मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करण्याविषयी चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करणारे वक्तव्य राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. हा महाराष्ट्राचा अवमान आहे. संस्कृती, इतिहास यांना गालबोट लावणारे वक्तव्य आहे. या प्रकरणी गंभीर नोंद घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जावी, असे भाजपचे प्रवीण दरेकर यांनी सूचना मांडली.

भाई जगताप म्हणाले, ‘‘मी त्या पत्रकार परिषदेमध्ये होतो. त्यांनी व्यक्तीगतरित्या टीका केली नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव घेतले नाही; परंतु हे सरकार औरंगजेबाच्या प्रवृत्तीचे आहे, तसे कारभार करते आणि ते चुकीचे बालले नाहीत.’’

शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करणे चुकीचे आहे. औरंगजेब २७ वर्षे महाराष्ट्रात होता. शेवटी अवमानित होऊन, खंगून, मरण पावला. आजचे सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देते. ही परिस्थिती का यावी ?’’

यावरून भाजपच्या सदस्यांनी सभापतींसमोर येऊन घोषणा देऊन गदारोळ केल्यामुळे सभापतींनी सभागृह स्थगित केले.