आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (१८ मार्च २०२५)

देहू (पुणे) येथे भक्तीमय वातावरणात पार पडला ३७५ वा बीज सोहळा !

देहू (जिल्हा पुणे) – जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नामगजराने १६ मार्चला देहूनगरी दुमदुमली. काकडा आरती, महापूजा, हरिपाठ, वीणा, टाळ, मृदंग आणि चिपळ्यांची साथ अशा भक्तीमय वातावरणात ३७५ वा बीज सोहळा झाला. दुपारी १२ वाजता नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करत इंद्रायणी काठी भाविकांचा भक्तीसागर फुलला होता. यंदाचा तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला.

दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो वारकरी आले होते. पहाटे ४ वाजता मुख्य देऊळ वाड्यात काकड आरती झाली. मंदिर आवारात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात होती.


आगीत ३० ते ३५ झोपड्या जळून खाक !

वसई – येथील दत्तानी मॉलच्या मागील बाजूच्या झोपड्यांना भीषण आग लागली. यात ३० ते ३५ झोपड्या जळून खाक झाल्या. ४ घंट्यांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीमागील कारण समजू शकलेले नाही.


नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन जूनमध्ये !

नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन जून २०२५ मध्ये होईल, असे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी घोषित केले. विमानतळाला भेट देऊन त्यांनी कामांची पहाणी केली. विमानतळाचे काम वेगात चालू असल्याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.


मॅफेड्रोन विकणारा धर्मांध अटकेत !

ठाणे – मुंब्रा शहरातील मित्तल मैदान येथे मॅफेड्रोन हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या महंमद सैफ चष्मावाला (वय २५ वर्षे) याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या तस्कराकडून १ लाख ५७ सहस्र रुपयांचे अमली पदार्थ, ‘ॲपल’ आस्थापनाचा भ्रमणभाष, वाहन क्रमांक नसलेली दुचाकी, वजन काटा, बॅग असा एकूण २ लाख १७ सहस्र रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.