सकल हिंदु समाज आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आंदोलन

हिंदुत्वनिष्ठाचे दुकान फोडणार्या सरपंचावर कठोर कारवाई करा !
कोल्हापूर, ३ मार्च (वार्ता.) – राधानगरी येथील सरवडे येथील एका शाळेत धर्मवीर बलीदानमास पाळणार्या ४० विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राचार्यांनी गुडघ्यावर रांगायला लावले, तसेच या विद्यार्थ्यांनी ‘३ दिवस शाळेत यायचे नाही’, असे सांगितले. याचा शाळेच्या व्यवस्थापनास जाब विचारणार्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याचे प्राचार्यांच्या सरपंच भावाने दुकाने फोडले. तरी दुकान फोडणारा सरपंच आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सकल हिंदु समाज आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. (असे आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई केव्हा करणार ? – संपादक)
आंदोलन करणार्या हिंदुत्वनिष्ठांची प्रारंभी विशेष नोंद न घेतल्याने, तसेच या संदर्भात आंदोलकांसमवेत चर्चा करण्याविषयी जिल्हाधिकारी कोणतेच ठोस आश्वासन देत नसल्याने काही काळ ठिय्या आंदोलन केले. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी या प्रकरणाच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या समवेत तात्काळ बैठक घेण्यात येईल, तसेच याप्रसंगी शिक्षणाधिकार्यांना उपस्थित रहाण्यास सांगू, असेही सांगितले.

या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, श्री. शिवाजीराव मोटे, ‘हिंदु एकता आंदोलना’चे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, हिंदु एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, विश्व हिंदु परिषदेचे श्री. कुंदन पाटील, श्री. पराग फडणीस, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, श्री. अर्जुन आंबी, श्री. अनिरुद्ध कोल्हापूरे, भाजप जिल्हाउपाध्यक्ष श्री. शैलेश पाटील, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे श्री. सुनील सामंत, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे श्री. निरंजन शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट आणि श्री. महेंद्र अहिरे यांसह हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बलीदानमास पाळण्यास विरोध करणार्या प्राचार्यांना कायमची अद्दल घडेल अशी कारवाई झाली पाहिजे ! – सुनील घनवट
सरवडे या गावात बलीदानमास पाळण्यास जो विरोध झाला आणि विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास मनाई करण्यात आली याचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आम्ही निषेध करतो. एकीकडे रमजानचा मास चालू झाल्यावर ‘हिजाब घालून या, बुरखा घालून या’, असे काही शाळा सांगतात, तसेच ख्रिसमस आल्यास ‘ख्रिसमस ट्री’ आणा, असे सांगितले जाते, तर दुसरीकडे मात्र बलीदानमास पाळण्यास विरोध केला जातो, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे हा प्रकार ज्या प्राचार्यांनी केला, त्यांना कायमची अद्दल घडेल, अशी कारवाई झाली पाहिजे, तसेच महाराष्ट्रात अन्य शाळांमध्ये कुठे असा प्रकार होत असेल, तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.
संपादकीय भूमिका :धर्मवीर बलीदानमास पाळणार्या विद्यार्थ्यांना शिक्षा करणारे शिक्षक असणार्या शाळेतील विद्यार्थ्यांवर देशप्रेमाचे संस्कार होतील का ? |