महाराष्ट्रात आढळली लाहोर (पाकिस्तान) येथून आलेली बनावट सौंदर्यप्रसाधने !

अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरि झिरवाळ यांची विधानसभेत माहिती !

नरहरि झिरवाळ

मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – पाकिस्तानातून लाहोर येथील घोरी केमिकल आस्थापनाकडून महाराष्ट्रात बनावट सौंदर्यप्रसाधने आल्याची माहिती राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरि झिरवाळ यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. पुणे येथील पिंपरी-चिंचवड येथील काही विक्रेत्यांकडे ही बनावट सौंदर्यप्रसाधने आढळली आहेत. या बनावट सौंदर्यप्रसाधनांचा साठा नष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री झिरवाळ यांनी सभागृहात दिली. आमदार भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यात बनावट सौंदर्यप्रसाधनांची विक्री करणारे कारखाने चालू असल्याचे तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सांगितले.

त्यावर उत्तर देतांना नरहरि झिरवाळ म्हणाले, ‘‘बनावट सौंदर्यप्रसाधने आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा कायदा नाही. वर्ष २०१८ मध्ये याविषयीचा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे आला होता; मात्र तो संमत झाला नाही. येत्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव संमत केला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी या विक्रेत्यांवर गुन्हा नोंदवला जाईल. पुणे जिल्ह्यात अन्य ठिकाणीही कर्नाटक आणि तेलंगाणा राज्यांतून आलेली बनावट सौंदर्यप्रसाधने आढळली आहेत. याविषयी संबंधित राज्यांना माहिती कळवण्यात आली आहे.’’

तपासणी पथकातील २०० पैकी १५३ जागा रिक्त !

अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणी पथकामध्ये २०० पदे संमत आहेत; परंतु त्यातील केवळ ४७ पदे भरलेली असून १५३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमधील १०९ पदे भरण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. ‘टाटा कम्युनिकेशन लिमिटेड’द्वारे याविषयीची परीक्षा घेण्यात आली आहे. या नियुक्त्या अंतिम टप्प्यात आहेत, असेही झिरवाळ यांनी सांगितले.