‘सुराज्य अभियाना’ची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

देवगड – तालुक्यातील ‘गिर्ये रामेश्वर आंबा संशोधन उपकेंद्रा’मध्ये जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या दृष्टीने आवश्यक त्या तरतुदी आणि कीटकनाशक संशोधन प्रयोगशाळा लवकरात लवकर चालू करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत १६ मार्च या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. ‘सुराज्य अभियाना’चे डॉ. रविकांत नारकर, श्री. भास्कर खाडीलकर आणि श्री. अशोक करंगुटकर यांनी हे निवेदन मंत्री राणे यांना दिले.
सुराज्य अभियानाने मंत्री राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या
१. या संशोधन केंद्रात आंब्याच्या विविध जातींवर प्रत्यक्ष संशोधन करणे, तसेच आंबा उत्पादकांसाठी लागवड तंत्रज्ञान, रोग निवारण आणि विपणन यांवर आधारित प्रशिक्षण अन् मार्गदर्शन केंद्र चालू करणे आवश्यक आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वत्र केला जातो. त्यामुळे संशोधनातून मिळणारी माहिती ‘व्हॉट्सॲप’, ‘फेसबुक’, ‘एक्स’, ‘यू ट्यूब’ आदी सामाजिक माध्यमांद्वारे, तसेच संकेतस्थळाद्वारे आंबा उत्पादकांपर्यंत पोचवणे आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचे काम संशोधन केंद्राने केले पाहिजे.
२. आंबा उत्पादकांना काही समस्या असतील, तर त्या विचारण्यासाठी या केंद्राद्वारे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सध्या अतीउष्णतेचा दुष्परिणाम आंब्यांवर होत असून आंबे आतून खराब होत आहेत. हे टाळण्यासाठी संशोधन केंद्राच्या माध्यमातून आवश्यक ते मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे, अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
‘निवेदनातील मागण्यांविषयी गांभीर्याने अभ्यास आणि विचार करून मागण्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करतो’, असे आश्वासन मंत्री राणे यांनी या वेळी दिले.