
विजय भोर, नवी मुंबई
नवी मुंबई – तुर्भे येथील अनधिकृत पार्किंग आणि गॅरेज यांवर नवी मुंबई महापालिकेसह वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली. ‘वाशी – तुर्भे लिंक मार्गावर अनधिकृत पार्किंग आणि गॅरेजवाले यांचा उपद्रव’ या मथळ्याअंतर्गत दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची नोंद घेत वरील कारवाई करण्यात आली.
वाहतूक शाखेने ‘नो पार्किंग’च्या ठिकाणी गाड्या लावणार्या ९० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमध्ये १ लाख रुपयांहून अधिक रकमेच्या दंडाची वसुली करण्यात आली. तसेच २ गॅरेज चालकांवर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
‘रस्ता आणि पदपथ यांवर दुचाकी आणि रिक्शा यांची दुरुस्ती करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्यावर यापुढेही धडक कारवाई करण्यात येणार आहे’, असे पोलिसांनी सांगितले.
अरेंजा चौक येथील अनधिकृत बस आणि ट्रक यांच्या पार्किंगवर कारवाई केली. यामध्ये त्यांनी वाहतुकीचा अडथळा करणार्या वाहनांना ‘जॅमर’ लावला. या वेळी ३२ सहस्रांहून अधिक रकमेची दंडात्मक कारवाई केली.