शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे पोलिसांचे आश्वासन
सांगली, १७ मार्च (वार्ता.) – शहरातील संजयनगर परिसरात विविध ठिकाणी असलेल्या ७ मशिदींवरील ध्वनीक्षेपकांमुळे (भोंगे) ध्वनीप्रदूषण होऊन त्याचा नागरिक, वयोवृद्ध, लहान मुले आणि रुग्ण यांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे मशिदींवरील भोंगे काढण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठांनी संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांना दिले. या वेळी सूरज बिजली यांनी २ दिवसांपूर्वी आम्हाला मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भात आदेश मिळाला आहे. त्यानुसार ती कार्यवाही चालू आहे, असे हिंदुत्वनिष्ठांना सांगितले.
निवेदन देतांना सर्वश्री महेश चव्हाण, मंगेश चव्हाण, राहुल बोळाज, शिवतेज पाटील, अविनाश गवळी, अभिजित कोडग, रोहित पाटील असे हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,
१. सांगली शहरातील शिंदे मळा, उर्मिलानगर, रामरहीम कॉलनी, राजीवनगर, अभिनंदननगर, अभयनगर, सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी, नेहरूनगर इत्यादी परिसरातील रहिवाशांच्या वतीने हे निवेदन देण्यात येत आहे. या परिसरात ७ मशिदी असून त्यातून दिवसातून ५ वेळा अजान देण्यासाठी ध्वनीक्षेपकांचा वापर केला जातो.
२. मशिदी असलेल्या ठिकाणी रुग्णालये, बालरुग्णालये, प्रसूतीगृहे असून तेथे गंभीर रुग्णांवर उपचार चालू आहेत. सतत होणार्या आवाजामुळे रुग्ण, वृद्ध, लहान मुले आणि परीक्षेच्या सिद्धतेत असलेले विद्यार्थी यांना प्रचंड त्रास होत आहे.
३. सर्वजण या त्रासदायक आवाजाने ग्रस्त आहेत. प्रथम या ध्वनीप्रदूषणाकडे आम्ही दुर्लक्ष केले होते. गेल्या काही वर्षांत पोलिसांनी गणेशोत्सव मंडळे, दुर्गापूजन मंडळे यांना अनेक कायद्यांखाली ध्वनीप्रदूषण करणे हा गुन्हा असल्याचे सांगत ध्वनीक्षेपक यंत्रणा बंद करण्यास भाग पाडले. तेव्हा आम्ही ध्वनीप्रदूषणासंबंधीच्या कायद्यांचा अभ्यास केला.
४. हे कायदे जुनेच असूनही आजपर्यंत पोलिसांनी मशिदींवरील ध्वनीवर्धकांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी कारवाई केलेली नाही, हे धक्कादायक आहे.
५. भोंग्यांसंदर्भात शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित अधिकार्यांच्या साहाय्याने त्वरित कारवाई करावी, तसेच प्रार्थनास्थळांवर असलेल्या ध्वनीक्षेपकांचा अपवापर थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
६. आमच्या मागणीचा उद्देश कोणत्याही समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर बंधन घालणे हा नसून कायद्याच्या चौकटीत राहून शांतता आणि सुव्यवस्था राखणे हा आहे.