‘संत तुकाराम अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्या’निमित्त भंडारा डोंगर पायथा येथे आयोजित गाथा पारायण सोहळा !

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – महाराष्ट्र ही संत, शूर-वीर यांची भूमी आहे. भंडारा डोंगरावर प्रत्येक वारकर्याची श्रद्धा आहे. त्यामुळे भंडारा डोंगरातून जाणार्या बोगद्याचा मार्ग पालटण्यात आला आहे. नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी २ सहस्र २०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सिद्ध करून केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे; परंतु नद्या पुनरुज्जीवनाची ही चळवळ यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. सर्वांच्या सहभागाने भंडारा डोंगरावर उभारण्यात येत असलेल्या मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी साहाय्य करील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ‘जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी (३७५ वा) सदेह वैकुंठगमन सोहळ्या’निमित्त भंडारा डोंगर पायथा येथे आयोजित गाथा पारायण सोहळ्यास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन वारकर्यांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
वारकरी संप्रदायासाठीचा पहिला पद्मश्री पुरस्कार मारोति महाराज कुर्हेकर यांना देण्यासंदर्भात राज्याच्या समितीत मान्यता देऊन केंद्र सरकारकडे सादर करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. राज्यभरातून मोठ्या संख्येने आलेले वारकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.