पुणे येथील जलशुद्धीकरण (आर्.ओ. प्‍लांट) प्रकल्‍पावरील निर्बंध हटवले !

पुणे – येथे गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराला कारणीभूत असणारा जिवाणू पिण्‍याच्‍या पाण्‍यात आढळून आल्‍याने महापालिकेने धायरी, नांदेड, नांदोशी, किरकीटवाडी परिसरातील ३० आर्.ओ. प्‍लांट बंद केले होते. त्‍यानंतर आर्.ओ. प्रकल्‍प चालकांची महापालिकेत बैठक घेण्‍यात आली. प्रकल्‍पचालकांनी त्‍यांचे म्‍हणणे मांडले. या भागात महापालिकेच्‍या जलशुद्धीकरण केंद्रातून पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा होत नसल्‍याने नागरिकांची असुविधा होत आहे, हे लक्षात घेऊन महापालिकेने या प्रकल्‍पासाठी नियमावली सिद्ध करून त्‍यांची पूर्तता करण्‍याच्‍या विश्‍वासावर ‘प्‍लांट’ चालू करण्‍यास अनुमती दिली आहे.

आर्.ओ. प्रकल्‍प आस्‍थापनाकडून देखभाल दुरुस्‍ती प्रमाणपत्र घ्‍यावे. शासकीय आरोग्‍यशाळेकडून पाण्‍याच्‍या शुद्धतेची पडताळणी करावी. क्षेत्रीय कार्यालयाच्‍या आरोग्‍य निरीक्षकांनी पाण्‍याच्‍या नमुन्‍यांची वेळोवेळी पडताळणी करावी. जल दूषित आढळल्‍यास प्रकल्‍प कायमस्‍वरूपी बंद करावा. अशी नवीन नियमावली महापालिकेने सिद्ध केली आहे.