जुन्नर (जिल्हा पुणे) – शिवनेरीवर साजर्या होत असलेल्या शिवजयंतीच्या सिद्धतेसाठी १६ मार्चला गडावर आलेल्या ४० ते ५० शिवभक्तांवर मधमाशांनी आक्रमण केले. मधमाशांनी घेतलेल्या चाव्यामध्ये ४७ जण घायाळ झाले. ४७ पैकी २ जण गंभीर घायाळ झाले आहेत. त्यामुळे वन विभागाने गडावर जाण्यास बंदी घातली आहे. पर्यटनासाठी गेलेल्या काही तरुणांनी पोळ्यावर दगड मारल्याने चवताळलेल्या मधमाशांनी पर्यटकांवर आक्रमण केले असावे, अशी एक शक्यता आहे. ‘शिवज्योत’ घेऊन जाणार्या शिवभक्तांच्या हातातील मशालीच्या धुरामुळे माशा सैरभैर झाल्याने त्यांनी अनेकांवर आक्रमण केले असावे, अशीही चर्चा आहे. शिवाईदेवी मंदिराकडे जाणार्या मार्गावर सकाळी ९ वाजता ही घटना घडली.
‘खासदार नीलेश लंके प्रतिष्ठान’च्या वतीने गड स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी उपस्थित असलेल्या लंके यांनीही रुग्णालयात जाऊन घायाळांची विचारपूस केली. घायाळांमध्ये घाटकोपर, राहुरी, रत्नागिरी, रायगड, खडकवासला, धुळे, ठाणे आणि मुंबई येथील पर्यटकांचा समावेश होता. मधमाशांच्या आक्रमणाची माहिती मिळाल्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण हे वन कर्मचार्यांच्या पथकासह, तर पुरातत्व विभागाचे गोकुळ दाभाडे हे त्यांच्या पथकासह घायाळांच्या साहाय्यासाठी पुढे आले. वन विभाग आणि पुरातत्व विभाग यांचे कर्मचारी, तसेच ‘जुन्नर रेस्क्यू टीम’चे सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेऊन घायाळांना जुन्नरच्या ‘छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालया’त भरती केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जाहीद हसन यांनी घायाळांवर उपचार केले.