|
पुणे – स्वारगेट बसस्थानकामध्ये परगावी जाणार्या तरुणीला गाडीत बसवून देतो, असे गोड बोलून आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही गाडीमध्ये बसवले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. ही घटना पहाटे ५.३० वाजता घडली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण पाहून दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव असल्याचे सांगितले आहे. दत्तात्रय शिक्रापूर येथे रहाणार असून तो सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात चोरीचे, हाणामारीचे २ गुन्हे नोंद आहेत. (पहिल्याच गुन्ह्यात कठोर शिक्षा केली असती, तर गुन्हेगाराचे पुढील गुन्हे करण्याचे धाडसच झाले नसते. छत्रपतींच्या महाराष्ट्रात मुली आणि महिला यांच्यावर अत्याचार होणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद आहे ! – संपादक) ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बसस्थानकावरील सुरक्षाव्यवस्था अस्तित्वात नाही, असे सांगून चौकीची तोडफोड केली.
१. पीडित २६ वर्षीय तरुणीला फलटण येथे जायचे होते. ती स्वारगेट बसस्थानकावर आली. आरोपीने तिला फलटणला जाणारी गाडी अन्य ठिकाणी लागते, असे सांगत तिला उभ्या केलेल्या शिवशाहीमध्ये बसवले आणि अत्याचार केले.
२. या घटनेनंतर पीडित तरुणी फलटणला जाणार्या बसमध्ये बसली. त्यानंतर तिने घडलेला प्रसंग स्वत:च्या मित्राला भ्रमणभाषवरून सांगितला. मित्राने तिला पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिल्यानंतर तिने परत स्वारगेट येथे येऊन पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली.
३. पोलिसांनी सांगितले की, बसस्थानकांवर अनेक प्रवासी असतात. पीडित तरुणीने त्याच वेळी आरडाओरडा केला असता, कुणालाही साहाय्यासाठी बोलावले असते, तर हे घडले नसते. घटना झाल्यानंतर आरडाओरडा न करता ती तिथून निघून गेली. घडलेल्या प्रकारामुळे तिला धक्का बसला असावा. त्यामुळे काय करावे हे तिला सुचले नसावे; परंतु तक्रार प्रविष्ट केल्यानंतर तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे काम चालू आहे. त्याच्या तपासासाठी पोलिसांची ८ पथके कार्यरत आहेत.
स्वारगेट येथे बंद असलेल्या बसमध्ये गर्भनिरोधक, महिला आणि पुरुषांचे कपडे !
स्वारगेट बसस्थानकाची भयंकर अवस्था ! – वसंत मोरे, ठाकरे गट
या वेळी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी ‘स्वारगेट येथे अनेक बंद पडलेल्या बसगाड्या आहेत. त्यात अनैतिक प्रकार चालतात’, असे सांगितले. यासाठी सुरक्षा कर्मचारी उत्तरदायी असून येथे काय चालू आहे ? हे त्यांना माहिती नाही. या वेळी बसस्थानक परिसरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले.
स्वारगेटमध्ये जुन्या बंद पडलेल्या बसमध्ये गर्भनिरोधक, साड्या, शर्ट, चादरी सापडल्या आहेत. यातून या बसमध्ये काय प्रकार चालू असतील, याची कल्पना येऊ शकते.
सुप्रिया सुळे, रूपाली ठोंबरे आणि राज्य महिला आयोग यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया !
ही घटना म्हणजे पुण्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यात गृह विभागाला आलेले अपयश आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ‘या घटनेसाठी स्वारगेट बसस्थानकाचे आगारप्रमुख उत्तरदायी असून त्यांना तातडीने निलंबित करावे’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केली आहे. याखेरीज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि आमदार रोहित पवार यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.