|

१. प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी झाल्यावर प.पू. रामानंद महाराज यांच्याशी पूर्वीचे मित्रत्वाचे नाते संपून ‘गुरु-शिष्य’ नाते निर्माण होणे
‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या देहत्यागानंतर संतमंडळींनी रामजीदादांना योग्य रितीने, योग्य परंपरेने आणि योग्य वेळी गादीवर बसवले. आश्रमात प.पू. रामानंद महाराज (प.पू. दादा) यांच्या रूपात सर्व भक्तांना प.पू. भक्तराज महाराज पुन्हा प्राप्त झाले. रामजीभैय्या, ज्यांच्या मैत्रीत माझे जीवन गेले, मजाक-मस्ती केली, आनंद घेतला, तो माझा एक अत्यंत जीवलग सखा, आता नुसता रामजीभैय्या नसून ‘प.पू. रामानंद महाराज’ झाला होता. ज्याप्रमाणे गोकुळातील पेंद्या, सुदामा आणि गोप-गोपिका यांच्या संगे मस्ती करणारा अन् खेळणारा कृष्ण, हा कृष्ण राहिला नव्हता, तर तो द्वारकाधीश आणि जगाचा पालनहार झाला, तद्वतच त्या क्षणी रामजी हा माझा मित्र नव्हता, तर माझ्या समोर याच डोळ्यांनी मी रामजीभैय्यांना द्वारकाधीश झालेले पहात होतो आणि हा सुदामा भक्तीची भीक मागत त्यांच्या चरणांशी उभा होता. ते ‘प.पू. रामानंद महाराज’ झाल्यावर आमचे मैत्रीचे नाते संपले. ते द्वारकाधीश आणि मी सुदामा अन् म्हणूनच मी त्यांच्यापासून १० फूट दूरच होतो.
२. प.पू. रामानंद महाराज यांनी कोणताही दुरावा न ठेवता मनमोकळेपणाने बोलणे
ते एकांतात (एकटे) असले की, आम्ही मनमोकळे बोलत असू. ते मला आश्रमातील सर्व गतीविधी सांगत. त्यांनी स्वतः कोणत्याच प्रकारचा दुरावा ठेवला नाही. प.पू. बाबांच्या हयातीत मी ज्या सेवा करत होतो, त्याच सेवा प.पू. रामानंद महाराज माझ्यावर विश्वास ठेवून मला हक्काने सांगत असत.
३. लक्ष्मीचा वास असलेले प.पू. बाबा आणि प.पू. दादा यांचे ‘अक्षय हात’ !
प.पू. भक्तराज महाराज असो किंवा प.पू. रामानंद महाराज, यांच्या हातांत मी कधीच पैसे दिले नाहीत; कारण या दोघांचे हातच ‘Horn of Plenty’ (ही इंग्रजीतील म्हण आहे. तिचा अर्थ ‘कधीही काही न्यून पडत नाही’, असा होतो.), म्हणजे ‘अक्षय हात’ आहेत. ज्या हातांत लक्ष्मीचा वास आहे, त्यांच्या हातांत मी काय पैसे देणार ? माझी काय पात्रता ? पण शेवटपावेतो मी त्यांना जे काही देत होतो, ते त्यांच्या खिशातच टाकत असे. ते ‘नको, नको’ म्हणायचे आणि गोड हसून माझ्या पाठीवर थाप द्यायचे.
प.पू. रामानंद महाराज
४ अ. सुनेची भजने ऐकण्यासाठी घरी येणे : प.पू. दादांना (प.पू. रामानंद महाराज यांना) जेव्हा वाटेल, तेव्हा ते आमच्याकडे यायचे आणि जेवण, चहा-पाणी करून जायचे. त्यांची इच्छा झाली की, दिवस असो किंवा रात्र, ते आमच्याकडे माझ्या सुनेची भजने ऐकण्यासाठी येत असत. माझी सून सौ. अमृता ही ब्रह्मचैतन्य महाराज यांची भजने पुष्कळच सुंदर गाते.
४ आ. आश्रमासाठी एका भूखंडाची नोंदणी झाल्याचे सांगायला सकाळीच घरी येणे आणि नोंदणीविषयीची कागदपत्रे मोठ्या प्रेमाने अन् आपुलकीने वाचायला देणे : राजेंद्रनगरजवळ ममतानगरमध्ये आश्रमासाठी एक ‘प्लॉट’ (भूखंड) घेतला. एकदा सकाळी ६ – ६.३० वाजता प.पू. दादा माझ्याकडे आले. माझ्या पत्नीने पाहिले आणि ती मला म्हणाली, ‘‘दादा आले.’’ मी लगेच त्यांना घेण्यासाठी फाटकाजवळ गेलो. ते हसत हसत माझ्या गळ्यात हात घालून आणि मला हृदयाशी लावून घरात घेऊन गेले. मी त्यांना बसवले आणि चहा-पाणी आणण्यासाठी उठणार, तोच त्यांनी मला बसवले आणि म्हणाले, ‘‘तू इथेच बस. तुला काही दाखवायचे आहे. ती चहा-फराळ आणेल.’’
नंतर त्यांनी स्वतः बॅग उघडून काही कागद काढले आणि मला देत म्हणाले, ‘‘पहा, काल संध्याकाळी आपल्या प्लॉटचे रजिस्ट्रेशन (नोंदणी) झाले. प्लॉट पूर्णपणे आपला झाला.’’ त्यांनी हे सर्व मला प्रेमाने आणि आपुलकीने सांगितले अन् कागद वाचण्यास दिले. मी ते कागद वाचल्यावर ते मला म्हणाले, ‘‘सर्वांत आधी तुला सांगायला सकाळीच इकडे आलो.’’ पहा किती प्रेम आणि आपुलकी !
५. प.पू. रामानंद महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे सेवानिवृत्तीनंतर वकिली करण्यासाठी न्यायालयात जाणे बंद करून केवळ आश्रमात सेवा करण्याचे ठरवणे
मी नोकरी करत असतांना ‘एल्.एल्.बी.’ केले होते. सेवानिवृत्ती घेऊन मी सनद घेतली आणि एका वकिलांच्या समवेत न्यायालयात जात असे. ३ वर्षे झाली असतील. एक दिवस प.पू. रामानंद महाराज म्हणाले, ‘‘आता न्यायालयात कशाला जातोस ? कुणासाठी कमवायचे आहे ?’’ मी म्हणालो, ‘‘नाही, मी शिकण्यासाठी जातो.’’ तेव्हा महाराज म्हणाले, ‘‘ज्या वेळी न्यायालयात जायचे होते, त्या वेळी प.पू. बाबांच्या मागे भजन करत अनवाणी फिरलास आणि आता कशाला न्यायालय पाहिजे ? काही जायचे नाही.’’ मी दुसर्या दिवसापासून न्यायालयात जाणे बंद केले आणि कायद्याची सर्व पुस्तके विकली. ‘आता केवळ आश्रमात जाऊन सेवा करायची’, असे मी ठरवले.
६. प.पू. रामानंद महाराज यांच्या देहत्यागानंतर अनाथ झाल्यासारखे वाटणे
प.पू. दादा आजारी पडले आणि रुग्णालयात भरती झाले. ११.३.२०१४ या दिवशी त्यांनी आमचा कायमचा निरोप घेतला आणि आता मात्र मी खरोखरच अनाथ झालो. प्रेमाने, आपुलकीने, स्नेहाने आणि अधिकाराने माझ्या पाठीवर हात फिरवणारी कोणतीच व्यक्ती राहिली नाही. प.पू. दादांचे माझ्यावर अतोनात प्रेम होते. रक्ताच्या नात्यापलीकडचे ते संबंध रोमारोमात भिनले आहेत. जाता जाताही ते मित्राला, म्हणजे सुदाम्याला भेटून गेले. त्यांनी मित्रत्व निभावले.
आता कोणत्याही पदाची आणि मान-सन्मानाची आशा नाही. ‘केवळ महाराजांच्या आठवणीत, नामस्मरणात असावे आणि ‘अन्ते मतिः सा गतिः । (म्हणजे मृत्यूसमयी जिवाचे जसे विचार असतात, तशी त्याला पुढची गती मिळते.)’, असे व्हावे’, हीच इच्छा !’
– श्री. गोविंद सदाशिव हिरवे (प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त) (साभार : ‘भक्तां काजा जागे सदा भक्तराज’)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |