थोडक्यात महत्वाचे – २४ फेब्रुवारी २०२५

विदेशी मद्याची पुनर्विक्री करणारे कह्यात

यवतमाळ – गोवा राज्यातून विदेशी मद्य आणून त्याची पुनर्विक्री करणार्‍या दोघांना उत्पादन शुल्क विभागाने कह्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २० लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.


तरुणीवर सामूहिक अत्याचार करणार्‍या ६ जणांवर गुन्हा नोंद !

भिवंडी – शहरातील एका गावातील २२ वर्षीय तरुणीवर चौघांनी दोनदा सामूहिक अत्याचार केला. यात तरुणीच्या भावाला आणि रिक्शाचालकालाही मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी ४ तरुण अन् त्यांना गुन्ह्यात साहाय्य करणारे दोघे अशा ६ जणांविरोधात शांतीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे.


लाचखोर पोलीस उपनिरीक्षक अटकेत !

भिवंडी – येथील कोनगाव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे (वय ३४ वर्षे) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १० सहस्र रुपयांची लाच घेतांना कह्यात घेतले. गुन्ह्यात आरोपी करू नये, यासाठी त्याने तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. डोंगरे यांनी ८० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

संपादकीय भूमिका : पोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !


महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिस दौर्‍यावर !

मुंबई – रायगड, प्रतापगड, पन्हाळा यांसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-दुर्गांना ‘युनेस्को’चा जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिस दौर्‍यावर गेले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ २२ ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत फ्रान्सच्या पॅरिस शहरात असेल. महाराष्ट्र शासनाकडून मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गडांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी महत्त्वपूर्ण सादरीकरण करण्यात येणार आहे.


पिंपरी (पुणे) येथे ९६ किलो गांजा हस्तगत !

पिंपरी (पुणे) – अमली पदार्थविरोधी पथकाने गांजा तस्करी करणार्‍या महिलेसह संजय मोहिते आणि मनसाराम धानका यांना अटक केली आहे. आरोपींकडून ९६ किलो गांजा, २ चारचाकी वाहनांसह ६३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पुणे-नाशिक महामार्गावरील रोहकल फाटा या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.