सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आदेशानुसार दोडामार्ग आणि सावंतवाडी या २ तालुक्यांतील एकूण १३ गावांमध्ये वृक्ष तोडण्यास बंदी घातल्याची माहिती ‘सावंतवाडी, दोडामार्ग टास्क फोर्स समिती’चे आणि साहाय्यक वनसंरक्षक सदस्य सचिव वैभव बोराटे यांनी दिली आहे.
अवैधरित्या होणार्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सावंतवाडी, दोडामार्ग टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये महसूल विभाग, वन विभाग आणि पोलीस विभाग या विभागांतील अधिकार्यांचा समावेश आहे. ही समिती उच्च न्यायालयाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रामध्ये वृक्षतोडीस प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही, प्रचार-प्रसिद्धी आणि प्राप्त तक्रारी यांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा प्रतिमास आढावा घेते. दोडामार्ग तालुक्यात कुठेही खासगी अथवा शासकीय मालकीच्या क्षेत्रात वृक्षतोड झालेली किंवा वृक्षतोड होतांना निदर्शनास आल्यास जनतेने गावातील पोलीस पाटील, वनरक्षक, तलाठी यांपैकी कुणालाही तातडीने कळवावे, तसेच या अनुषंगाने असलेल्या प्रकरणांच्या चौकशीमध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना नागरिकांनी आवश्यक ते साहाय्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वृक्षतोडीविषयी ‘ऑनलाईन’ तक्रार sdtfsawantwadi@gmail.com या ई मेल पत्त्यावर आणि सावंतवाडी वन विभागाच्या ०२३६३-२७२००५ या दूरध्वनी क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.