|
पणजी, १७ मार्च (वार्ता.) – गोवा विद्यापिठाने शारीरिक आणि अनुप्रयुक्त विज्ञान (फिजिकल अँड अप्लायड सायन्स) विभागातील साहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रणव नाईक यांना परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थिनीला उघड केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे. आजपासून (१७ मार्च २०२५ पासून) पुढील आदेश येईपर्यंत डॉ. प्रणव नाईक यांना निलंबित करण्यात आले आहे. डॉ. प्रणव नाईक यांच्या विरोधात नव्याने आगशी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती देतांना गोवा विद्यापिठाचे उपकुलगुरु हरिलाल मेनन म्हणाले, ‘‘गोवा विद्यापिठाने या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी दोन सदस्यांची एक तथ्य शोध समिती स्थापन केली आहे. तथ्य शोध समिती या प्रकरणाचे अन्वेषण करून त्याचा अहवाल ४८ घंट्यांत सादर करणार आहे. समितीच्या अहवालाच्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. संबंधित साहाय्यक प्राध्यापक अनुमती न घेताच त्याच्या सहकारी प्राध्यापकांच्या कार्यालयात स्वत:कडील चावी वापरून गेला होता; परंतु तो तेथे ठेवलेली रसायने घेण्यासाठी गेला होता.
सहकारी प्राध्यापकाने क्षमा मागितल्यानंतर हा विषय मिटवण्यात आला होता. प्रश्नपत्रिका चोरल्याची अद्याप तक्रार आपल्याकडे आलेली नाही.’’ यानंतर ‘चोरी करून प्रश्नपत्रिका फोडणारा प्राध्यापक केवळ तंबीने सुटला’, अशा आशयाचे वृत्त माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर गोव्यात या विषयावर खळबळ उडाली. प्रश्नपत्रिका चोरी केल्याच्या प्रकरणी गोवा विद्यापिठाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रणव नाईक यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी नुकतीच आगशी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ‘एन्.एस्.यु.आय्.’ ही विद्यार्थी संघटना आणि युवक काँग्रेस यांनी १७ मार्च या दिवशी आगशी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करून साहाय्यक प्राध्यापकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘अभाविप’ या विद्यार्थी संघटनेने गोवा विद्यापिठावर धडक मोर्चा काढून ‘प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणामुळे गोवा विद्यापिठाच्या कारभारावर डाग लागल्याने या प्रकरणाची कसून चौकशी करावी’, अशी मागणी केली आहे.
‘त्या’ विद्यार्थिनीचे मागील ‘सेमिस्टर’चे गुण रहित करा ! – ‘अभाविप’
गोवा विद्यापिठाच्या तथ्य शोधक समितीच्या अहवालात प्रश्नपत्रिकेची चोरी केल्याचे सिद्ध झाल्यानंतर संबंधित साहाय्यक प्राध्यापकावर कारवाई करावीच, तसेच ज्या विद्यार्थिनीला लाभ झाला आहे, तिचे मागील ‘सेमिस्टर’चे गुण रहित करून तिच्यावरही कारवाई करावी. प्रश्नपत्रिकेची चोरी करून ठराविक विद्यार्थ्यांना साहाय्य करणे, म्हणजे अन्य विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे, अशी मागणी ‘अभाविप’ने केली आहे.