तासगाव – मणेराजुरी येथील हायस्कूलजवळ भगवा ध्वज लावण्यावरून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते यांच्यात वादावादी अन् हाणामारी झाली. यामध्ये १ कार्यकर्ता घायाळ झाला आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या आज्ञेनुसार धारकरी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना नित्य श्रद्धांजली वहाण्यासाठी प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ उभा करतात. त्यानुसार मणेराजुरी येथील धारकरी हायस्कूल समोरील जागेत ध्वज उभा करत होते; मात्र तेथील प्रलंबित शिवस्मारकास अडथळा निर्माण होत असल्याचे सांगत ध्वज लावण्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. यावरून दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांत वादावादी झाली. दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडून त्यांच्यात धक्काबुक्की झाली. यामध्ये एकाला वीट फेकून मारल्याने तो घायाळ झाला. त्याच्यावर गावातील रुग्णालयात उपचार करण्यात आले.