काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्‍या निषेधार्थ श्री संप्रदायाकडून राज्‍यभर आंदोलन

आंदोलन करतांना स्‍व स्‍वरूप संप्रदायातील साधक

मुंबई – जगद़्‍गुरु रामानंदाचार्य स्‍वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्‍याप्रकरणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्‍या निषेधार्थ श्री संप्रदायाकडून २४ फेब्रुवारी या दिवशी राज्‍यभर तीव्र आंदोलन केले. जोडे मारा आंदोलन, पुतळ्‍याची अंत्‍ययात्रा, निषेध फेरी अशा विविध मार्गांनी भाविकांनी संताप व्‍यक्‍त केला. विजय वडेट्टीवार यांनी सार्वजनिकरित्‍या क्षमायाचना केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्‍यात येईल, अशी भावना भाविकांनी व्‍यक्‍त केली. मुंबई, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, रायगड, नाशिक, पुणे आदी विविध ठिकाणी सहस्रावधी भाविक या आंदोलनामध्‍ये सहभागी झाले होते. मुंबई उपनगर जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या बाहेर श्री संप्रदायाच्‍या भाविकांनी निषेधाचे आंदोलन केले. शेकडो भाविकांनी एकवटून या वेळी विजय वडेट्टीवार यांच्‍या निषेधाच्‍या घोषणा दिल्‍या. केवळ श्री संपद्राय नव्‍हे, तर हिंदूंच्‍या संतांचा अवमान केल्‍याप्रकरणी सर्वत्र हिंदु समाजाकडून विजय वडेट्टीवार यांच्‍याविषयी संताप व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.


काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्‍या छायाचित्रास ‘जोडे मारा’ आंदोलन !

कोल्‍हापूर, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – स्‍व-स्‍वरूप संप्रदायाच्‍या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे निषेध आंदोलन करण्‍यात आले. या प्रसंगी वडेट्टीवार यांच्‍या चित्राला चपलेचा हार घालण्‍यात आला, तसेच त्‍यांच्‍या छायाचित्रास ‘जोडे मारा’ आंदोलन करण्‍यात आले. या वेळी वडेट्टीवार यांनी क्षमा मागण्‍याची मागणी करण्‍यात आली.

या वेळी स्‍व-स्‍वरूप संप्रदायाचे जिल्‍हाध्‍यक्ष कृष्‍णात माळी, मधुकर बाबर, एम्.आर. पाटील, विजयकुमार पाटील, महिलाध्‍यक्ष प्रणाली पाटील, सीमा पाटील यांसह मोठ्या संख्‍येने महिला भक्‍तगण उपस्‍थित होते. या वेळी सर्वांनीच संतप्‍त प्रतिक्रिया व्‍यक्‍त करून ‘कोणत्‍याही परिस्‍थितीत संतांचा अवमान सहन करणार नाही’, असे सांगितले. या प्रसंगी हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, महाराष्‍ट्र मंदिर महासंघाचे कोल्‍हापूर जिल्‍हा सहसमन्‍वयक श्री. अभिजित पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्‍वामी उपस्‍थित होते.

मुंबई-पुण्‍यासह राज्‍यात अनेक ठिकाणी आंदोलन !

विजय वडेट्टीवार यांच्‍या निषेधार्थ मुंबई, पुणे, नागपूर यांसह राज्‍यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्‍यात आले. या संदर्भात राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप म्‍हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीच्‍या वेळेला ‘व्‍होट जिहाद’ झाला, त्‍या वेळेला या लोकांची थोबाड शिवली होती का ? त्‍या वेळेला फतवे निघत होते, त्‍या वेळेला हे काही बोलले नाहीत. आता मात्र या लोकांच्‍या मनामध्‍ये भगवा ध्‍वज हा सलतो आहे. म्‍हणून हिंदु धर्माच्‍या विरोधात हे लोक बोलत आहेत.’’

जळगाव येथे वडेट्टीवार यांच्‍या छायाचित्राला चपलांचा हार घातला

जळगाव – येथेही विजय वडेट्टीवार यांनी जाहीर क्षमा मागावी, अशी मागणी निषेध मोर्च्‍यात करण्‍यात आली. शिवतीर्थ, कोर्ट चौक येथे जगद़्‍गुरु नरेंद्राचार्यजी महाराज प्रणित स्‍व-स्‍वरूप संप्रदाय, जळगाव जिल्‍हा यांच्‍या माध्‍यमातून मोर्चा आयोजित केला होता. या वेळी विजय वडेट्टीवार यांच्‍या छायाचित्राला चपलांचा हार घालून संतप्‍त निषेध करण्‍यात आला. ‘यापुढे हिंदूंच्‍या भावना दुखावल्‍या गेल्‍यास आणि साधू-संतांविषयी चुकीची, तसेच अपमानास्‍पद वक्‍तव्‍ये केल्‍यास संपूर्ण संप्रदायाच्‍या वतीने प्रचंड प्रमाणात निषेध व्‍यक्‍त होईल. काहीही गैर घडल्‍यास त्‍याला सरकार उत्तरदायी राहील’, अशी चेतावणी देण्‍यात आली.