Rajasthan Budget 2025 : मंदिरांना प्रतिमास ३ सहस्र, तर पुजार्‍यांना प्रतिमहा ७ सहस्र रुपये देणार ! – अर्थमंत्री दिया कुमारी, राजस्थान

राजस्थानमधील भाजप सरकारची अर्थसंकल्पात घोषणा

डावीकडून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि राजस्थानच्या अर्थमंत्री दिया कुमारी

जयपूर (राजस्थान) – राजस्थान राज्याचा वर्ष २०२५ चा अर्थसंकल्प सादर करतांना राजस्थानच्या अर्थमंत्री दिया कुमारी यांनी धार्मिक पर्यटन आणि मंदिरांचा विकास यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मंदिरांमध्ये नैवेद्यासाठीची प्रतिमास रक्कम ३ सहस्र रुपये करण्याची आणि पुजार्‍यांना प्रतिमास ७ सहस्र रुपये मानधन देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

१. सादर केलेल्या अर्थसंकल्पात, तीर्थयात्रा अंतर्गत, ६ सहस्र ज्येष्ठ नागरिकांना विमानाने प्रवास करण्याची सुविधा दिली जाईल आणि ५० सहस्र वृद्धांना वातानुकूलित रेल्वेने प्रवास करण्याची सुविधा दिली जाईल.

२. पर्यटनाला चालना देण्यासाठी ९७५ कोटी रुपये खर्चून धार्मिक स्थळे आणि पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. याअंतर्गत १०० कोटी रुपये खर्चून एक आदिवासी पर्यटन सर्किट बांधले जाईल, ज्यामध्ये मानगड धाम, गोटमेश्‍वर मंदिर आणि इतर प्रमुख ठिकाणांचा समावेश असेल.

३. राजस्थान सरकारने गोशाळा आणि नंदीशाळा यांच्यावरील खर्चात १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ही रक्कम गोशाळांच्या विकासासाठी वापरली जाईल.