उन्नाव (उत्तरप्रदेश) – उन्नाव जिल्हा कारागृहातील कैद्यांना प्रयागराजमधील त्रिवेणी संगमातील पवित्र पाण्याने स्नान करण्याची व्यवस्था करून महाकुंभमेळ्याचे पुण्य मिळवण्याची संधी देण्यात आली. उन्नाव जिल्हा कारागृह प्रशासनाने यासाठी विशेष व्यवस्था केली. कारागृहाच्या आवारात संगमाच्या पाण्यात आंघोळ करणार्या कैद्यांचा एक व्हिडिओही प्रसारित झाला आहे.
प्रयागराज त्रिवेणी संगमाचे पाणी कारागृहाच्या आवारात बनवण्यात आलेल्या एका छोट्या कृत्रिम तलावामध्ये ओतले गेले. यामध्ये कैद्यांना अंघोळ करण्यास सांगण्यात आले. कैद्यांनी हर हर गंगेचा जयघोष करत स्नान केले. संगमाच्या पवित्र पाण्यात स्नान केल्यानंतर कैद्यांनी सूर्यदेवाला अर्घ्यही अर्पण केले. उन्नाव जिल्हा कारागृह अधीक्षक पंकज कुमार सिंह यांनी या पवित्र स्नानाची व्यवस्था केल्याविषयी त्यांचे कौतुक केले जात आहे.