श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्या वस्त्रावर उमटलेले पांढर्‍या रंगाचे गोल आणि काही ठिपके यांसंदर्भात जाणवलेली सूत्रे

‘एकदा श्रीमती मनीषा गाडगीळ यांना ‘त्यांच्या वस्त्रावर पांढर्‍या रंगाचे गोल आणि काही ठिपके उमटले आहेत’, असे लक्षात आले. वस्त्राचा रंग फिकट बदामी (क्रीम कलर) असून त्यावर पांढर्‍या रंगाचे साधारण २ सें.मी. व्यासाचे ४ गोल, दीड सें.मी. व्यासाचे ३ गोल आणि ४२ ते ४५ पांढरे छोटे ठिपके आढळले. पांढर्‍या रंगाचे गोल आणि ठिपके यांच्याकडे पाहून ‘श्रीमती मनीषा गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे, तसेच सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये’ यांविषयीची माहिती येथे दिली आहे. 

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. पांढर्‍या रंगाच्या गोलांकडे पाहून जाणवलेली सूत्रे 

अ. ‘पांढर्‍या गोलांकडे पाहून मला पुष्कळ चांगली स्पंदने जाणवली.

श्रीमती मनीषा गाडगीळ

आ. मी ते वस्त्र ४ – ५ वेळा वापरले आणि कपडे धुण्याच्या ब्रशने घासून धुतले, तरीही त्यावर उमटलेले पांढर्‍या रंगाचे गोल पुसले गेले नाहीत.

इ. वस्त्र परिधान केल्यावर मला माझा देह पुष्कळ हलका वाटत होता, तसेच काही वेळा चालतांना ‘माझा देह तरंगत आहे’, असे मला वाटत होते.

ई. माझा आनंद आणि उत्साह यांत वाढ झाली.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना मी पांढर्‍या रंगाचे गोल आणि ठिपके यांविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी त्यांचे परीक्षण केले. ते पुढे दिले आहे. सूक्ष्मातील कळण्याचे अफाट सामर्थ्य असणार्‍या सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, ‘आपण सर्व साधकांची स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही किती काळजी घेता’, हे मला प्रत्यक्ष अनुभवता आले. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यासारखे सद्गुरुरूपी रत्न आम्हाला दिले’, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६२ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.९.२०२४)

२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी वस्त्रावर उमटलेले पांढर्‍या रंगाचे गोल आणि काही ठिपके यांचे केलेले सूक्ष्म परीक्षण आणि त्यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये 

२ अ. ‘वस्त्रावर उमटलेले पांढर्‍या रंगाचे गोल आणि पांढर्‍या रंगाचे ठिपके हे श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्या रक्षणासाठी आले असणे

‘मी श्रीमती मनीषा गाडगीळ यांचे वस्त्र हातात घेऊन पाहिल्यावर मला पुढीलप्रमाणे जाणवले.

१. ‘श्रीमती गाडगीळ यांच्या वस्त्रावरील समोरच्या बाजूला खालपासून वर एक ते दीड फुटाच्या भागात पांढरे ठिपके आले आहेत. यातून ‘ईश्वर आपल्याला एखाद्या वस्तूच्या आवश्यक त्या भागात अनुभूती देतो’, हे मला शिकायला मिळाले. यातून ईश्वराचा काटकसरीपणाही लक्षात आला.

२. पांढर्‍या गोलातून चांगली स्पंदने येत आहेत.

३. हे पांढर्‍या रंगांचे गोल आणि ठिपके श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्या रक्षणासाठी आले आहेत.

४. मी वस्त्रावर हात धरल्यावर माझा संपूर्ण देह हलका झाला आणि माझ्या देहाचे अस्तित्व उणावले.

५. ‘माझे ब्रह्मरंध्र जागृत ज्ञाले आणि ब्रह्मरंध्रातून ईश्वरी प्रवाह आत शिरत आहे’, असे मला जाणवले.

६. पांढर्‍या गोलांकडे पाहून मला आनंद जाणवला. त्या गोलांच्या भोवती गुलाबी कडा आली आहे. ती ‘प्रीतीची आहे’, असे मला जाणवले.’

– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.९.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक