेब्रुवारी २०२३ आणि २ मार्च २०२४ या दिवशी आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. हे अर्जही न्यायालयाने फेटाळले होते. या वेळी केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळला. अधिवक्ता जब्बार शेख याने पीडित महिलांना धमक्या देऊन त्यांच्याकडून ८ लाख रुपये घेतल्याचा गंभीर प्रकार अधिवक्ता प्रथमेश यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकरणी जोरदार युक्तीवाद करत अधिवक्ता प्रथमेश गायकवाड यांनी आरोपींचा धर्मांतराचा डाव न्यायालयापुढे उघड केला. आरोपी अधिवक्ता जब्बार शेख याच्या जामिनाविषयी ‘आरोपीचा जामीन संमत केल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणि न्यायप्रक्रियेत अडथळा आणू शकतात. अत्याचाराच्या गंभीर स्वरूपामुळे आरोपींना कोणतीही सवलत दिली जाऊ शकत नाही’, असे निरीक्षण नोंदवले आहे. याचे अन्वेषण पूर्ण झाले असून पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपपत्र सादर केले आहे. न्यायप्रक्रिया लवकर व्हावी, यासाठी न्यायालयाने हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचा आदेश दिला आहे.