दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : हिंदु स्मशानभूमीत सुविधा वाढवणार !; रेल्वेस्थानकात थुंकणार्‍यांना दंड !…

हिंदु स्मशानभूमीत सुविधा वाढवणार !

मुंबई – दादर येथील कै. भागोजी बाळूजी कीर हिंदु स्मशानभूमीमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या प्रार्थनागृहांची आणि स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. तसेच स्मशानभूमी परिसरामध्ये हिरवळीसह उत्तम नागरी सेवा, सुविधा पुरवाव्यात, असे आदेश महानगरपालिका आयुक्त, तसेच प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.


रेल्वेस्थानकात थुंकणार्‍यांना दंड !

मुंबई – तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन रेल्वे परिसर अस्वच्छ करणार्‍या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने कारवाईचा बडगा उगारण्यास आरंभ केला आहे. चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ पर्यंत सुमारे २ सहस्र ३८३ प्रकरणांतून ६ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.


रायगडमध्ये भूकंपाचे धक्के

पनवेल – १९ फेब्रुवारीच्या रात्री रायगड जिल्ह्यातील पेण आणि सुधागड या तालुक्यांत भूकंपाचे धक्के बसले. रात्री साडेदहाच्या सुमारास हे धक्के बसले. भूकंप अल्प रिश्टर स्केलचा होता. तरीही नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण होते.


जळगाव येथे अग्नीशमन दलाचा प्रस्ताव प्रलंबित

जळगाव – येथे स्वतंत्र अग्नीशामक दलाचा प्रस्ताव ५ महिन्यांपासून पडून आहे. येथे या यंत्रणेसाठी महानगरपालिकेवर अवलंबून रहावे लागते. येथील एम्.आय.डी.सी. परिसरात लहान आणि मोठी आस्थापने, उद्योग, तसेच कारखाने आहेत. या पार्श्वूभमीवर येथे स्वतंत्र अग्नीशामक यंत्रणेची आवश्यकता आहे; मात्र एम्.आय.डी.सी.ला यासाठी कर भरावा लागेल. त्यामुळे औद्योगिक वसाहतीकडून या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.