Doctor Assaulted Old Man In MP : मध्यप्रदेशामध्ये ७७ वर्षीय वृद्धाला मारहाण करणार्‍या डॉक्टरची चौकशी होणार !

छत्तरपूर (मध्यप्रदेश) – येथे एका ७७ वर्षीय वृद्धाला मारहाण करणारे डॉ. राजेश मिश्रा यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली असून त्यांची विभागीय चौकशी करण्याचा आदेश छत्तरपूर वैद्यकीय प्राधिकरणाने दिला. उधवलाल जोशी असे या वृद्धाचे नाव आहे. १७ एप्रिलला ही घटना घडली. डॉ. मिश्रा हे जोशी यांना फरफटत नेत असल्याचा आणि रुग्णालयाजवळील पोलीस चौकीत डांबण्याची धमकी देत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला. यानंतर नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त करत डॉ. मिश्रा यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. उधवलाल जोशी हे त्यांच्या आजारी पत्नीला पोटाच्या उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन आले होते. जोशी हे रांगेत उभे असतांना काही कारणावरून त्यांचा डॉ. मिश्रा यांच्याशी वाद झाला. यामुळे संतापलेल्या डॉ. मिश्रा यांनी जोशी यांना कानशिलात लगावली, त्यांना लाथा मारल्या, तसेच फरफटत नेत चश्मा तोडला. यावर डॉ. मिश्रा यांनी ‘जोशी यांनीच मला चापट मारली’ असा प्रत्यारोप केला.

संपादकीय भूमिका

  • डॉक्टरांना मारहाण झाल्यावर संबंधित दोषींविरुद्ध एक होणार्‍या डॉक्टरांची संघटना आता त्यांच्यातील गुंड प्रवृत्तीच्या डॉक्टरांवर कारवाई होण्यासाठी एक का होत नाहीत ?
  • अशांची मान्यताच रहित करा, तरच असे कृत्य अन्य डॉक्टर कधी करू धजावणार नाहीत !