‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त होणार दुरुस्ती ! – अर्थमंत्री अजित पवार

निकषात पालट करण्याचे संकेत !

अर्थमंत्री अजित पवार

मुंबई – आर्थिक स्थिती चांगली असलेल्या काही जणांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मध्ये घेतले आहे. आम्ही कुणाचे पैसे परत घेणार नाही; मात्र यामध्ये दुरुस्ती करावी लागेल, अशा प्रकारे या योजनेतील बोगस नावे वगळण्याची, तसेच निकषात पालट करण्याचे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. १७ मार्च या दिवशी अर्थसंकल्पावरील चर्चेच्या उत्तरामध्ये अजित पवार यांनी वरील माहिती दिली.

पवार म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या वेळी केलेल्या घोषणेनुसार पैसे दिले जातील. अद्यापही ५ वर्षांचा कालावधी आहे. ही योजना आम्ही बंद करणार नाही; मात्र ही योजना गरीब घटकांतील महिलांसाठी आहे. ती केवळ आर्थिक साहाय्यासाठी न ठेवता यातून महिलांचे सबलीकरणही केले जाईल. या योजनेसाठी दिला गेलेला पैसा भांडवलाद्वारे वापरला जाईल आणि राज्याची अर्थव्यवस्था सबळ होण्यासाठी वापरला जाईल, हे आम्ही पहात आहोत.’’

५ वर्षांत ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगाराचे उद्दिष्ट !

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, येत्या ५ वर्षांत ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समाजहिताच्या योजना लागेल ते मूल्य देऊनही चालू ठेवू, त्या बंद केल्या जाणार नाहीत. महसुली तूट भरून काढण्यासाठी उत्पन्नात वाढ आणि अनुत्पादन खर्चात कपात यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जनतेला अधिक त्रास न देता कर चुकवेगिरी करणार्‍यांना कराच्या प्रक्रियेत आणू. महसुली तूट न्यून करण्यासाठी कठोर उपाययोजना करत आहोत.

वर्ष २०२९ चा विचार करून अर्थसंकल्प सिद्ध केला !

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, देशात केवळ महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशा या तीन राज्यांचीच कर्जाची आकडेवारी २० टक्क्यांच्या आत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाचे जे मोठे ध्येय निश्‍चित केले आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे असेल. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अर्थसंकल्पाचा उपयोग होईल. केवळ एका वर्षाचा नव्हे, तर वर्ष २०२९ चा विचार करून अर्थसंकल्प सिद्ध करण्यात आला आहे.