
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने रशियाविरुद्धच्या सायबर कारवायांवर बंदी घातली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध चालू झाल्यावर तत्कालीन जो बायडेन प्रशासनाने रशियावर अनेक निर्बंध घातले होते. रशियाविरुद्ध सायबर कारवाया, हा त्याचाच एक भाग होता. आता मात्र अमेरिकेने रशियाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी यासाठी ‘सायबर कमांड’ला आदेश दिला आहे. पेंटागॉनशी संबंधित एका गुप्तचर विभागाच्या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसच्या ओव्हल कार्यालयात झालेल्या ट्रम्प आणि झेलेंस्की यांच्यातील बैठकीपूर्वीच हा आदेश देण्यात आला होता.
१. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासन रशियाविरुद्ध करावयांचा आढावा घेत आहे. असे असले, तरी सार्वजनिकरित्या यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
२. युक्रेनच्या सूत्रावर रशियाला वाटाघाटीच्या पटलावर आणणे महत्त्वाचे आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी २ मार्चला सांगितले. मार्को म्हणाले की, जर पुतिन यांच्याविषयी पूर्वग्रहातून विरोधी दृष्टीकोन स्वीकारला गेला, तर त्यांना चर्चेच्या पटलावर आणता येणार नाही.
३. दोन माजी अमेरिकी अधिकार्यांच्या मते, रशियाविरुद्धच्या अशा कारवाईपासून माघार घेणे, हा एक मोठा जुगार आहे.
४. रशियाविरुद्ध अमेरिकेच्या बहुतेक सायबर कारवाया ब्रिटनमधून केल्या जातात. दुसरीकडे अमेरिकेवरही रशियाची सायबर आक्रमणे वाढत आहेत. गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांच्या मते, या गुन्हेगारी आक्रमणांना रशियन यंत्रणांनी मान्यता दिली होती.
५. हीच परिस्थिती युरोपसंदर्भातही आहे. तेथील पायाभूत सुविधांची हानी होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे.
६. विशेष म्हणजे अमेरिका आतापर्यंत या सूत्रांमध्ये युरोपला साहाय्य करत आहे; परंतु रशियाविरुद्ध सायबर कारवाया रोखल्याने युरोपीय देशांसाठी समस्या निर्माण होऊ शकतात.