हिंदु धर्माला आव्हान देण्याचे काम केले, तर मढी गावाचा निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल ! – मंत्री नीतेश राणे

मढी (अहिल्यानगर) येथे पार पडली हिंदु धर्म सभा !

हिंदू सभेत बोलताना नीतेश राणे

अहिल्यानगर – गावातील जत्रेत मुसलमानांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी घेतला होता. त्यासंदर्भात एक ठरावही ग्रामपंचायतीने संमत केल्याने त्याला विरोध करण्यात येत होता. मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी मढी ग्रामपंचायतीच्या या ठरावाचे समर्थन केले आहे. मढी गावाने घेतलेला निर्णय हा इतिहासात लिहिला जाईल. या गावाने जिहाद्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम केले. हिंदु धर्माला जर आव्हान देण्याचे काम केले, तर मढी गावाने जो निर्णय घेतला आहे, तो निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल, अशी चेतावणीही राणे यांनी दिली. ते मढी गावात हिंदु धर्म सभेत बोलत होते. ‘तुम्हाला जर आमच्या धार्मिक ठिकाणी येऊन जिहाद करायचा असेल, तर आम्ही ते सहन करणार नाही’, अशी भूमिका राणे यांनी येथील जाहीर भाषणातून व्यक्त केली.

श्री. नीतेश राणे पुढे म्हणाले की,

श्री. नीतेश राणे

१. मढी गावातील कडवट विचारांचे हिंदू जागृत झाले. देशाला दिशा देणारा मढी गावाचा निर्णय आहे.

२. मढी ग्रामसभेचा ठराव रहित करणार्‍या गटविकास अधिकार्‍याला कळू द्या की, हे हिंदुत्वनिष्ठ सरकार आहे. आम्ही तुमच्या धर्माच्या विरोधात भूमिका घेतली, तर तुम्हाला चालेल का ? महंत रामगिरी महाराजांनी जर एखादी भूमिका घेतली, तर तुम्हाला मिर्च्या का झोंबतात ? असा प्रश्‍नही नीतेश राणे यांनी उपस्थित केला.

३. मंत्री झालो ते हिंदु जनतेने मतदान केले म्हणून झालो. आता मोर्चे काढण्याची, आंदोलनांची आवश्यकता नाही. ते दिवस गेले, आताचे सरकार हिंदुत्वनिष्ठ सरकार आहे.

४. मढी गावचा ठराव जरी रहित झाला, तरी पुन्हा ठराव करा आणि सर्व ग्रामस्थांनी त्या ठरावावर स्वाक्षर्‍या करा. सर्व ग्रामस्थांनी ठरावावर स्वाक्षर्‍या केल्या की, मी बघतो गटविकास अधिकारी कसा ठराव रहित करतो ते ?

५. राज्यातील अनेक ठिकाणी या लोकांनी केलेली अतिक्रमणे काढली जात आहेत. ज्या धर्मात मूर्तीपूजेला विरोध आहे, त्या लोकांना आपल्या यात्रेत दुकाने का लावू द्यावी ?

सभेला उपस्थित हिंदू

६. त्यांच्या सण-उत्सवांच्या वेळी जर ते हिंदूंना दुकाने लावू देत नसतील, तर हिंदूंनी त्यांच्या पवित्र उत्सवाच्या वेळी मुसलमानांना दुकाने लावू न दिल्यास त्यात काय वावगे आहे ? अन्य धर्मीय हे हिंदूंच्या जत्रेतील पावित्र्य अल्प करत आहेत, तिथे मांस-मटणाची दुकाने लावतात, ८-९ दिवस आंघोळ करत नाहीत, तिथे सगळी घाण करतात, त्या विरुद्ध हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी गावाचे सरपंच आणि ग्रामस्थ यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्हच आहे. अन्य गावे आणि महाराष्ट्रातील इतर देवस्थाने यांनीही अशी भूमिका घ्यावी, जेणेकरून हिंदु धर्माच्या विरोधात चालू असलेले हे षड्यंत्र बंद होईल.

मुसलमान व्यावसायिकांना बंदी केल्याचा ठराव रहित !

पुढील महिन्यापासून मढी येथे चैतन्य कानिफनाथ महाराजांची यात्रा चालू होणार आहे. ग्रामपंचायतीने केलेला ठराव घटनाबाह्य असल्याचा आरोप करत मुसलमान समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. गटविकास अधिकार्‍यांकडून मढीच्या ग्रामसेवकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी वरिष्ठांना चौकशी अहवाल पाठवला असून मुसलमान व्यावसायिकांना बंदी केल्याचा ठराव रहित करण्यात आल्याचे स्पष्ट केले.