आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने प्रत्येक बुधवारी विशेष लेखमाला
छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक, म्हणजे हिंदुस्थानच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. मोगल सत्तेच्या काळात ‘हिंदुस्थानातील मोगल साम्राज्य, म्हणजेच हिंदुस्थानचे सरकार’, असे समीकरण झाले होते. ‘मोगलांशी आंतरराष्ट्रीय तहनामे आणि करार जे होत होते, ते हिंदुस्थानशी झालेले तहनामे आहेत’, असे समजले जात होते. मोगल सम्राटालाच ‘भारताचा सम्राट’ मानले जात होते. आंतरराष्ट्रीय कागदपत्रात तशीच नोंद केली जात होती. हिंदुस्थानातील मोठ्या प्रदेशावर परकीय आक्रमक असलेल्या मोगल शासनाचा प्रभाव होता.
१. मोगल साम्राज्यातील नोकरी म्हणजे मनसबदारी !
उत्तरेत राजपुतांचे राज्य होते. दक्षिणेत विजापूर, गोवळकोंडा ही राज्ये होती. कोणताही राजा मृत पावला, तर त्याच्या वारसाला मोगल सम्राटाकडून रितसर मान्यता घ्यावी लागत होती. ‘कोणताही राजा मृत पावला, तर त्याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य मोगल साम्राज्यात समाविष्ट केले जात होते. त्यानंतर तेच राज्य जेव्हा त्याच्या वारसाला परत देण्यात येईल, तेव्हा ते वंशपरंपरेने मिळालेले राज्य समजले जात नव्हते, तर ते नव्याने दिलेले राज्य आहे’, असे समजले जात होते. या मागचा हेतू हा की, कुणालाही वडिलोपार्जित हक्क सांगता येऊ नये. ‘त्याचे राज्य हे मोगल सम्राटाच्या कृपेमुळे त्याला प्राप्त झाले आहे’, याची जाणीव निर्माण करण्यासाठीच असा प्रकार मोगल सम्राट करत होता. वारसाला गादीवर येण्याची मान्यता मिळाल्यावर राजाची निवड एखाद्या मनसबीवर करण्यात येत होती. मनसब याचा अर्थ मोगल साम्राज्यातील नोकरी ! ही नोकरी, म्हणजे आवश्यक तेव्हा त्या राजाला त्याच्या राज्याच्या बाहेर साम्राज्यात कुठेही नोकरी करावी लागत असे.

अमरसिंगांच्या काळापासून उदयपूरने मोगलांचे सार्वभौमत्व मान्य केले होते. उदयपूरच्या राजाला केवळ एक सवलत मिळाली होती, ती म्हणजे मोगल दरबारात उपस्थित रहाण्याची त्याला माफी होती. मोगलांच्या मनसबदारी पद्धतीमुळे राजपुतांची राज्ये लहान लहान होऊ लागली आणि त्यांची स्वायत्तता संकुचित झाली. छत्रपती शिवरायांसमोर असाच पेचप्रसंग निर्माण झाला होता. छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांच्या हाताखाली मनसब मिळवली होती.
२. महाराष्ट्रात ‘हिंदवी स्वराज्य’रूपी राजेशाही स्थापन करण्याची आवश्यकता
अशा परिस्थितीतसुद्धा छत्रपती शिवरायांनी स्वतःचा समारंभपूर्वक वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करवून घेतला. ते स्वतंत्र राजे झाले. ही घटना, म्हणजे हिंदुस्थानच्या कानाकोपर्यातून हिंदुस्थानची जनता उठून उभी राहिली, या गोष्टीचे द्योतक होय. त्यामागचा हेतू होता हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे, म्हणजेच ‘हिंदुस्थानात हिंदूंचे राज्य निर्माण करण्याचा तो संकल्प’ होता. मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांमध्ये ‘हिंदवी स्वराज्य’, हा शब्द अनेक वेळा उपयोगात आणला गेला आहे.
छत्रपती शिवरायांनी अनेक प्रदेश जिंकून घेतले असले, तरी वर्ष १६७४ पर्यंत तांत्रिक दृष्टीने ते मोगल सम्राटाच्या प्रजाजनांपैकीच एक होते. मोगलांची चाकरी करणारे मातब्बर मराठी सरदार किंवा विजापूरचा बादशाह हे छत्रपती शिवाजी महाराजांना आदिलशाहीपेक्षा न्यून दर्जाचे लेखत होते. महाराजांनी आपल्या कर्तबगारीने जे स्थान प्राप्त केले. त्याला कायदेशीर स्वरूप देणे आवश्यक होते. त्यासाठी राजेशाही स्थापन करण्याची आवश्यकता होती.
३. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकामुळे झालेला परिणाम
राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची नाणी निर्माण केली. स्वतःचा शक चालू केला. या दोन्ही गोष्टी, म्हणजे त्यांच्या स्वतंत्र राज्याची चिन्हे होती. बुंदेलखंडाचा छत्रसाल याने नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनुकरण केले. छत्रपती शिवरायांनी त्याला शस्त्रविद्या शिकवली. छत्रसालाने मध्य भारतातील बुंदेलखंडात स्वराज्याची स्थापना केली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनुकरण करून त्याने वर्ष १६८७ मध्ये स्वतःचा छत्रपती शिवरायांप्रमाणे राज्याभिषेक करवून घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग हिंदुस्थानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. शिवराज्याभिषेक प्रसंगामुळे हिंदुस्थानच्या जीवनात एक प्रकारची क्रांती घडली. ही घटना म्हणजे शेकडो वर्षांपासून आलेल्या दास्याची शृंखला तुटली.
४. छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्यामागील कारणे
छत्रपती शिवरायांची अधिसत्ता हिंदुस्थानच्या भूमीच्या एका विशिष्ट भूभागावर स्थिरावली होती; पण ते अभिषिक्त राजे झाले नव्हते. इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, परकीय व्यापारी छत्रपती शिवाजी महाराजांना ‘दरोडेखोर’, ‘लुटारू’, ‘बंडखोर’ समजत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपादन केलेल्या भूप्रदेशात राजकीय स्थैर्य नव्हते. त्यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. मुसलमानी सत्ताधीश आणि परकीय व्यापारी यांची दृष्टी पालटण्यासाठी, स्वराज्याला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी राज्याभिषेक करून घेणे क्रमप्राप्त होते. उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यानुसार छत्रपती शिवरायांना समर्थ रामदासस्वामींनी राज्याभिषेक करावा; म्हणून प्रेरणा दिली.
(क्रमश: पुढच्या बुधवारी)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःचा राज्याभिषेक का करून घेतला ?
१. छत्रपती शिवरायांच्या काळात सार्वभौम राजसत्तेला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. सामान्य जनतेच्या दृष्टीने राजा हा भगवान विष्णूचा अंश होता. राजपद वंशपरंपरेने चालत होते. त्यामुळे राजा पालटला, तरीसुद्धा व्यावहारिक दृष्टीकोनातून पूर्वीचे संकेत पाळले जात होते. राजाने दिलेल्या देणग्या, सनदा, वतने, संधीपत्रे यांना टिकाऊ स्वरूप प्राप्त होत होते. छत्रपती शिवाजी महाराज विधीयुक्त सिंहासनाधीश्वर झाल्यानंतर कायम स्वरूपाच्या सनदा देण्याचे अधिकार त्यांना सहजपणे प्राप्त होत होते.
२. छत्रपती शिवरायांवर अपार श्रद्धा असूनही व्यवहारी जगात स्वराज्यातील प्रजेला आदिलशाह अथवा मोगली सनदा अधिक मोलाच्या वाटत होत्या. त्यामुळे श्रद्धा दुभंगलेली होती. ही दुभंगलेली श्रद्धा दूर करून तिचे अखंड आणि दृढ श्रद्धेत रूपांतर करण्यासाठी राज्याभिषेक हाच एकमेव पर्याय होता.
३. महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या कार्यात ज्यांनी सदैव साथ दिली, ते वीर राष्ट्रभक्त मावळे देशातील अन्य परकीय सत्ताधिशांच्या दृष्टीने विद्रोही नागरिक ठरत होते. अशा राष्ट्रभक्तांना विद्रोहाचा अभिशाप बाधू नये; म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे राज्याभिषेक करण्यावाचून अन्य मार्ग नव्हता.
४. औरंगजेब अथवा आदिलशाह यांनी अनेकांना राजे हा ‘किताब’ (पदवी) बहाल केला होता. असे अनेक मराठी जहागीरदार त्या वेळी महाराष्ट्रात होते. त्यांच्याजवळ फौजफाटा होता. हे सरदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये आकाश-पाताळ एवढे अंतर होते, तरीसुद्धा त्यांना ‘बंडखोर’ ठरवले जात होते. राजदंड धारण करून अभिषिक्त झालेल्या महाराजांकडे पहाण्याची जगाची दृष्टीच पालटणार होती. त्यासाठी छत्रपती शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला.
५. त्या काळातील लोकांना वाटत होते की, आपल्या या हिंदुस्थानच्या भूमीत हिंदु राजा आता कधीच निर्माण होणार नाही. त्यांची ही पराभूत मानसिकता नष्ट करून स्वाभिमानाची आणि विजिगीषू वृत्ती जनमानसात निर्माण व्हावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर राज्याभिषेक करण्यापासून अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता.
६. पंडित गागाभट्ट, जिजाऊसाहेब, समर्थ रामदासस्वामी, बाळाजी आवजी आणि स्वतः छत्रपती शिवरायांनासुद्धा ‘राज्याभिषेक व्हावा’, असेच वाटत होते; कारण ती काळाची आवश्यकता होती; म्हणूनच सर्वानुमते श्रीनृपशालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, म्हणजेच ६ जून १६७४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.
पराभवाची परंपरा नष्ट करून विजयाची परंपरा निर्माण करणारा मध्ययुगीन हिंदुस्थानच्या इतिहासातील ‘पहिला सार्वभौम सत्ताधीश’ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव सुवर्णाक्षरात नोंदवले गेले आहे. म्हणूनच छत्रपती शिवरायांना आणि ज्ञात-अज्ञात वीर मावळ्यांना मानाची मानवंदना !
– श्री. दुर्गेश परुळकर