१ लाख ६४ सहस्र पदवीधर विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर ‘Mumbai’ याऐवजी ‘Mumabai’ असे चुकीचे प्रसिद्ध !

  • भारतासह विदेशातही नावाजलेल्या मुंबई विद्यापिठाचा निष्काळजी कारभार !

  • नवे शुल्क न आकारता विद्यार्थ्यांना नवीन प्रमाणपत्र देणार !

मुंबई – मुंबई विद्यापिठातून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर मुंबईचे स्पेलिंग ‘Mumbai’ या ऐवजी ‘Mumabai’ असे चुकीचे प्रसिद्ध केले आहे. वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात मुंबई विद्यापिठातून एकूण १.६४ लाख विद्यार्थी पदवीधर झाले आहेत. दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्र वाटत असतांना हा प्रकार उघड झाला. याविषयी विद्यार्थ्यांनी सामाजिक माध्यमांवर खेद व्यक्त केला.

विद्यापीठ प्रशासनाने झालेल्या प्रकाराविषयी दिलगिरी व्यक्त करत सांगितले, ‘ही छपाईत झालेली चूक आहे. सर्व विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र पालटून दिले जातील. नवीन प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याचे कोणतेही नवे शुल्क आकारले जाणार नाही.’

संपादकीय भूमिका

आता ही सारवासारव करून काय उपयोग ? प्रमाणपत्रे प्रसिद्धीला देण्यापूर्वी संबंधित अधिकार्‍यांनी ती पडताळून घेतली नाहीत का ? असा हलगर्जीपणा करून मुंबई विद्यापिठाची अपकीर्ती करणार्‍यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! यासमवेतच ज्यांच्यांकडून ही चूक झाली, त्यांच्याकडूनच नव्याने छापण्यात येणार्‍या प्रमाणपत्रांसाठी होणारा खर्च वसूल केला पाहिजे !