|
सावंतवाडी – माडखोल गावात धरण असूनही ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य आणि अकार्यक्षम कारभारामुळे गावात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. गावात शासनाने ४ वर्षांपूर्वी दीड कोटी रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेस मान्यता दिली; मात्र अद्याप या योजनेचे काम चालू करण्यात आलेले नाही. पर्यायाने या योजनेसाठी संमत झालेला निधी परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ४ दिवसांत या योजनेचे काम चालू न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर २१ मार्च या दिवशी आमरण उपोषण चालू करण्यात येईल, अशी चेतावणी माडखोल गावविकास संघटनेने दिली आहे.
माडखोल गावात पाण्याची गंभीर समस्या असल्यामुळे वर्ष २०२१ मध्ये गावासाठी जलजीवन मिशन योजना शासनाने संमत केली; मात्र ग्रामपंचायतीमुळे हे काम अद्याप चालू होऊ शकलेले नाही. माडखोल गावात पाणीपुरवठा करण्याविषयीचे नियोजन प्रारंभापासूनच चुकीचे ठरले आहे. शासकीय निधी मिळण्याकरता चुकीच्या पद्धतीने राबवलेल्या योजना, ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांना विश्वासात न घेण्याची वृत्ती, वरिष्ठ जाणकारांचे मार्गदर्शन न घेता योजना राबवणे, अशा अनेक कारणांमुळे गावातील पाण्याचा प्रश्न जटील होत गेला. माडखोल बामणादेवी येथील लघु नळपाणी योजनेचे कामही गेली ३ वर्षे संबधित ठेकेदाराच्या दायित्वशून्यतेमुळे अर्धवट स्थितीत आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.