विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि संतुलित आहार पुरवण्यासाठी सरकार कटीबद्ध ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात ‘अक्षय पात्र’ स्वयंपाकघराचे उद्घाटन !

‘अक्षय पात्र फाऊंडेशन’च्या स्वयंपाकघरातील एका पात्रात स्वतः अन्नपदार्थ ढवळतांना मुख्यमंत्री सावंत

पणजी, १७ मार्च (वार्ता.)  – ‘अक्षय पात्र फाऊंडेशन’च्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि संतुलित आहार पुरवतांना सरकारला सार्थ अभिमान वाटतो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना दर्जेदार आणि आरोग्यदायी अन्नपदार्थ पुरवण्यास सरकार कटीबद्ध आहे, असे उद्गार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १७ मार्चला काढले. साळगाव, गोवा येथील पिळर्ण औद्योगिक वसाहतीमध्ये ‘अक्षय पात्रा’च्या ७८ व्या केंद्रीयकृत स्वयंपाकघराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.  ‘शाळांमध्ये माध्यान्ह आहाराचा पुरवठा करणारे विद्यमान स्वयंसाहाय्य गट बंद केले जाणार नाहीत, तसेच नवीन स्वयंसाहाय्य गटांना माध्यान्ह आहार पुरवण्यास अनुमती दिली जाणार नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘या ‘अक्षय पात्र फाऊंडेशन’च्या वतीने साळगाव, शिवोली, कळंगुट या भागांतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये नववी आणि दहावी या वर्गांच्या विद्यार्थ्यांचाही पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनेचा लवकरच दक्षिण गोव्यातही विस्तार केला जाणार आहे. या संस्थेद्वारे रुग्णालयातही अन्नपदार्थ पुरवण्याचा विचार चालू आहे. सरकार ‘अक्षय पात्र’ या संस्थेसमवेत दीर्घकालीन भागीदारीमध्ये काम करू इच्छिते.’’

या वेळी साळगावचे आमदार श्री. केदार नाईक यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘अक्षय पात्र फाऊंडेशन’चे सहसंस्थापक आणि उपाध्यक्ष चंचलापती दास यांनी स्वागतपर भाषण केले. या वेळी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते, शिक्षण सचिव श्री. प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक श्री. शैलेश झिंगडे, ‘अक्षय पात्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीधर वेंकट, ‘नॅशनल पेमेंट्स  कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया’ (एन्.पी.सी.आय)चे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप असबे आदी उपस्थित होते.