चित्रदुर्गहून (कर्नाटक) महाराष्ट्रात परत येणार्‍या एस्.टी. चालकाच्या चेहर्‍याला कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासण्याचा प्रकार !

  • घटनेविरुद्ध कोल्हापूर येथे ठाकरे गटाचे आंदोलन !

  • कर्नाटकाच्या बसगाड्यांना भगवा झेंडा लावला

  • तोंडाला काळे फासलेल्या चालकाने प्रसंगाला धैर्याने तोंड दिल्याविषयी त्याचा सत्कार

काळे फासलेली एस्.टी आणि चालक

कोल्हापूर, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – २१ फेब्रुवारीच्या रात्री महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बेंगळुरू-मुंबईच्या चालकाला बसमधून खाली उतरवून कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून अचानक तोंडाला काळे फासले, तसेच एस्.टी.लाही काळे फासले. या वेळी चालकास ‘कन्नड येत नसेल, तर कर्नाटकात येऊ देणार नाही’, असा दम देण्यात आला. हे महाराष्ट्रात समजल्यावर कोल्हापूर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने २२ फेब्रुवारीला कोल्हापूर बसस्थानकावर आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी कर्नाटकाच्या बसगाड्यांना भगवा झेंडा लावला, तसेच महाराष्ट्रातील ज्या चालकाच्या तोंडाला काळे फासले, त्याने प्रसंगाला धैर्याने तोंड दिल्याविषयी त्याचा सत्कार करण्यात आला.

या घटनेमुळे २२ फेब्रुवारीच्या सकाळपासून महाराष्ट्राच्या कोल्हापूर येथून बेळगावकडे जाणार्‍या गाड्या बंद होत्या, तर बेळगाव येथून कर्नाटक शासनाच्या कोल्हापूरकडे येणार्‍या गाड्या निपाणीपर्यंतच धावत होत्या. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. याप्रसंगी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, शरद माळी, विजय देवणे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना शरद माळी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात अनेक कानडी भाषिक लोक रहातात. त्यांच्या समवेत आम्ही कधीही असा व्यवहार करत नाही किंवा मराठीची सक्ती करत नाही. यापुढील काळात जर कन्नड लोकांची दादागिरी थांबली नाही, तर आम्ही पण ‘जशास तसे’ उत्तर देऊ.’’ कर्नाटकात कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील चालकास काळे फासल्याचा एस्.टी. कर्मचारी संघटनांनी निषेध केला असून चालक-वाहक यांना संरक्षण द्या, अशी भूमिका घेतली आहे.