लोकप्रतिनिधींच्या सत्काराद्वारे ‘मराठा विरुद्ध ब्राह्मण’ वाद ब्राह्मण समाजाने पुसला ! – आमदार गोपीचंद पडळकर

मिरज येथे ब्राह्मण समाजाच्या वतीने खासदार आणि आमदार यांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला !

कार्यक्रमात सत्काराच्या प्रसंगी उपस्थित असलेले सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर

मिरज (जिल्हा सांगली), २ मार्च (वार्ता.) – राज्यात जातीयवाद चालू आहे. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’, अशा पद्धतीने काही नेते वागत आहेत. मराठा विरुद्ध ब्राह्मण असा वाद निर्माण केला जात आहे; मात्र ब्राह्मण समाजाने असा कार्यक्रम घेऊन ते पुसण्याचे काम केले. जातीयवादी संघटना कुणी पोसल्या ? ब्राह्मणांच्या विरोधात बहुजनांना उभे करण्याचे उद्योग सध्या राज्यात चालू आहेत. मते घेण्यासाठी काही नास्तिक लोक आहेत. त्यांना त्रास होऊ लागला की, ते समाजात ब्राह्मणांचे साहाय्य घेतात, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी येथे केली.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, राज्यातील एका नास्तिक नेत्याने स्वतःच्या घरी १०१ ब्राह्मणांना बोलावून मृत्यूंजय जप केला. त्याची वाच्यता मात्र कुठेही झाली नाही. तुमची रेष मोठी करायची असेल, तर ब्राह्मणांचे तुम्हाला साहाय्य घेऊनच पुढे जावे लागेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश चितळे यांचा आदर्श सर्वांनी घ्यायला पाहिजे. अभिनेत्री केतकी चितळे यांनी यापूर्वी केलेले वक्तव्य योग्यच होते, तिचा आदर्श जयंत पाटील यांनी घ्यायला हवा.

जयंत पाटील यांना श्री गणेश मंदिर नव्हे, तर दर्गा आठवला

मिरज येथे कार्यक्रमासाठी आलेले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाषणात सांगली आणि मिरजेची माहिती देतांना आमदार जयंत पाटील यांनी ‘मिरज येथे आला आहात, तर मिरजेतील दर्ग्यालाही नार्वेकर यांनी भेट द्यावी. तेथे दर्शनासाठी हिंदु आणि मुसलमान दोघेही जातात’, असे २ वेळा सांगितले; मात्र या कार्यक्रमाच्या जवळच असलेल्या सांगलीकर मळ्यातील श्री गणेशाचे प्रसिद्ध मंदिर आहे, तेथे नार्वेकर यांनी भेट द्यावी, याचा विसर जयंत पाटील यांना पडला होता, असे दिसून आले.

१ मार्च या दिवशी येथील ‘ऑक्सिजन पार्क’मध्ये सायंकाळी ६ वाजता सांगली जिल्हा समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांच्या आयोजित केलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार जयंत पाटील म्हणाले की, इतिहासामध्ये नानासाहेब पेशवे यांनी अनेकांना एकत्रित केले होते. पुणे येथून देशातील राज्यकारभार चालवला होता. महाराष्ट्राने देशावर राज्य केले होते. आता मात्र महाराष्ट्र आणि देशात द्वेष निर्माण केला जात आहे. जाती-जातींमध्ये द्वेष पसरवला जात आहे. हा द्वेष कसा अल्प करता येईल ? यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. (महाराष्ट्रात जातीद्वेष कुणी निर्माण केला, हे सूज्ञ जनता जाणून आहे. – संपादक)

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील अमली पदार्थ आणि इतर गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रतिदिन कारवाई चालूच आहे.

लोकप्रतिनिधींनी जनतेच्या विश्वासाला दगाफटका न करता वर्तणूक ठेवावी ! – राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष

जनतेने निवडून दिलेले आमदार आणि खासदार यांनी विधीमंडळ आणि संसद येथे राज्यघटनेचा भंग होऊ न देता, तसेच जनतेच्या विश्वासाला दगाफटका न करता वर्तणूक ठेवावी, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी केले. ते म्हणाले की, लोकप्रतिनिधी समाजाचा ‘मॉडेल’ असतो. त्याचे आचार-विचार महत्त्वाचे असतात. त्यामुळे विधिमंडळात किंवा संसदेत गोंधळ घालणे म्हणजे राज्यघटनेच्या आदेशाचा भंग करण्यासारखे आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेने अनेक संसदपटू सिद्ध केले. त्यांनीही संसद गाजवली, ही आपली संस्कृती आहे.

लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेऊन ‘शक्तीपीठ’ मार्ग पूर्ण करण्याची मागणी ! 

प्रास्ताविकात बांधकाम व्यावसायिक  श्री. किशोर पटवर्धन म्हणाले की, सांगली आणि मिरज ही शहरे राष्ट्रीय महामार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सांगली जिल्हा इतर जिल्ह्यांपेक्षा मागे आहे. गेल्या काही वर्षांत मिरज येथील वैद्यकीय क्षेत्रातील आलेख घसरत आहे. यासाठी ‘एम्स’सारखे मोठे रुग्णालय होणे आवश्यक आहे. शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध हा केवळ गैरसमजुतींमधून झाला आहे. त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेऊन लोकांशी समन्वय साधून या प्रकल्पातील विघ्ने दूर करावीत. रेल्वेचा मिरज-लोंढा दुहेरी मार्ग ११ वर्षांपासून प्रलंबित आहे. आजही हे काम पूर्णत्वाला गेलेले नाही, ही खंत आहे. येथील खासदारांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

क्षणचित्रे

१. कार्यक्रमात थोडा वेळ थांबून सत्कारानंतर खासदार विशाल पाटील हे निघून गेले.

२. कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या रंगतदार भाषणाने सर्व नागरिकांची मने जिंकून घेतली. सर्वांनी त्यांचे कौतुक केले.

उपस्थित मान्यवर…

कार्यक्रमाला श्रीमंत गंगाधरराव उपाख्य बाळासाहेब पटवर्धन (राजेसाहेब), नुकताच ९३ वा वाढदिवस साजरा झालेले मिरज येथील प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. जी.एस्. कुलकर्णी, उद्योजक गिरीश चितळे, माधवराव पटवर्धन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार सत्यजित देशमुख उपस्थित होते. त्यांचा सत्कार राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक श्री. किशोर पटवर्धन हेही उपस्थित होते. संजय रूपलग, राजेंद्र मेढेकर यांच्यासह अनेकांनी संयोजन केले. सौ. शुभदा पाटणकर आणि सौ. धनश्री कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.