Taliban Challenges Donald Trump : तालिबानचे डॉनल्ड ट्रम्प यांना उघड आव्हान : धाडस असेल, तर काबुलला या !

अफगाणिस्तानात अडकली अमेरिकेची ६१ सहस्र कोटी रुपयांची शस्त्रे !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानातील तालिबानच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने अमेरिकेची शस्त्रे परत करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात धाडस असेल, तर त्यांनी येऊन त्यांची शस्त्रे काढून घ्यावीत’, असे म्हणत तालिबानने डॉनल्ड ट्रम्प यांना आव्हान दिले आहे.

१. ट्रम्प यांनी अफगाणिस्तानात अमेरिकेच्या सैन्याने सोडलेली शस्त्रे परत आणण्याविषयी टिपणी केली होती. या टिपणीवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना तालिबानच्या सैन्यप्रमुखांनी अमेरिकेला धमकीच दिली आहे.

२. वर्ष २०२१ मध्ये तालिबानने काबुलकडे प्रयाण केल्यानंतर अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडले होते. त्या वेळी अमेरिकेने अफगाणिस्तानच्या भूमीवर मोठ्या प्रमाणात शस्त्रे सोडली होती. आता ट्रम्प यांनी ही शस्त्रे परत करण्याविषयी वक्तव्य केले आहे. यामुळे तालिबान संतापला आहे.

अफगाणिस्तानचे सैन्यप्रमुख कारी फसिउद्दीन फितरत

३. अफगाणिस्तानचे सैन्यप्रमुख कारी फसिउद्दीन फितरत यांनी ट्रम्प यांना उत्तर देतांना म्हटले की, जर तुमच्यात धाडस असेल, तर येथे या आणि तुमची शस्त्रे परत घ्या !

४. यापूर्वी अफगाण सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनीही ट्रम्प यांना असेच आव्हान दिले होते. मुजाहिद म्हणाले होते की, ही शस्त्रे आता अफगाणिस्तानची आहेत. आपण ही युद्धात जिंकली आहेत. त्यामुळे ही आमची मालमत्ता आहे.

५. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अहवालानुसार अमेरिकी सैन्याने माघार घेतल्यावर अफगाणिस्तानात अनुमाने ७ अब्ज डॉलर्सची (६१ सहस्र कोटी रुपयांची) सैनिकी उपकरणे त्यांना सोडून परतावे लागले होते. वर्ष २००५ ते २०२१ या १७ वर्षांच्या कालावधीत अमेरिकेने अफगाणिस्तानला त्याच्या संरक्षणासाठी १८.६ अब्ज डॉलर्सची (१ लाख ६२ सहस्र कोटी रुपयांची) शस्त्रे दिली होती.

६. २९ फेब्रुवारी २०२० या दिवशी अमेरिका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये दोहा करार झाला होता. या करारानुसार अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तानातून ऑगस्ट २०२१ मध्ये माघार घेतली होती.